भाग २ दाराबाहेरचे ठसे
निखिल काही क्षण पलंगावर बसून त्या बाहुलीकडे पाहत राहिला. खोलीत इतकी शांतता होती की त्याला स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. बाहुली पलंगाच्या एका कोपऱ्यात बसली होती. तिचं काळं डोकं किंचित खाली झुकलेलं होतं. चेहऱ्यावर डोळे नव्हते, तरी निखिलला ती आपल्याकडेच पाहत असल्याची जाणीव होत होती.त्याने हळूच मोबाईल हातात घेतला आणि टॉर्च तिच्या चेहऱ्यावर टाकली. प्रकाश पडताच बाहुलीच्या डोळ्यांच्या जागी असलेले दोन काळे खड्डे अधिक खोल दिसू लागले. त्या काळोखात काहीतरी हलल्यासारखं त्याला जाणवलं. निखिलने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं. आता तिथे काहीच नव्हतं.त्याने स्वतःला समजावलं की भीतीमुळे त्याला भास होत आहेत. पण त्याच वेळी बाहुलीच्या शिवलेल्या तोंडातून एक अतिशय हलका आवाज आला.खररर.निखिलच्या अंगावर काटा आला.त्याने बाहुलीला हात लावला नाही. तो पलंगाच्या दुसऱ्या टोकाला सरकला. काही क्षणांनी बाहेरच्या अंगणातून वारा वाहू लागला. खिडकीची जुनी कडी हलू लागली. पडदा हळूहळू फुगत होता. खिडकी बंद होती, तरी खोलीत अचानक गारवा पसरला.निखिलने मोबाईलमध्ये वेळ पाहिली.दोन वाजून एकोणवीस मिनिटं झाली होती.त्याला अचानक बाहेरून पुन्हा आवाज ऐकू आला.टक.मग दुसरा आवाज.टक.जणू कुणीतरी घराच्या मागच्या भिंतीवर बोटांनी हळूच टकटक करत होतं.निखिल उठला नाही.आवाज हळूहळू खिडकीजवळ आला.टक.टक.टक.आता तो अगदी खिडकीच्या काचेच्या पलीकडून येत होता.निखिलने त्या दिशेने पाहिलं.पडदा हलत होता.त्याच्या मागे काळोख होता.काही क्षण त्याला तिथे एक चेहरा दिसल्यासारखं वाटलं.लहान चेहरा.पांढरट चेहरा.डोळे मात्र काळे.निखिलच्या तोंडून आवाज निघाला नाही.तो चेहरा क्षणभर तसाच राहिला आणि अचानक नाहीसा झाला.निखिलने घाईघाईने लाईट लावली.खिडकी रिकामी होती.तो हळूहळू खिडकीजवळ गेला. काचेला हात लावला. काच बर्फासारखी थंड झाली होती जणू कोणीतरी थंड वस्तू काचेला लावली होती त्याने पडदा बाजूला केला.बाहेर कोणीही नव्हतं.पण खिडकीच्या बाहेरच्या चिखलात दोन लहान पावलांचे ठसे होते.ते ठसे खिडकीखाली येऊन थांबले होते.निखिल काही क्षण ते पाहत राहिला.घराभोवती भिंत होती. खिडकीच्या खाली मोकळी जागा होती. तिथे जाण्यासाठी मागच्या बाजूने फिरावं लागलं असतं.मग ते ठसे तिथे आले कसे.निखिलने खिडकी बंद केली आणि मागे वळला.बाहुली पलंगावर नव्हती.त्याचा श्वास अडकला.भीतीची लहर पूर्ण अंगातून गेली त्याला घाम फुटला.त्याने खोलीभर पाहिलं.पलंगाखाली पाहिलं.कपाटाजवळ पाहिलं.खिडकीखाली पाहिलं.काळी बाहुली कुठेच नव्हती.तेवढ्यात त्याच्या कानाजवळ अगदी हलका श्वास ऐकू आला.निखिल जागच्या जागी गोठला. भीतीने जणू त्याचा प्राण कंठात आल्यासारखं त्याला वाटल.कुणीतरी अगदी त्याच्या मागे उभं असल्यासारखं वाटत होतं.त्याने मान वळवली नाही.काही क्षण त्याने श्वास रोखून धरला.मग हळूच मागे पाहिलं.कोणीच नव्हतं.पण पलंगाच्या खाली काळ्या रंगाचा छोटासा कपडा दिसत होता.निखिल खाली वाकला नाही.त्याला त्या कपड्याजवळ जाण्याची हिंमत होत नव्हती.अचानक पंलगाखालून एक आवाज आला.टक.निखिल मागे सरकला.पुन्हा आवाज आला.टक.आता त्याला खात्री झाली की तो आवाज पलंगाखालूनच येत होता.त्याने मोबाईलची टॉर्च चालू करून पलंगाखाली पाहिले काळोखात काहीतरी चमकलं.निखिलने फोन आणखी पुढे केला.दोन काळे खड्डे त्याच्याकडे पाहत होते.बाहुली पलंगाखाली पडली होती.पण यावेळी तिचं तोंड वेगळं दिसत होतं.लाल धागा अर्धा सुटला होता.जणू कुणीतरी तो आतून ओढत होतं.निखिल मागे सरकला.त्याच क्षणी घराच्या बाहेरून एक किंकाळीसारखा आवाज आला.ती किंकाळी खूप दूरून आली होती, पण पुढच्या क्षणी ती तो आवाज अगदी दाराबाहेरून ऐकू आला.निखिलने कानांवर हात ठेवले.घरातले सगळे लोक झोपले होते.आजीच्या खोलीतून मात्र काहीतरी पडल्याचा आवाज आला.धाड.निखिल धावत बाहेर आला.आजीच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता.त्याने दरवाजा ढकलला.आजी पलंगावर बसलेली होती.तिचा चेहरा पांढरा पडला होता.निखिलला पाहताच ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.मग तिची नजर त्याच्या हातातल्या मोबाईलकडे गेली.ती कुजबुजली, तू ती वस्तू घरात आणलीस.निखिल थबकला तुला कसं माहीत.आजीने उत्तर दिलं नाही.ती फक्त दाराकडे पाहत राहिली.निखिलने विचारलं, आजी, तुला त्या बाहुलीबद्दल माहिती आहे का.आजीच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली.तिने निखिलचा हात घट्ट पकडला.आणि फक्त इतकंच बोलली ती बाहुली बाहेर फेकून दे.निखिल काही बोलणार इतक्यात आजीने त्याला जवळ ओढलं.पण जाळू नकोस.निखिलच्या अंगावर पुन्हा शहारा आला.आजीने पुढे काही बोलायचा प्रयत्न केला, पण तिचे ओठ थरथरले.मग अचानक तिने दाराकडे पाहिलं.निखिलनेही मागे वळून पाहिलं.दाराबाहेर काळोख होता.पण त्या काळोखात जमिनीवर दोन लहान पावलांचे ठसे दिसत होते.एक ठसा.मग दुसरा.मग आणखी एक.ते ठसे हळूहळू आजीच्या खोलीच्या दिशेने येत होते.निखिल आणि आजी दोघेही न बोलता त्या ठशांकडे पाहत राहिले.ठसे दरवाजापाशी येऊन थांबले.काही क्षण काहीच घडलं नाही.मग दरवाजाच्या बाहेरून एका मुलीचा अतिशय हलका आवाज आला.आजी.आजीचा चेहरा पाहताच निखिलच्या लक्षात आलं की ती त्या आवाजाला ओळखत होती.आजीने निखिलचा हात आणखी घट्ट पकडला.तिच्या डोळ्यांत अश्रू आले.ती कुजबुजली, हे नाव पुन्हा ऐकायचं नव्हतं.निखिलने विचारलं, कोण आहे ती.आजीने त्याच्याकडे पाहिलं.तिचे ओठ हलले, पण आवाज बाहेर आला नाही.दाराबाहेरून पुन्हा आवाज आला.जीआजी, मी आले.आजी अचानक पलंगावरून उठली आणि दरवाज्याकडे धावली.निखिलने तिला पकडलं.आजी, दार उघडू नकोस.आजीने त्याच्याकडे पाहिलं.तिच्या डोळ्यांत एवढी भीती होती की निखिलच्या अंगातलं सगळं बळ निघून गेलं.ती म्हणाली, ती दाराबाहेर नाही.निखिल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.मग आजीने थरथरत बोट पलंगाखाली दाखवलं.ती तिथे आहे.निखिलने हळूच पलंगाखाली पाहिलं.बाहुली तिथे नव्हती.पण काळ्या मातीने माखलेली एक छोटी पावलांची जोडी तिथे पडली होती.त्या पावलांच्या खुणा पलंगाखालून बाहेर येत होत्या.आणि त्या सरळ आजीच्या पलंगापर्यंत गेल्या होत्या.निखिलच्या अंगावर शहारे आले.अचानक घराच्या बाहेरून जोरात वारा सुटला.खिडक्या आपटू लागल्या.दरवाजा थरथरू लागला.दिवा बंद झाला.संपूर्ण खोली काळोखात बुडाली.निखिलने मोबाईलची टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला.पण मोबाईल सुरू झाला नाही.आजीने त्याचा हात पकडला.दोघेही अंधारात उभे होते.मग त्यांच्या मागून अगदी हळू आवाज आला.खररर.निखिलने हळूच मागे पाहिलं.अंधारात दोन बारीक पांढरे ठिपके चमकत होते.ते जमिनीपासून फार उंच नव्हते.कुणीतरी खाली बसलं होतं.निखिलचा श्वास थांबला.ते दोन पांढरे ठिपके हळूहळू वर आले.मग काळोखात बाहुलीचा चेहरा दिसला.ती जमिनीवर नव्हती.ती आजीच्या पलंगावर बसली होती.आणि तिचं शिवलेलं तोंड आता पूर्णपणे उघडलं होतं.त्या काळ्या तोंडातून मुलीचा आवाज बाहेर आला.निखिल, तू मला का बाहेर काढलं.निखिल मागे सरकला.आजीने डोळे घट्ट मिटले.बाहुलीच्या चेहऱ्यावरचे काळे खड्डे निखिलकडे स्थिर झाले.मग ती हळूहळू मान वाकवून आजीकडे पाहू लागली.आजीने अचानक डोळे उघडले.तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती.फक्त जुना अपराध आणि पश्चात्ताप होता.ती हळू आवाजात म्हणाली, निखिल, आता तुला सगळं सांगावंच लागेल.तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर तीन जोरदार टकटक झाली.धाड.धाड.धाड.आणि दरवाजाच्या पलीकडून एका मुलीचा आवाज आला.आजी, दरवाजा उघड.मी माझी बाहुली घ्यायला आले आहे.क्रमश: