The Impersonator Heir - Part 6 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तोतया वारसदार - भाग 6

Featured Books
Categories
Share

तोतया वारसदार - भाग 6

तोतया वारसदार

पात्र परिचय-

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

 

भाग  ६   

भाग ५  वरून पुढे  वाचा....

 

“आत्ताच  याबद्दल काही सांगणं अवघड आहे. काम सुरू केल्यानंतर, थोडा परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. जरा महिना, दोन महीने होऊ द्या, मग पुन्हा बसून आढावा घेऊ.” निशांतने आपली बाजू स्पष्ट केली.

सारंग वकील निशांतचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतेच, पण वंशावळीचा  पण अभ्यास करत होते. ते म्हणाले, “निशांत, मी तुझं बोलणं ऐकत होतो, तू म्हणालास की दिनकर पासून शोध कार्याला  सुरवात करावी लागेल म्हणून, म्हणजे १८५७ पर्यन्त मागे जाऊन तपास करायचा  आहे. बरोबर आहे?”

“हो” – निशांत.

“माझ्या मते उलट बाजूने सुरवात करावी.” -सारंग वकील.

“म्हणजे अविनाश पासून?” - निशांत.

“हो” – सारंग वकील.

“म्हणजे बाकीचा शोध करायचा  नाही का? जरा स्पष्ट करून सांगाल का?” निशांत म्हणाला.

“हो रे सारंग, उलट बाजूने का सुरवात करायची? जरा क्रमा क्रमाने  होऊन जाऊ दे की तपास. एक एक प्रकरण निकालात काढलं तर सोपं पडेल.” किरीट मध्येच म्हणाला.

सारंग वकील हसले. वंशावळीचा कागद समोर ओढला, म्हणाले, “असं बघा, व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश हे तिघं विनायक रावांची मुलं आहेत. त्यांचा मालमत्तेवर पहिला हक्क आहे. त्यामुळे त्यांच्यापासूनच सुरवात करावी लागेल. त्यांच्यापैकी दोघ, व्यंकटेश आणि सौमित्र  इंग्लंडला आहेत, त्यांचा पत्ता मिळवून त्यांच्याशी संपर्क स्थापन करणं अवघड नाहीये. राहता राहिला, अविनाश, तो बेपत्ता आहे, त्यांच्या तपासासाठी भारत सरकारशी संपर्क करावा  लागेल. हे सगळं चालू असतांना, बाकीची प्रोसेस सुरू ठेवायला हरकत नाही. पण या तिघांशी संपर्क अत्यावश्यक आहे.”

“म्हणजे या तिघांचा शोध लागला तर आपल्याला बाकी काही करायची आवश्यकता नाही, असं म्हणायचं आहे का तुला?” किरीटने  आपली शंका बोलून दाखवली.

“नाही, सगळ्यांचा शोध घ्यावाच लागणार आहे, कारण विनायकरावांनी मृत्यूपत्र केलं असतं, आणि त्यात स्पष्ट उल्लेख केला असता, तर गोष्ट वेगळी होती. इतर कोणाचा प्रश्न अश्या परिस्थितीत उद्भवत नाही. पण त्यांनी इच्छापत्र केलं आहे आणि सर्व वारसदार शोधून काढा, असं म्हंटलं आहे. त्यामुळे, सगळ्यांचा शोध घ्यावाच लागेल आणि मग जर एका पेक्षा जास्त लोकं दावा करणारे निघाले, तर कायद्यात असलेल्या तरतुदी प्रमाणे, त्यांचा वाटा त्यांना मिळेल. पण मुलं प्रथम क्रमांकावर असल्यामुळे, त्यांना प्रथम शोधावं लागेल.” सारंग सरांनी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न केला.

‘म्हणजे,” निशांत म्हणाला, “जर एकापेक्षा जास्त लोकं वारसदार म्हणून समोर आले, तर काय सर्वांना समसमान वाटा द्यायचा असतो का?”  

“नाही, त्याबद्दल कायद्यामधे स्पष्ट उल्लेख आहे. ज्याची मालमत्ता आहे, वारसदार त्याच्या, किती जवळचा आहे, त्यावर टक्केवारी अवलंबून असते आणि, ते कोर्ट ठरवतं.” सारंग सर म्हणाले, “आणि कोण किती जवळचा आहे, हे ठरवण्याची पद्धत सुद्धा स्पष्ट दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त वारसदार शोधून काढायचे आहेत.”

किरीट काही विचार करत होता, तो म्हणाला “सारंग, जर विनायकरावांच्या मुलांशी आपला संपर्क प्रस्थापित झाला, तर इतरांचा शोध घेण्याची काय आवश्यकता आहे? कारण तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती दोघं प्रथम हक्कदार आहेत.”

“मी मघाशीच सांगितलं ना, की जर विनायकरावांनी मृत्यूपत्र केलं असतं, तर काहीच प्रश्न नव्हता. पण तसं नसल्यामुळे आपल्याला, शोध घ्यावाच लागणार आहे. समजा, आपण शोध न घेता हस्तांतरण करून टाकलं, आणि नंतर जर कोणी दावेदार उभा राहिला, तर आपण काय करायचं?” सारंग सर म्हणाले.

“म्हणजे तपास कामाला पर्याय नाही. निशांत, हे सगळे धागे दोरे तुला जुळवावेच लागणार आहेत. आणि असं असेल तर कृपया शॉर्ट कट घेऊ नकोस. प्रामाणिकपणे काम कर.” किरीट म्हणाला.

“दोन गोष्टी आहेत, त्या नीट लक्षात घ्या,” पुन्हा सारंग सर म्हणाले, “ एक तर विनायकरावांची अशीच इच्छा होती की आपण वारसदारांचा शोध घ्यावा म्हणून. आणि आम्हाला ते वडीलांसमान होते, त्यामुळे त्यांच्या इच्छे अनुसारच सर्व काही होईल. काय किरीट?”

“एकदम बरोबर. असंच करू.” – किरीट.

“दुसरी गोष्ट म्हणजे, आपण जे काही शोध कार्य करू, त्या कामाचं पूर्ण विवरण, आणि  समोर आलेल्या  वारसदारांची  सत्यता पडताळणी आणि त्याची पद्धत, हे सर्व  कोर्टाला सादर करावं लागणार आहे त्याशिवाय कोर्ट ऐकणार नाही.

त्यामुळे निशांत, कामाला सुरवात केल्यानंतर, म्हणजे आज पासूनच, अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा न वगळता, तू तारीखवार डायरी लिहायला सुरवात कर. ते एक महत्वाचं डॉक्युमेंट असणार आहे.”

“ठीक आहे. मी आज पासूनच डायरी लिहायला सुरवात करतो. बरं, खर्च करण्याच्या बाबतीत काही मर्यादा आहेत का?” निशांतने विचारले.

“म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला?” किरीटने विचारले. खर्च हा त्याचा विषय होता.

“काय आहे, इन्वेस्टिगेशन मधे, बऱ्याच वेळेस, असे खर्च होतात की ज्यांचे रिजल्ट्स आपल्याला हवे तसे मिळत नाहीत. म्हणजे एका अर्थाने पैसे पाण्यातच जातात. पण  अश्या कामांमध्ये दूरचा विचार करून असे खर्च करण्याचे धोके पत्करावेच लागतात. साधारण पणे असे खर्च छोटेच असतात, आणि चर्चा करायला वेळ नसतो. पण असे छोटे, छोटे खर्च मिळून मोठी रक्कम होते, म्हणून विचारलं.” निशांतने आपली भूमिका स्पष्ट केली.

किरीटने सारंग कडे बघितलं, आणि म्हणाला, “साधारण छोटे खर्च म्हणजे काय समजायचं आम्ही?”

“एका वेळी दोन हजाराच्या आतले. म्हणजे १०० रुपयांपासून २००० पर्यन्त.” – निशांत.

“ठीक आहे, प्रमाणात खर्च करायला आमची काहीच हरकत नाही. पण खर्च करतांना जरा सावधगिरी बाळगली तर बरं होईल, नाहीतर मालमत्ता १०० रुपयांची आणि खर्च ५० रुपये, असं नको व्हायला.”

“नाही, असं नाही होणार, ६० टक्क्यांच्या वर खात्री पटल्याशिवाय, आम्ही खर्च करतच नाही. तुम्ही निश्चिंत रहा.” निशांत म्हणाला.

“ठीक तर मग. किरीट, तुला काही विचारायचं असेल तर विचार नाहीतर ही मीटिंग आपण संपवू. आम्हाला अपडेट देत रहा.” सारंग सरांनी समारोप केला.

किरीटला काही विचारायचं नव्हतं म्हणून त्याने पण संमती दर्शक मान हलवली.

“ओके” असं म्हणून निशांत तेथून निघाला. राव साहेबांकडे जाऊन त्यांना मीटिंग चा वृत्तांत दिला, आणि मग तिथूनच मेस मधे जाऊन जेवण झाल्यावर रात्री, पुढच्या कामाची सुरवात कशी करायची यांचा आराखडा बनवायला बसला.

दुसऱ्या दिवसांपासून निशांतनी कामाला सुरवात केली. सर्व प्रथम तो कामठीच्या  मिलिटरी हेड क्वार्टर ऑफिस मधे गेला, आणि त्यांना अविनाशबद्दल विचारलं.

“साहेब, हे २००० साल सुरू आहे, तुमचा माणूस १९७१ साली बेपत्ता झाला असं म्हणता, तुम्ही ३० वर्षांपूर्वीची माहिती विचारता आहात, थोडा वेळ लागेल, शोधून सांगतो. पण इतक्यात तरी कोणाचीच माहिती आल्याचं आठवत नाही. पण तरी मी प्रयत्न करतो. मला एक दोन दिवस द्या.” ऑफिस मधला अधिकारी म्हणाला.

निशांत मग “ ठीक आहे मी परवा येतो” असं सांगून तेथून निघतच होता, की त्या अधिकाऱ्याने थांबवलं, म्हणाला,  

“इतक्या वर्षात तुम्ही जो काही पत्र व्यवहार आमच्या ऑफिसशी केला असेल तो पण घेऊन या, आमच्या ऑफिस मधून तुम्हाला काही माहिती दिली असेल तर ती पण घेऊन या. बरं, हे श्री अविनाश जवान म्हणून रुजू झाले, की ऑफिसर म्हणून, हे कळलं तर शोधायला खूप मदत होईल.”

निशांतला आठवलं की सारंग सर एकदा म्हणाले होते की अविनाश सेकंड लेफ्टनंट म्हणून आर्मीत जॉइन झाला होता, नक्कीच त्यांना केंव्हातरी विनायकरावांनी सांगितलं असेल. म्हणून तो म्हणाला,

“ऑफिसर, सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते.” त्या अधिकाऱ्याने ते लिहून घेतलं, आणि विचारलं की,

“बांग्लादेश सीमेवर होते की पाकिस्तान सीमेवर?” याचं उत्तर निशांत जवळ नव्हतं म्हणून तो म्हणाला की, “माहीत नाही. पण तुमच्या रेकॉर्डस वर असेलच न.”

यावर तो अधिकारी म्हणाला की, “ठीक आहे, बघतो मी. या तुम्ही आता.” 

नागपूरहून कामठीला जाणं, येणं आणि ऑफिस मधे घालवलेला वेळ, यातच पूर्ण दिवस मोडला. निशांत घरी आला.

दुसऱ्या दिवशी तो विचार करत होता की, आता दोन दिवस वेळ आहे, तसंही व्यंकटेश आणि सौमित्र यांचा तपास करायचा होताच, मग निशांतने पासपोर्ट ऑफिस कडे मोर्चा वळवला. तिथे त्याला फारशी माहिती तर मिळाली नाही, पण एक  माणूस भेटला. तो एक एजंट होता, म्हणाला, “मी बघतो, काही माहिती मिळाली तर.” त्यांनी दोन तीन दिवसांनंतर भेटायला सांगितलं. “पण साहेब, मी काम करण्याची फी घेतो. सर्विस चार्ज.” निशांतला काहीच प्रॉब्लेम नव्हता, म्हणाला,

“ठीक आहे न, तुम्ही माहिती गोळा करा, मी तुमची जी काही फी असेल ती देईन. चिंता करू नका. हे शंभर रुपये ठेवा, अडवांस म्हणून. मी केंव्हा येऊ? आणि कुठे भेटू तुम्हाला?”

  

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com