माझा आंधळा मित्र
मी शाळेत शिकत असतांनाची ही गोष्ट. राजुरा कॉलीयरी वरून, वडिलांची बदली झाल्यामुळे, मी वणी येथे शहरांत खोली करून राहत होतो. माझे वडील वणी पासून आठ किलोमीटर दूर असलेले 'मंदर' या खेडेगावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत होते.
मी आठव्या वर्गात असेल. मी एकटाच राहत असल्याने मी अधूनमधून मंदर या गावी जात असे. येता-जातांना वागदरा येथील डोंगराळ भागातून जावे लागायचे.
एकदा काय झाले. मी खडकाळ भागातून जातांना सायकल वरून खाली पडलो. तेवढ्यात आवाज आला.
" दादा, पडला का तू. उठ. लागलं तर नाही ना. ये. इथे बस.पाणी पी. "
अशा आवाजाने मी पाहिले तर एक आंधळी व्यक्ती दहा-बारा फुटा'वरून येतांना दिसली. ती व्यक्ती आंधळी होती. दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती. हातात काठी होती. अंगात फाटके कपडे, अशी होती.
मी सायकल उभी केली. त्याला म्हटले, "तुला कसे काय कळले. मी पडलो म्हणून."
ती आंधळी व्यक्ती म्हणाली, "दादा, मला डोळे नाहीत, पण मी कानाने आवाज ओळखलां. मी जरी, डोळे नसल्यामुळे, जग पाहू शकत नसलो तरी, आत्मशक्तीने तुमच्या भौतिक जगाचा अनुभव घेऊ शकतो. हाताच्या स्पर्शाने, मी मनाने माणूस ओळखू शकतो.
तो सतत बोलत होता. "दादा, हे बघ. तुला डोळे आहेत, पण तू पडला. मला डोळे नाहीत, पण न पडता मी घरी पोहोचतो. दादा, तुम्ही भौतिक जगात राहतात. तुम्हांला देवाने उघडे डोळे दिले. तुम्हांला जग पाहता येते, तरी देखील तुम्ही दृष्टीहीन आहात. मी आंधळा जरी असलो तरी मला दृष्टी आहे.
मी अंत':मनात विलीन होऊ शकतो. देवाने दिलेल्या भौतिक जगापेक्षा निर्माण केलेल्या भावविश्वात जगत असतो. या भाव विश्वात कशाचीच गरज भासत नाही बघ. ना कपडे, ना विलासी जीवन, ना भूख, ना आकांक्षा, फक्त दृष्टी हवी. माझ्याजवळ काय आहे, पण मी मनाने सुखी आहे. माझ्याजवळ देव आहे, तो या काठीमध्ये विराजमान आहे. तोच मला दिशा दाखवतो. अंतरं ज्ञानाशी एकरूप झाले की, कशाचीच गरज भासत नाही, बघ."
त्याचे ज्ञान पाहून मी आश्चर्यचकित झालो. त्याला म्हटले, "तू इकडे, कुठे चाललास?"
तो म्हणाला, "दादा, मी वागदऱ्याच्या डोंगरावर राहतो. तिथे माझी झोपडी आहे. मी व माझी मोठी बहीण असे दोघेच राहतो. तू माझ्यासोबत चल. थोडा वेळ बस. मग तुझ्या गावाकडे जा. पण तू कुठे जात आहेस?"
मी म्हटले, "मी मंदरला चाललो. तिथे माझे वडील राहतात. मी वणीला शिकायला आहे. माझे वडील तिथे शिक्षक आहे."
"हां, तुमच्या मंदर चा जगन्नाथ पोस्टमन आहे ना. तो नेहमी भेटतो व तेथील राऊत गुरुजी आहेत नां, ते मला नेहमी जाता -येतांना भेटतात." तो म्हणाला.
"हं, मी त्यांचाच मुलगा आहे." मी म्हणालो.
आमचा परिचय झाल्याने त्याला अधिकच बरे वाटले. तो म्हणाला, "माझ्याबरोबर चल. माझ्या झोपडीकडे."
मी त्याच्यासोबत चालू लागलो. डोंगराच्या उतरणीवर एक त्याची त्या ठिकाणी झोपडी होती. 110° झुकलेली. त्याचे नाव पांडू होते. टोपण नावाने सर्व पांडया म्हणायचे.
त्याच्या बहिणीने मला हळद लावून दिली. त्या लागलेल्या ठिकाणी पट्टी बांधून दिली व बिन दुधाचा हळदीचा चहा करून दिला. त्याची बहीण तीस-पस्तीस वर्षाची असेल आणि पांडया वीस-बावीस वर्षाचा असेल. तेंव्हापासून माझी त्याच्याशी मैत्री झाली.
मी तसेही या डोंगराचे नैसर्गिक वातावरणाने माझे मन मोहित झालं होतं. त्यामुळे मी गावाला जायचे नसले तरी, फिरायला, मित्रांसोबत या ठिकाणी येत होतो.
एके दिवशी तो मला भेटला. तो म्हणाला, "दादा, तुम्हा लोकांना देवाने डोळे दिले पण तुम्ही माणुसकीच विसरलेत."
मी म्हटले, काय झालं.
"दादा, एक माणूस आमच्या घरी रात्री आला. त्याने ताईचा हात पकडला. ती जोरात ओरडली. पांडू... पांडू.... तरी, पण मी काठीने जोरात मारले. बघ. नेमकी त्याच्या डोक्यात बसली. मी त्याला मारतच बसलो. मग तो मात्र पळाला.
तो म्हणाला, "दादा, या लोकांना देवाने डोळे दिले, पण ते माणुसकीच विसरले, बघ. माणूस आज माणसालाच ओळखांयला विचारला. दादा, माझ्या काठीतच देव आहे. तो नेहमी सोबत राहतो. म्हणूनच संकट टळले."
माझे मन या घटनेने सुन्न झाले.
आता ज्या ज्या वेळेस मी त्या रस्त्याने जात होतो, त्या, त्या वेळेस झोपडी पर्यंत त्याच्यासोबत जात होतो.
तो म्हणाला, "दादा, काल बाजाराचा दिवस होता. खूप लोक जमली होती."
मी विचारले, "काय झाले?"
तो बोलू लागला. "दादा, त्या बाजारात एका माणसाने बैलजोडी विकायला आणली होती. ती बैलजोडी, त्याच्या वडीलाने, भाऊबंदकीच्या वाटणीत त्यालां दिली होती. एवढेच की, त्याच्या भावापेक्षाही जोडी, थोडी सरस होती. त्याचा भाऊ आला. त्याच्याशी गोड बोलू लागला. भावावर विश्वास जडला. त्याला थोडं थांबवून बाजार केला. मग तो निघाला. पण थोड्याच वेळात, त्या बैल जोडीने प्राण सोडले. कारण त्याच्या भावाने काहीतरी औषध त्या जोडीला दिले होते. बघ, दादा, भाऊच भावाचा वैरी ठरला. दादा, देवाने डोळे आणि हात त्यासाठी दिलेत कां? त्याला उघडे डोळे दिले, पण दृष्टीच नव्हती व माणुसकी ही नव्हती."
नेहमीपेक्षा आज त्याला उशीर झाला होता. त्याला घ्यायला येणारी, त्याची ताई तिलाही आज उशीर झाला. माझ्या सायकलीच्या तीन घंटी आवाज झाला.
तो म्हणाला, "दादा, तू आला कां?"
मी म्हणालो, "हो, भाऊ."
तो म्हणाला, "दादा, आज की नाही. एक अजबच घटना घडली. रंगनाथ स्वामीच्या मंदिरात एक मुलगा व त्याची आई आली होती. ते रडत होते. मी विचारले, काय झाले? ते काही नाही म्हणाले, आईला कोर्टात नेले होते? का बरं!
मला मोठ्या भावापेक्षा एक एकर हिश्यात जास्त आले. त्या एकरावर त्यांने हक्क दाखवला. त्याची तारीख होती. दादा, कशी असतील लोक. डोळे असूनही हव्याश्या पुढे व लोभापायी त्यांनी स्वतःच्या आई ला, जन्म दातीला, कोर्टात बोलाविले होते. दादा, तूच सांग बरं! पैसा मोठा की आई. त्यांना बघ, डोळे असून ही दृष्टीने ते आंधळेच की नाही."
पांडू कधीकधी दुपारी गावात चक्कर मारायचा. पैसे मागायचा. तो आज माझ्या राहत असलेल्या खोली जवळ आला. तो रस्त्याने गाणे म्हणत होता.
"द्या. मला एक पैसा,
माझ्या ताईसाठी,
चाल पांडू वाट पाहते ताई,
डोंगरावरी."
आताच हे गाणे नव्हते. त्याच्या मनाचा भाव होता. द्या किंवा नका देऊ.
मी त्याला घरी आणले. त्याला खायला दिले. 'दादा, तू स्वतः बनवतो कां?पोळ्या -भाजी. मी म्हटले, "बाजूची ताई, बनविते. छान केल्या पोळ्या.
" दादा, आज येतो, कां? " तो म्हणाला.
" नाही, उद्या सुट्टी आहे. उद्या येईल. " मी म्हणालो.
दुसऱ्या दिवशी रस्त्यातच भेटला. मी सायकल वरून खाली उतरलो.
तो म्हणाला, " दादा, आज की नाही. मंदिरात प्रवचन होते. मला आज भरपूर पैसे भेटले. पण पाच वाजता काय झाले! ते पैसे कोणीतरी पळविले. लोकांनी पकडले त्या व्यक्तीला, खूप मारले. मीच म्हटले, " नका मारू. त्याला गरज असेल ना. त्याच्याही घरी असेल ना कोणी!"
लोकांनी त्याच्या जवळचे पैसे घेऊन मला आणून दिले.
"बघ. दादा, असे असतात लोक. तुला उशीर होईल ना जा तू. आता दादा, खरं सांगू का? तू भेटला की बरं वाटते. पण एक सांगू का. तू खूप अभ्यास कर. मोठा हो! पण साहेब नको, तू मास्तरच हो. मास्तर झाल्याने शिकविण्याचा आनंद मिळते व शिकायला मिळते. पैशा मिळवण्याच्या नादात आनंद विसरशील. तुमच्या उघड्या डोळ्याच्या जगात लोक भौतिक सुखाचा जास्त विचार करतात. अंतर्मनाच्या आनंदाचा विचार करीत नाही. डोळे मिटून निर्माण केलेले ते देवाचे भावविश्व् कधी बघतच नाही. त्यात अंतरमनाशी संवाद करीत नाही. त्यात सर्व सुख अनुभवता येते. "तुम्हीं भोतिक सुखाला महत्व जास्त देता. ते काही औंशी योग्य आहे, जीवन जगण्यासाठी. पण अति मागे लागले की सुखापेक्षा दुःख जास्त मिळते. त्यामुळे एक मिळाल की आणखी मिळाले पाहिजे असे सारखे वाटत राहते. समाधानाच नसते." तो सारखा बोलत होता.
"दादा, मी या जगात आनंदी आहे. मला दिसत नाही याचे दुःख नाही, पण मला याचे दुःख आहे की, ज्यांना दिसते त्यांना जगातली माणुसकी दिसत नाही. याचे दुःख मात्र माझ्या मनाला खूप होते. डोळे असूनही जे दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाही ते खरे दृष्टीहीन आहेत. नाही कां?"
"जे डोळे असूनही दुसऱ्यांचे दुःख जाणू शकत नाही, ते खरे दृष्टीहीन आहेत. दादा, मला कोणी एवढे जर म्हटले की, 'ये, मी आहे तुझ्यासोबत' असे म्हटले की, त्याक्षणी माझ्यासाठी संपूर्ण जग उधळून निघते. तुझेच बघ. तु मला भेटला की, आनंद वाटतो. दादा,
मीच बोलत बसलो. ' हा ' ताईने तुला निरोप दिला आहे की, रक्षाबंधनाला ये घरी व तुझ्या त्या ताईला पण घेऊन ये. त्याचे हे विचार, पाहून क्षणभर विचारांच्या गुंतेत अधिकच रंगलो. पुढे या मित्राच्या, माझ्या खोलीत राहणार ताईला घेऊन, त्याच्या झोपडीत गेलो. सोबत शर्ट, धोतर आणि साडी, कापड घेऊन गेलो. ताईने मला, माझ्या सोबतच्या ताईने दादाला राखी बांधली. त्याचे व ताईच्या पाया लागून आम्हीं घरी परत आलो.
एकदा दहा-पंधरा वर्षानंतर वणीला जाण्याचा योग आला. त्या मित्रांच्या झोपडीकडे गेलो, तर आता तिथे झोपडी नव्हती. डोंगरांचे सौंदर्य नाहीसे झाले होते. तेथे आता मोठा मार्ग झाला होता. कोणी जाणाऱ्या म्हाताऱ्याला विचारले तर त्याने सांगितले त्याची झोपडी रस्त्यामुळे उध्वस्त झाल्याने, त्या धक्केने तो मरण पावला. त्याची बहिण देखील काही वर्षांनी विरहात मरण पावली.
खरंच कसं, असते जीवन. आपल्याजवळ डोळे आहे, पण दृष्टी नाही. तो आंधळा होता, पण त्याला मनाची दृष्टी होती. आज आपण माणसातील माणूस व त्याचे वेगळेपण शोधण्याचे विसरलोय.
त्यादिवशी मला जाणवले की, दृष्टी म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहण्याची शक्ती नाही, तर माणूस ओळखणे त्याचे वेगळेपण शोधणे, दुसऱ्यांच्या वेदना समजून घेणे,
दुसऱ्यांच्या मनातील भावना, दुसऱ्याला गरजेच्या वेळी मदत करणे, माणसाला माणूस म्हणून विसरणार नाही, हीच खरी दृष्टी आहे.
आपल्याकडे सर्व काही असते. डोळे, घर, पैसा, नाती, सुख सोयी, पण या सर्व गोष्टींची खरी किंमत करण्यासाठी आपल्याकडे दृष्टी असतेच असं नाही, म्हणूनच माणसाला माणूस ओळखण्यासाठी, दृष्टी हवी.
तो मित्र गरीब होता. पण त्याच्याजवळ माणसाला ओळखण्याची, दुःख जाणण्याची, आपल्याजवळ काही नसताना देखील, रक्षाबंधनाला त्यांने दिलेले निमंत्रण, आपुलकी, या उघड्या डोळ्यासमोरून जात नाही. खरी दृष्टी त्याच्यात जवळ होती.
असा होता, तो माझा आंधळा मित्र.
दि. 31 ऑगस्ट, 2026.
-- प्रा. डाँ. विनोद राऊत,
सेवानिवृत्त प्राध्यापक, (वाणिज्य )
अमरावती.