Swarajya in the soil in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मातीतील स्वराज्य

Featured Books
Categories
Share

मातीतील स्वराज्य

मातीतील स्वराज्य या पुस्तकाविषयी 

        तलवार गंजेल, पण झोळी कधीच रिकामी होणार नाही. ही गोष्ट किल्ले जिंकणाऱ्यांची नाही. ही गोष्ट किल्ले जगवणाऱ्यांची आहे. डोणजे, सिंहगडाच्या पायथ्याचं एक गाव. इतिहासात ज्याची नोंद नाही. तिथे राहत होत्या दोन महिला, गोदावरी आणि सई. एक जिनं तानाजीला भाकरी दिली, एक जिनं संभाजी गेल्यावर स्वराज्याची कोठी सांभाळली.
        त्यांना तलवार चालवता येत नव्हती. त्यांना राजकारण कळत नव्हतं. त्यांना फक्त एकच कळत होतं, मावळा उपाशी लढू राहू नये. सन १६६५ ला मुघलांनी त्यांना पुरंदरच्या बुरुजाला बांधलं. समाजाने त्यांना विधवा म्हणून नाकारलं. इतिहासाने त्यांची नोंदही ठेवली नाही. पण त्यांनी एक झोळी शिवली. त्या झोळीतूनच चाळीस वर्षं स्वराज्य जगलं. ही कादंबरी आहे त्या महिलेच्या कर्तृत्वाची. ज्यांच्यात स्वराज्यनिष्ठा होती. ज्याची सुरुवात जी गोदावरीने केली, सईनं त्यात शंभर पावलं भर टाकली आणि पुरंदरीनं ती मुहूर्तमेढ पुढे नेली. ही शिवाजी महाराजांच्या विजयाची गोष्ट नाही, तर त्यांच्या विजयामागच्या महिलेच्या नेतृत्वाची गोष्ट आहे. ही वास्तविक कथा आहे. परंतु या कथेला काल्पनिकतेची जोड दिली आहे. त्यामुळंच काही शंका उत्पन्न झाल्यास ही काल्पनिक कथा म्हणून सोडून द्यावे. ही विनंती.
         इतिहास नेहमी राजे, किल्ले आणि लढायांची नोंद ठेवतो. पण ज्या अदृश्य हातांनी तो इतिहास घडवला जातो, त्यांची नोंद तो कधीच ठेवत नाही.
        शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खरा पाया हा हेरगिरीवर उभा होता. बहिर्जी नाईक हे नाव आपल्याला माहित आहे, पण बहिर्जींनी घडवलेल्या शेकडो अनामिक हेरांची नावे आपल्याला माहित नाहीत. त्यातही स्त्री-हेरांची नावे तर अजिबातच नाहीत.
        गोदावरी व सई ही अशाच एका अनामिक स्त्री-हेराची काल्पनिक प्रतिनिधी आहे. ती डोणजे गावची रहिवाशी होती. तिची गोष्ट म्हणजे प्रश्न आहे. स्वराज्यासाठी घर सोडणारी स्त्री, समाजाला का चालत नाही? तिच्या हळदीच्या चोळीची किंमत फक्त तिलाच का मोजावी लागते? ही कादंबरी त्या सगळ्या गोदावरींना समर्पित, ज्यांनी स्वराज्य जिंकून दिलं, पण स्वतःचं आयुष्य हरवलं.                                                                                                 
           शिवकाळातील हेरगिरी कशी चालायची? यावर बऱ्याच विचारवंतांनी आपआपला परामर्श दिलाय. शिवरायांच्या हेरखात्याला आजच्या भाषेत `Intelligence Bureau` म्हणता येईल. त्याचे तीन प्रमुख प्रकार होते.
        १. बहिर्जी नाईकांचे उघड हेर: - हे वेश बदलून थेट शत्रूच्या छावणीत जायचे. गोसावी, बैरागी, भिकारी, वासुदेव असे वेश घ्यायचे.
         २. स्त्री-हेरांचे जाळे:- हे सगळ्यात प्रभावी होते. कारण स्त्रियांवर कोणी संशय घेत नसे. त्या भाजी, मीठ, मसाला विकण्याच्या बहाण्याने, किंवा नाचणारी, गाणारी म्हणून गडावर जायच्या. स्वयंपाकघरात, धान्याच्या कोठारात, शस्त्रागारात काय शिजतंय, याची इत्यंभूत माहिती त्या काढायच्या. 
        ३. सांकेतिक भाषा:- निरोप कधीच सरळ नसे. कधी भाकरीत चिठ्ठी, कधी घोड्याच्या नालेत, कधी अभंगाच्या ओवीत निरोप लपवलेला असे. गोदावरीस भेटायला आलेला "वऱ्हाडी बनून आलेला दूत" हा त्या काळच्या पद्धतीला धरूनच आहे.
         पुरंदरचा घाट त्या काळी व्यापारी आणि लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. स्थानिक वाटाड्याशिवाय भर पावसात घाट चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असे. त्यामुळे गोदावरीसारखी वाटाड्या-हेर असणे ही स्वराज्यासाठी जीव की प्राण ही गोष्ट होती. म्हणूनच गोदावरीने दाखवलेली वाट ही फक्त वाट नव्हती, तर ती स्वराज्याच्या विजयाची वाट होती.
            गोदावरी ही सामान्य स्री. तिनं जी मदत केली. ती अतिशय मोलाची गोष्ट होती.

                                             आपला नम्र 
                                          अंकुश शिंगाडे नागपूर 

*मातीतील स्वराज्य (कादंबरी)*
*अंकुश शिंगाडे 

         डोणजे गाव पुण्याच्या नैऋत्येला, खडकवासला धरणाच्या पाठीवर. कोंढाण्याच्या पायथ्याच्या खाली. गावाच्या पारावरून किंवा शेताच्या बांधावरून आग्नेयेला पाहिलं की पुरंदर दिसतो. जवळ नाही, साधारण २०-२२ किलोमीटरवर, स्वच्छ हवा असेल तर त्याची दोन टोकं स्पष्ट दिसतात. उजवीकडे उंच बालेकिल्ला आणि डावीकडे पसरलेली माची. त्याच्याच शेजारी चिकटून उभा असलेला वज्रगड, दोघांमधली ती खिंड दुरूनही कळते. सकाळी तो उजळ दिसतो, दुपारी उन्हात तपकिरी आणि पावसाळ्यात तर अर्धा अधिक ढगात गायब.
         गोदावरीसाठी पुरंदर हा किल्ला नव्हताच कधी. तो तिच्या गावाचा एक कोपरा होता. लहानपणी आजी म्हणायची, "तो बघ, इंद्राचा डोंगर. पुरंदर." तेव्हापासून तिला वाटायचं, त्या डोंगरावर कोणीतरी अजूनही पहारा देतंय. तिला आठवायचे ते आजीचे बोल. आजी म्हणायची, "एक बाजू सोडली तर सगळीकडून कडाच कडा आहेत त्या गडाला." गोदावरीला हसू यायचं. तिच्या स्वतःच्या आयुष्यासारखंच हसू. एकच बाजू उघडी, जिथून थोडं ऊन, थोडी हवा येते. बाकी सगळीकडून बंद. म्हणूनच ती रोज कोंढाण्याचा कडा चढून दारात उभी राहून पुरंदरकडे पाहायची. तो अजूनही उभा आहे, म्हणजे आपणही उभं असेल, असं तिला वाटायचं.
          कोंढाणाही तसाच किल्ला होता. पुरंदरसारखाच. वर कातळावर गेलं की स्वर्गच वाटायचा.त्या किल्ल्यानं पुण्यालआ सुशोभित केलं होतं. आज मात्र तो परकीयांच्या ताब्यात होता. जे परकीय गोदावरीच नाही तर आसपासच्या गावच्या लोकांनाही गडावर येवू देत नसत.
          गोदावरी...... गोदावरी एक सामान्य घरची महिला. परंतु स्वराज्याच्या ध्येयानं ग्रासलेली. ती गरीब होती. परंतु तिनं जे काही केलं. ते स्वराज्याच्या हितासाठी सोईचं झालं होतं. ती स्वराज्याची हेर नव्हती. ना ही तिला तिच्या कामगीरीचं वेतन मिळत असे. तरीही ती मदत करीत असे. स्वराज्यालाच नाही, तर स्वराज्यातील माणसांना. निष्पक्षपाती व निःस्वार्थ हेतूनं. परंतु तिचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं नाही. कारण एकतर ती महिला होती. अन् दुसरं म्हणजे ती गरीब होती. 
           तो काळ व त्या काळात पुरुसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. महिलांना विशेष असं प्राधान्य नव्हतं. अशाच काळात गोदावरीसारखी महिला पुढे आली की जिच्यामुळं स्वराज्य उभं करण्याला शिवरायांना मदत झाली होती. ती जर पुढे आली नसती तर स्वराज्य उभं करायला शिवरायांना थोडी अडचणच आली असती. हे विसरता येत नाही.

*******************************************

         'मीच तो कोंढाणा. शेकडो वर्षं उभा आहे इथं.' कोंढाणा किल्ला विचार करु लागला. 
          'पुण्याकडे पाहतोय. माझ्या अंगावर किती पाय लागले. याचा विचार नाही. कधी यादव आले, कधी बहामनी, कधी मुघल. प्रत्येकानं माझं नाव बदललं, माझा बुरूज पाडला, पुन्हा बांधला. पण मी कोणाचा झालो नाही. मग एक दिवस एक वारा आला. त्या वाऱ्याचं नाव होतं शिवबा. त्याने मला पहिल्यांदा विचारलं, "तू कोणाचा?" मी म्हणालो, "मी रयतेचा." तेव्हापासून मी त्याचाच झालो.
        मग बादशहाने उदेभान पाठवला. त्याने माझ्या कल्याण दरवाजाला कुलूप लावलं. डोणज्याच्या गोदावरीसारख्या पोरींना वर येऊ दिलं नाही.
माझ्या देवटाक्यातलं पाणी आटू लागलं. मी गुदमरू लागलो. मला वाटलं, आता संपलं. पण...... पण त्या रात्री, अमावस्येच्या रात्री, माझ्या पाठीवर जिथं कोणी हातही लावत नाही त्या डोणगिरी कड्यावर काहीतरी सरसरलं. एका घोरपडेचा हात व त्याच्या मागे एक हात. त्या हातामागे एक सिंह. तानाजी नावाचा. तो चढला, मागच्या कड्यावरुन. एकटा नाही, तीनशे मावळ्यांना घेऊन.
माझा कातळ ओरबाडला गेला, पण मला दुखलं नाही. मला मोकळं वाटलं. वर झेंडा बुरुजाजवळ तो आणि उदेभान भिडले. मी पाहिलं. दोन वाघांची झुंज. रक्त माझ्या अंगावर सांडलं. पण ते रक्त घाण नव्हतं, तो गुलाल होता.
         तानाजी पडला. त्याच क्षणी मला कळलं, मी आता फक्त कातळ नाही राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिवबा आला आणि म्हणाला, "गड आला, पण सिंह गेला" तेव्हापासून लोक मला कोंढाणा म्हणत नाहीत.
ते म्हणतात, सिंहगड आणि हो, ती गोदावरी अजूनही खालून वर पाहते. तिलाही वाटतं की मी किल्ला आहे. पण मी तर फक्त एक साक्षीदार आहे. त्या प्रत्येक क्षणाचा. मात्र मला आजही दुःख वाटतं. एका लग्नाची गोष्ट अर्धवट राहिली आणि एका स्वराज्याची गोष्ट पूर्ण झाली, याचं.
          तो कोंढाणा जिंकण्याचा बेत. त्याचं नियोजन शिवरायांना करायचं होतं. त्यासाठी स्वतः पुढाकार घेवून शिवरायांनी तानाजी व बहिर्जी यांना विचारविमर्श करण्यासाठी बोलावलं होतं. शिवरायांच्या मनात विचार होते. कोंढाणा घ्यायचा. काय करायचं. तोच ते तानाजीला म्हणाले,
          "तानाजी, तुला का बोलावलंय कळलं का?"
          "नाही महाराज. निरोप आला आपला कोंढाण्याविषयी, लगेच आलो. रायबाचं लगीन उद्या आहे, पण आधी आपली भेट महत्वाची होती. म्हणूनच आलोय मी."
            "कोंढाणा... अजूनही डोळ्यात सलतोय रे. तो गड मुघलांच्या हातात आहे. उदयभान बसलाय तिथे. रयत घाबरली आहे."
            "बोला महाराज, काय हुकूम आहे?"
            "तुला पाठवायचं मन होत नाही. उद्या तुझ्या पोराचं लगीन. पण दुसरा कोणी या कड्याने चढू शकणार नाही तुझ्याशिवाय. असं वाटतंय. म्हणूनच बोलावलंय तुला."
         "महाराज, लग्नाची पंगत थांबेल, पण स्वराज्याचं काम थांबणार नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं."
          ते तानाजीचं बोलणं. त्यावर जिजामाता म्हणाल्या.
         "शाब्बास तानाजी. स्वराज्यात आपल्यासाठीच माणसं आहेत. म्हणूनच स्वराज्य घडत चाललंय. माहित आहे तानाजी, आपल्या कार्याची इतिहासात नोंद होईलच. जेव्हापर्यंत सृष्टी असेल, तेव्हापर्यंत आपलेही नाव चालत राहणार."
           "मासाहेब, माझी इतिहासात नोंद होवो अगर न होवो. आम्ही स्वराज्याच्या कामी येणं. ही महत्वाची गोष्ट आहे. आपण निश्चींत असावे. आम्ही फक्त आमचं कर्तव्य करतोय."
         "धन्य तानाजी. आपण शंभू महादेवाला नमन करा व आपल्या कार्याला सुरुवात करा. आई, भवानी आपल्या पाठीशी आहे. जगदंब."
          मासाहेब जिजाबाईचं बोलणं संपलं होतं. तोच बहिर्जी म्हणाले,
           "महाराज, मी डोणज्याहून आलोय. कोंढाण्याची खबर आणलीय."
           "बोल बहिर्जी. काय खबर आहे, कोंढाण्याची?"
           "गडावर पाचशे लोकं आहेत. दोन दरवाजे आहेत. कल्याण दरवाजा बंद असतो. पण मागचा डोणगिरी कडा मोकळा आहे. तिथं पहारा नाही. एका पोरीनं म्हणजे गोदावरीनं वाट दाखवलीय. उंबराच्या झाडाजवळचा रस्ता दाखवलाय. म्हणे याच रस्त्यानं चढा. मी तुम्हाला एक चांगला माणूस देईल."
            "गोदावरी? कोण गोदावरी? तीच का की जिनं पुरंदर लढतेवेळेस मुरारबाजींना भाकरी पुरवली होती."
           "होय महाराज, तीच ती. डोणज्याची एक तरुण पोर. अठ्ठावीस वर्षाची आहे आता. गुरं चारते कोंढाण्यावर. तिलाच सगळ्या वाटा माहिती आहेत."
          "परंतु ती एक महिला आहे. तिच्याकडून रात्रीच्या वेळेस मदतीची अपेक्षा कशी करणार आपण?"
          "महाराज, मग वाट मोकळी आहे. मला तीनशे मावळे द्या. नवमीला चढतो."
            "नाही बहिर्जी. आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचाय. तो पल्ला गाठणं आपल्याशिवाय शक्य नाही. आपण स्वराज्याचे मुख्य गुप्तहेर आहात. आपल्याला गमवून कसं चालेल. आपण तानाजींनाच जावू द्यावे."
          शिवरायांचं बहिर्जीला बोलणं. त्यावर बहिर्जी चूप बसले. तसे शिवराय तानाजीला म्हणाले,
         "तानाजी, कडा अवघड आहे. उदयभान तयार असेल. विचार करा."
          शिवरायांचं ते बोलणं. त्यावर तानाजी म्हणाले,
         "महाराज, तुम्हीच तर शिकवलंत. अशक्य वाटतं तिथंच घाव घालायचा. मी जाईल आणि गड घेऊन येईल. नाही आलो तर सूर्याजी आहे, शेलारमामा आहेतच."
          "जा तर मग. जीव मानत नाही आमचा. तरीही जा म्हणावं लागतं. पण लक्षात ठेवा, गडापेक्षा तुम्ही मोठे आहात आम्हाला."
           "गड आला तर तुमचं नाव मोठं होईल महाराज. मी काय."
         ते तानाजी व शिवरायांचं बोलणं. त्यावर बहिर्जी मधातच तानाजीला म्हणाले,
         "सुभेदार, मी वाटेवर असेल. गडावर गंजी पेटली की राजगडाला कळवतो."
          ते बहिर्जीचं बोलणं. त्यावर शिवराय म्हणाले,
          "जा दोघेही. जगदंब तुमच्या पाठीशी आहे."
           त्यांचं बोलणं संपलं. तसे ते निघाले. तसा दुसरा दिवस उजळला होता.

*********************************************

           ते डोणजे गाव व त्या गावाजवळच्या जंगलातील ती सायंकाळ. फेब्रुवारी १६७० उजळलं. बहिर्जी झाडामागे लपला होता. तोच त्याला गोदावरीनं पाहिलं. तशी ती म्हणाली,
         "कोण आहे तिथं?"
         बहिर्जी झाडाआडून बाहेर आला. त्याच्या हातात काठी होती. खांद्यावर लाकडं होती. तसा तो म्हणाला.
           "थांब पोरी."
           "कोण रे तू? चोर का? आरडाओरडा करीन."
            "गप पोरी. मी चोर नाही. मी राजाचा माणूस. बहिर्जी नाईक. तुला मारायला नाही आलो. माहिती घ्यायला आलोय. नाव काय तुझं?"
           "मी गोदावरी आहे. डोणज्यातच राहते. तू राजाचा म्हणतोस ना? शिवाजी राजाचा?"
           "होय. वर कोंढाण्यावर उदयभान किती माणसं घेऊन आहे? दारू पितो का रात्री?"
            "कशाला हवी तुला ही माहिती?"
            "कोंढाणा जिंकायचाय."
            "तू खरंच राजाचा असशील तर सांगते. रोज संध्याकाळी त्याचे लोक कल्याण दरवाजाकडे जेवायला जातात. मागचा कडा रिकामा असतो. पण तिकडून कोणी चढू शकत नाही. कडा कातळाचा आहे."
           "चढणारा चढेल. तू फक्त सांग, वाट कुठून आहे? तुझ्यासारखी गुरं चारणारी पोरच वाट जाणणार."
           "वाट आहे. डोणगिरी कड्याच्या डाव्या बाजूला एक झाड आहे. तिथून दोर टाकला तर वर जातो. पण तुम्ही खरंच गड घेणार आहात का?"
           "त्याचा विचार करु नकोस. उद्या या वेळेपर्यंत गडावर भगवा लागलेला असेल. पण एक अट. उद्या रात्री कोणीही तिकडे फिरकायचं नाही. तू पण नाही."
           "मी नाही येणार. पण माझ्या गावाला काही होणार नाही ना? उदयभानचे लोक खूप वाईट आहेत."
            "पोरी, तुझं नाव काय म्हणालीस? गोदावरी? गोदावरी नदीसारखीच आहेस. दिसायला शांत, पण आतून खूप खोल. फार दूरचा विचार करतेस."
            "आणि तू?"
            "मी? मी वारा आहे. असतो सगळीकडे, दिसत नाही कुठे. जा आता आणि लक्षात ठेव. आज तू मला पाहिलंच नाहीस."
           "हो. मी कोणालाच पाहिलं नाही तुम्हाला."
           बहिर्जी, आल्या पावली निघून गेला. तो अंधारात गडप झाला. गोदावरीही लाकडं घेऊन डोणज्याच्या दिशेने निघून गेली होती. 
            डोणज्याची ती पायवाट होती. तसा दुसरा दिवस उजळला. बहिर्जी आज वेश बदलून गवत कापणारा बनला होता. तो आला. तसा तो गोदावरीला दिसला. तशी गोदावरी म्हणाली,
          "तू परत आलास? काल सायंकाळीच तर भेटलास."
           "काल सायंकाळी मी लाकडंवाला होतो, आता मी बहिर्जी आहे. मला कोंढाणा कळायला हवा, अगदी आतून. तू रोज वर दूध घालायला जाते ना?"
          "होय जाते. कल्याण दरवाजाने जाते. पण आत काय चालतं ते आम्हाला कोण सांगणार?"
            "तुला सगळं माहित आहे. तूच सांगणार. सांग, किल्ल्यावर किती दरवाजे आहेत?"
            "दोनच. एक पुण्याकडचा कल्याण दरवाजा आणि दुसरा कोकणाकडचा. कोकण दरवाजा नेहमी बंद असतो. कल्याण दरवाजालाच पहारा जास्त असतो."
           "आत सैनिक किती?"
           "पाचशेच्या वर. पण सगळे एका जागी नाहीत. अर्धे झेंडा बुरुजाजवळ, अर्धे सदरेवर. त्यांचा किल्लेदार. उदयभान, तो संध्याकाळी दारू पितो. त्याचं घर देवटाक्याजवळ आहे. रात्री तिथं कोणी जात नाही. परंतु हे तर कालच सांगीतलं. आता परत का विचारतोस?"
          "हे बघ, नियोजन करावं लागेल की नाही. चांगलं नियोजन करावं लागेल. तेव्हाच आपलं नियोजन चांगलं होईल व गड आपल्या ताब्यात येईल, म्हणून विचारायला आलोय परत. सांग मग मागची बाजू? जिथं कडा आहे?"
           "तिकडे कोणीच नसतं. कारण तिकडून चढणं अशक्य आहे असं त्यांना वाटतं. कातळ सरळ आहे, हाताला धरायला काही नाही. आम्ही पण तिकडे गुरं नेत नाही. पडली तर सरळ खाली."
          "अशक्य वाटतं तिथंच शक्य असतं. हीच तर आमची वाट. तिथं एखादं झाड, एखादी फट आहे का जिथं दोर अडकेल?"
         "आहे. कड्याच्या मधोमध एक उंबराचं झाड आहे. त्यालाच बांधता येतो दोर. माणूस वर जाईल असा. माझा बाप म्हणायचा, आधीचे मावळे तिकडूनच उतरायचे."
           "शाब्बास! उदयभान रात्री कुठे असतो ते पण सांगितलंस. आता एकच काम कर. उद्या नवमी आहे. तू संध्याकाळनंतर वर येऊ नकोस आणि गावात कोणाला सांगू नकोस आम्ही भेटलो ते."
           "गड घेणार तुम्ही?"
           "होय. गड घेणारच. कोंढाणा हा कोंढाणा राहणार नाही. उद्यापासून तो सिंहगड होईल आणि हे तुझ्यामुळेच होईल, गोदावरी. राजांना सांगीन, डोणज्यात एक गोदावरी आहे, जिच्यामुळे गडाची वाट सापडली."
          "मला काही नको. फक्त गड आमचा झाला की आम्हाला पुन्हा वर जाऊ द्या. उदेभाननं बंदी घातलीय आम्हाला. म्हणतो की गडावर फिरकायचं नाही. दही दूध विकायचं नाही. आमच्या पोटावरच मारलं त्यानं. जणू घावंच केलाय पोटावर त्यानं."
         "तुम्हालाही जाता येईल गडावर. आपली माणसं जाऊ देतील. हा गड आता आपल्या रयतेचा होईल."
          तानाजीनं बहिर्जीला कोंढाण्यावरील माहिती काढून आणायला लावली होती. तशी माहिती काढून बहिर्जी तानाजीला भेटले. म्हणाले,
            "तानाजी, उद्या कोंढाण्यावर निघायचं आहे. मी नुकतीच डोणज्याहून माहिती काढून आलोय."
            "बोल बहिर्जी, काय खबर आहे कोंढाण्याची? चढता येईल का गड आमास्नी?"
          "चढता येईल सुभेदार. पण कल्याण दरवाजाने नाही. परंतु......"
           "परंतु काय बहिर्जी. असं कोड्यात बोलू नका. लवकर सांगा. मला रायबाचंही लग्न करुन द्यायचं आहे. परंतु त्यापुर्वी कोंढाण्याचं लग्न करायचं आहे. म्हणूनच घाई झाली आणि उतावीळ झालोय मी."
          "परंतु मागून. डोणगिरी कड्याने. तिकडे पहारा नाही. उदेभानला वाटतं तिकडून कोणी येऊच शकत नाही."
          "कडा कसा आहे?"
          "सरळ कातळ. पण मधोमध एक उंबराचं झाड आहे. डोणज्याच्या एका पोरीनं सांगीतलं. गोदावरी नाव तिचं. तिनंच वाट दाखवली. ती म्हणाली तिच वाट चांगली."
           "गोदावरी?" 
           "होय गोदावरी. पायथ्याचीच राहते ती कोंढाण्याच्या. डोणजे गावात राहते. तिथूनच चढायचा आहे कडा. तिनंच सांगितलं की उदयभान संध्याकाळी दारू पितो. त्याचे अर्धे लोक झेंडा बुरुजावर, अर्धे सदरेवर असतात. रात्री दोन नंतर सगळे गाफील असतात."
         "माणसं किती लागतील?"
         "तीनशे बस. जास्त नेली तर चाहूल लागेल आणि सुभेदार."
           "बोल."
           "ही लढाई पाहिजे तेवढी सोपी नाही. कडा चढल्यावर लगेच लढाई. दमायला वेळ नाही. तुम्ही रायबाच्या लग्नासाठी थांबा म्हणता का राजांना?"
            "बहिर्जी, तू हेर आहेस, तू सगळं पाहतोस. पण काही गोष्टी नजरेने नाही, काळजाने कळतात. राजांनी मला हाक मारलीय. मी नकार देवू शकत नाही. तू फक्त सांग, वाट पक्की आहे ना?"
           "वाट पक्की आहे. गोदावरीची वाट आहे. ती चुकणार नाही."
           "बस्स. मग उद्या नवमीला निघू. तू पुढे राहशील. गडावर गंजी पेटली की राजगडावर इशारा दे."
           "आणि जर....."
           "जर काय बहिर्जी?"
           "अघटित घडलंच काही तर........"
            "जर मी नाही आलो, तर विचलीत होवू नका. माझा भाऊ सुर्याजी आहे. तोही वीरच आहे. स्वराज्यनिष्ठा त्याच्यातही आहेच. तो माझ्या पश्चात जिंकून घेईलच गड. तशी सुचना दिलीच आहे त्याला मी. तू फक्त सूर्याजीला सांगावे, गड सोडू नका. गड आलाच पाहिजे."
           "सुभेदार........"
           बहिर्जींच्या डोळ्यातून नकळत अश्रू गळले. तसा तानाजी म्हणाला,
           "चल भावूक नको होवूस. जय शिवराय म्हणू आणि निघू कामगिरीवर."
         बहिर्जीनं जय शिवराय म्हटलं. तानाजीनंही जय शिवराय, आधी लगीन कोंढाण्याचं, म्हटलं व ते दोघंही कोंढाण्याची कामगीरी करण्यासाठी तातडीनं निघाले होते.

*********************************************

           ती कोंढाण्याची मोहीम होती. शिवराय राजगडावर विचार करीत बसले होते. तशी ती कोंढाण्याच्या मोहिमेची दोन दिवसांपूर्वीची रात्रं होती.
          'उद्या नवमी आहे. उद्या कोंढाणा जिंकायचाय. नकाशा समोर आहे. कोंढाणा... माझ्या पुण्याच्या अगदी मानगुटीवर बसलेला वाघ. जोपर्यंत तो मोकळा आहे, तोपर्यंत पुणे मोकळं नाही. तोफा पडतील राजगडावरून. दिसतो तिथून. उदयभान बसलाय तिथं. ऐकलंय, मोठा योद्धा आहे. राजपूत. हट्टी आहे. तो किल्ला सोडणार नाही. मग कोण पाठवायचं? विचार करीत होतो. सगळ्यांची नावं घेतली. कोणी नको म्हणलं नाही. सगळे म्हणाले, आम्ही जातो. बहिर्जीही हो म्हणाला होता. मात्र मी तानाजीला बोलावलं नाही. त्याच्या पोराचं लगीन आहे. रायबाचं म्हणून. म्हटलं, जाऊ दे. एक माणूस सुट्टीवर राहिला तर काय बिघडतं. असा विचार करुन. पण तो आला. त्याला राहावलं नाही. तो तडक आला. म्हणाला,
         "राजं, आम्ही असताना दुसऱ्याला का पाठवता? आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं."
         मी काही बोललो नाही. मला माहिती होतं, तो ऐकणार नाही.
         आता तो गेलाय. तीनशे मावळे घेऊन. सोबत सूर्याजी, शेलार मामा. मला झोप येत नाही. माँसाहेब असत्या तर म्हणाल्या असत्या, "शिवबा, एवढा मोठा का झालास? लहान होतास तेव्हा एक किल्ला घेतला की आनंद व्हायचा. आता एक किल्ला घ्यायचा म्हटलं की काळजी वाटते." खरं आहे, मातोश्रीचं म्हणणं. कारण आता प्रत्येक किल्ल्यामागे एक माणूस जातो. एक घर रिकामं होतं. उद्या जर... जर तानाजी नाही आला तर? मी काय सांगू सावित्री वहिनींना? काय सांगू रायबाला? मी राजा आहे. राजाला हे विचार करायचे नसतात. राजाने फक्त गड बघायचा. माणसं नाही. पण मी शिवबा आधी आहे, राजा नंतर आहे. मातोश्रींनी सांगितलं होतं, 'स्वराज्य हे माणसांवर उभं असतं, कातळावर नाही.' उद्या जर कोंढाणा आला, तर आनंद होईल. पण त्या आनंदात एक भीती पण असेल. ती भीती मला आज झोपूच देत नाही. मात्र मी बहिर्जीला सांगितलंय, बातमी लवकर आण. देवी भवानी, उद्या नवमी आहे. अंधार आहे. पण माझ्या मावळ्यांना वाट दाखव आणि त्यांना परत पण आण.'
           शिवरायांचे ते विचार. त्यात सत्यता होती. कारण ते राजे नंतर. त्याआधी ते प्रजेला आपले नातेवाईकच समजायचे. त्यांच्याशी घरगुती संबंध ठेवायचे. नव्हे तर त्यांच्याशी एवढी जवळीक निर्माण करायचे की ते प्रत्येकाला आपल्या घरातीलच व परीवारातीलच वाटायचे. एवढी प्रजा त्याचेवर प्रेम करायची. ते प्रजेला हवेहवेसे वाटायचे. त्यातच त्यांनी कोणतीही कामगीरी सोपवली तरी नकार द्यायचे नाहीत. 
           आधल्या दिवसाची रात्र होती. तानाजी आणि गोदावरी यांचं बोलणं सुरु होतं. रात्रीचा तो प्रहर होता. डोणगिरी कड्याखाली सगळे उभे होते. मावळे अंधारात बसले होते. तशी ती नवमीचीच रात्र. काळाकुट्ट अंधार. रात्री दोन नंतर चंद्र नइघणार होता. तानाजीच्या मनात विचार होते. एवढ्यात तानाजी पुढे आला. समोर गोदावरी उभी होती. तिनं त्याला ओळखलं व म्हणाली.
           "तुम्ही तानाजी आहात ना?"
           "होय. मीच तानाजी आणि तू ती गोदावरी आहे ना?"
            "होय."
            "बहिर्जीने सांगितलं तुझ्याबद्दल."
           "होय मीच आहे गोदावरी आणि मीच सांगीतलं सगळं बहिर्जींना. परंतु तुम्ही ज्या कड्याने जाणार? त्या कड्यानं पडाल तुम्ही. हा कडा सरळ कातळ आहे. माझा बाप पण नाही चढला कधी."
           "पोरी, मी लग्नाच्या पंगतीवरून उठून आलोय. माझ्या पोराचं लगीन आहे उद्या. लोक म्हणतील, तानाजी पळाला. पण मी सांगितलंय. आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं. आता माघार नाही."
          "पण वर पाचशे लोक आहेत. तुम्ही तीनशेच आहात."
           "वर पाचशे आहेत, पण खाली राजाचं नाव आहे. बस्स. तू फक्त सांग, दोर कुठे टाकू?"
           "त्या उंबराच्या झाडाला बांधावा लागेल दोर. तिथूनच टाकावा लागेल दोर. त्याच झाडाला बांधावा लागेल दोर. तसा मी एक माणूस देते. पण लक्ष द्या, वर गेल्यावर उजवीकडे जाऊ नका, तिथे देवटाकं आहे, पाणी भरायला लोक असतात."
          "आता एवढ्या रात्री. एवढ्या रात्री तर सगळे झोपले असतीलच."
           "नाही. बरेचजण पहारेकरी रात्रीही गस्तीवर असतात. रात्रीही पाणी भरु शकतात ना."
           "कळलं आणि उदयभान? तो कुठं असतो?"
           "तो झेंडा बुरुजाजवळच्या वाड्यात राहतो. दारू पिऊन झोपला असेल आता."
          "जा आता तू. घरी जा. उद्या सकाळी गडावर भगवा दिसला तर समज, तुझ्या वाटेने आम्ही गेलो."
          "तुम्ही परत याल ना?"
          "गड आला तर नक्की येईन. तुझ्या हातचं दही-भाकरी खायला. नाही आलो तर समजायचं. समजायचं की काही अघटित घडलं."
          "असं नका बोलू."
          "जा पोरी. जय शिवराय."
          "जय शिवराय."
          "हं एक. मी माणूस देईल म्हणत होते."
          "ठीक आहे. चल तर मग त्याचेकडे."
          तानाजीनं म्हटलं. तशी ती त्यांना घेवून यशवंतरावाकडे निघून गेली होती.

*********************************************

          गोदावरी तेव्हा अवघी अठ्ठावीस वर्षांची, डोणज्याची. रोज पहाटे डोक्यावर दह्याची घागर घेऊन ती कोंढाण्यावर जायची. कोळीण म्हणून तिला कोणी अडवायचं नाही. ती दही विकायची, पण डोळ्यांनी टिपून घ्यायची. तिला कळलं होतं की नवमीच्या दोन दिवस आधी उदेभानच्या लोकांचं जेवण असतं. त्या दिवशी ते अफू खातात, दारू पितात. पहारा ढिला पडतो आणि दुसरं, कल्याण दरवाज्यावर पन्नास लोक आहेत, पण डोणज्याकडच्या पश्चिम कड्यावर एकही नाही. तिथे कातळ सरळ, नुसता काचा सारखा. मोगल म्हणायचे, तिथून भूतही चढणार नाही.
          गोदावरीने ही बातमी खाली पोचवली. तानाजीच्या माणसाला ओढ्यावर भेटून तिनं मातीत नकाशा काढला. 
          "इथं, या कपारीतून या. इथं झाड आहे, तिथं दोर बांधा. वर आल्यावर थेट सदरेत जाल, तिथंच उदेभान असतो."
             गोदावरीला पहिल्यांदा कुणकुण लागली ती माघाच्या सुरुवातीला. खाली घाटात काही अनोळखी मावळे फिरत होते. ते दुकानात जास्त खरेदी करायचे नाहीत, पण डोळ्यांनी किल्ल्याकडे सारखे पाहायचे. तिला कळलं, काहीतरी मोठं होणार आहे.
        ती रोज दह्याची घागर घेऊन वर जायची. त्या दोन आठवड्यात तिनं तीन गोष्टी हेरल्या. पहिली गोष्ट म्हणजे पहारा. पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाज्यावर दिवसभर पन्नास-साठ माणसं. पण पश्चिमेचा कडा, जो डोणज्याच्या अगदी समोर आहे, तिथं कोणीच नाही. तिथं वारा एवढा की मशाल पेटत नाही. मोगल लोक म्हणायचे, तिथून माणूस काय, वाघही चढू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उदेभान. तो दर नवमीला मोठी मेजवानी करतो. त्या दिवशी सगळे शिपाई दारू पितात, अफू खातात. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत गड झोपलेला असतो. तिसरी गोष्ट म्हणजे वाट. त्या पश्चिम कड्यावर एक झाड आहे, कड्याला चिकटलेलं. त्याच्या शेजारी एक छोटी घळ आहे. तिथे पाय ठेवायला जागा आहे. हे फक्त डोणज्याच्या लोकांनाच माहिती होतं.
         त्या दिवसांत गोदावरी रोज पहाटे दही-दूध घेऊन कोंढाण्यावर जायची. डोणजे पायथ्याचं गाव असल्याने वाटाड्याला कोणी अडवत नसे. वर मोगलांची शिबंदी होती. उदेभान राठोडचा पहारा कडक होता. गोदावरीच्या लक्षात आलं, कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाज्यावर पहारा जास्त आहे, पण डोणज्याच्या बाजूने असलेल्या काळकट कड्यावर कोणी फिरकतही नाही. तिथं वारा एवढा की मशाल विझून जाते. मोगलांना वाटायचं तिथून कोणी येऊच शकत नाही. त्याच वेळी खाली तानाजीचे हेर फिरत होते. एके दिवशी सांजेला तानाजीचा एक मावळा डोणज्याच्या ओढ्यावर भेटला. गोदावरीनं त्याला सांगितलं.
        "दादा, वर जेवणाच्या दिवशी उदेभान मस्तीत असतो. तो अफूची गोळी घेतो आणि पहाटेपर्यंत त्याचे लोकही गाफील असतात आणि कडा, ती डोणज्याकडची कडा, तिथून कोणी येईल असं त्यांना वाटतच नाही."
         तिनं हातानं खूण करून दाखवलं. इथून, या घळीतून वर जा. वर गेल्यावर थेट सदर आहे.
          तानाजीनं त्या मावळ्याकरवी तिचं ऐकलं. माघ वद्य अष्टमीच्या रात्री जेव्हा मावळे कड्याला दोर लावत होते, तेव्हा खाली ओढ्याजवळ गोदावरीच उभी होती. तिनं मशाल धरली नव्हती, फक्त हाताने इशारा केला होता. वर जा. लढाई सुरू झाल्यावरही ती पळून गेली नाही. तिनं ओढ्याच्या पाण्यात मावळ्यांचे घाव धुतले आणि जखमींना डोणज्याच्या झोपडीत आणून लपवलं. सकाळी जेव्हा गडावर भगवा लागला, तेव्हा कोणीच तिचं नाव घेतलं नाही. गड आला, सिंह गेला, एवढंच सगळ्यांना आठवलं. पण तानाजीच्या एका जुन्या मावळ्याने नंतर सांगितलं, त्या रात्री जर डोणज्याच्या त्या पोरीनं कड्याची वाट दाखवली नसती तर स्वराज्याला कोंढाणा जिंकताच आला नसता.
          ती काळरात्र. ती रात्र काळोखी होती. तिनशे मावळे कड्याखाली अंधारात बसले होते. वर कोंढाणा दिसत होता. स्तब्ध, अविचल, विचार करीत असलेला. तानाजी मध्यभागी उभे होते. तसे तानाजी म्हणाले,
         "मावळ्यांनो, वर पाहा. दिसतोय का कडा?"
         "दिसतोय सुभेदार. पण सरळ सोट आहे. चढणं कठीण आहे." एक मावळा म्हणाला. तसे शेलारमामा म्हणाले,
         "वय झालं रे माझं, मला कडा काही चढता येणार नाही."
          "मामा, तुमचं वय नाही, तुमचा जोश पाहतो मी. यशवंत घोरपडे आहेत आपल्याकडे आणि वर जायची वाट त्या डोणज्याच्या गोदावरीने दिलीय. ती पोरगी जर रोज तिकडे गुरं नेत असेल, तर आपण का नाही चढणार या कड्यावरून?"
            ते तानाजीचं बोलणं. त्यावर सुर्याजी म्हणाले,
           "दादा, वर गेल्यावर काय? थेट झेंडा बुरुजावर?"
          "नाही. आधी कोणी आवाज करायचा नाही. यशवंत वर गेला की एक एक करून चढायचं. वर गेल्यावर दोन तुकड्या. एक सूर्याजी तुझ्याकडे. तू कल्याण दरवाजा रोख. दुसरी माझ्याकडे. मी उदेभानाकडे जाईल."
           "सुभेदार, उदेभानकडे पाचशे लोक आहेत म्हणे."
           "असू दे. आपल्याकडे खुद्द शिवाजी महाराज आहेत."
           शिवाजी महाराज. तानाजीनं शिवरायांचं नाव काढताच मावळ्यांना व सुर्याजीलाही आश्चर्य वाटलं. तसे ते म्हणाले,
           "शिवाजी महाराज?"
           "होय. शिवाजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष शिवशंभूची ताकद आपल्यासोबत आहे म्हणायचं आहे मला. मग पाचशे काय, पाच हजार आले तरी चालेल. आपण कशाला आलोय.
           "गड घ्यायला."
           "आणि गड घेतल्यावर?"
           "आधी लगीन कोंढाण्याचं. मग लगीन रायबाचं करणार."
           "ऐका. जर मी पडलो, तरी मागे फिरायचं नाही. गड घेतल्याशिवाय खाली यायचं नाही. राजांना वचन दिलंय आणि एक लक्षात ठेवा. रयतेला हात लावायचा नाही. लढाई फक्त उदयभानाशी."
           ते तानाजीचं म्हणणं. तसे मावळे म्हणाले,
          "सुभेदार, तुमच्या पाठीशी आहोत आम्ही."
           "चला तर मग."

*********************************************

          गोदावरीनं उत्तम नियोजन केलं होतं कोंढाणा जिंकण्यासाठी. तसं बहिर्जींनी तिला सगळ्या सुचना दिल्या होत्या. आता कोंढाणा पडता कामा नये. असंही बहिर्जींनी सांगीतलं होतंच. तिनं हे सगळं मातीत लिहून ठेवलं नाही, डोक्यात ठेवलं. मग एके रात्री ती ओढ्यावर कपडे धुण्याच्या निमित्ताने गेली. तिथे तानाजीचा एक हेर भेटला. तिने त्याला सांगितलं.
           "दादा, माझं नाव घेऊ नका, पण एवढं लक्षात ठेवा. हल्ला करायचा असेल तर नवमीच्या दिवशी करा आणि कड्याने या, दरवाजाने नको. मी वाट दाखवते.
          लढाईच्या आधल्या दिवशी तिने मुद्दाम जास्त दही वर नेलं. सगळ्या शिपायांना वाटलं. सगळं नेहमीसारखंच आहे. ती लढाईची रात्र व त्या लढाईच्या रात्री ती ओढ्याजवळच थांबली होती. तिच्या पदरात एक छोटी कात्री होती आणि एक धोतर. मावळे जेव्हा दोर टाकून वर चढत होते, तेव्हा वरून एक दगड खाली पडला. आवाज झाला. दोन मोगल पहारेकरी आवाजाच्या दिशेने येऊ लागले. गोदावरीने लगेच घागर फोडली, पायावर दही सांडून घेतलं आणि मोठ्याने रडायला लागली. अगं मेलं माझं दही. पहारेकरी आले, तिला पाहून हसले, शिवी दिली आणि निघून गेले. तेवढ्या वेळात मावळे वर पोचले होते. वर लढाई सुरू झाली. तलवारींचा आवाज, किंकाळ्या. खाली डोणज्यात कुत्री भुंकत होती.
          गोदावरी पळाली नाही. जो मावळा जखमी होऊन कड्यावरून खाली पडत होता, त्याला ती ओढ्याच्या झाडीत ओढून आणत होती. तिनं धोतर फाडून पट्ट्या बांधल्या. चार जणांना तिनं त्या रात्री वाचवलं. मग पहाटे किल्ल्यावरून आरोळी आली, गड आला. गोदावरीने ओढ्यात हात धुतले आणि घरी आली होती.
         लढाईच्या रात्री तिचं काम वेगळंच होतं. ती पहाटेची वेळ. मावळे वर पोहचले. मावळे वर पोहोचताच वर तलवारी खणखणू लागल्या. आवाज डोणज्यापर्यंत येत होता. मात्र गोदावरी पळाली नाही. ती ओढ्यावर थांबून राहिली. जो मावळा कड्यावरून घसरून पडेल त्याला ओढून घ्यायला. 
              
********************************************

         गोदावरीचं तरुणपण भारी संकटांनी भरलेलं होतं. तो कोंढाणा जंगलातच होता. तोच गड बघत गोदावरी लहानाची मोठी झाली होती. लहानपणी तिला वाटायचं, हा गड आमचाच आहे. मग एक दिवस कळलं, तो मुघलांनी घेतलाय. उदेभान राठोड नावाचा किल्लेदार बसलाय वर. जो किल्लेदार एक राजपूत राजा होता. परंतु त्यानं मुघलांच्या आवेशात येवून आपला धर्म बदलवला होता. त्यातच त्याचेवर औरंगजेबाची खास मर्जी झाली होती. ज्यातून त्याला सिंहगडाचा किल्लेदार बनवलं होतं. 
         ती रात्र...... त्या रात्री, माघ वद्य अष्टमीला, गोदावरी आजुबाजूला फिरत होती. कारण सई दिसत नव्हती. चंद्र नव्हता. मात्र सई दिसलीच नाही. उलट एवढ्या अंधारात माणसं दिसली. काळे कपडे, डोक्याला मुंडासं. तशी ती थोडी घाबरली. पुढे एक माणूस आला. अंगाने भरलेला, मिशीवरून हात फिरवत. त्यानंच विचारलं,
        "पोरी, कल्याण दरवाजाची चोरवाट कुठून जाते?"
         तो त्या माणसाचा प्रश्न. विचार आला गोदावरीला. ही माणसं का बरं विचारत असतील, कल्याण दरवाज्याची वाट. तशी पुष्टी करण्यासाठी ती म्हणाली,
          "आपण कोण? कल्याण दरवाजा कशासाठी हवाय?"
          "आम्ही शिवाजीची माणसं. आम्हाला हा किल्ला घ्यायचा आहे. महाराजांचं म्हणणं आहे की जास्त दिवस कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणं बरं नाही. तेव्हा आम्हाला कोंढाण्यावर जायचंय आणि एकेका मुघल सैनिकांना कापून काढायचंय." 
          त्या माणसानं गोदावरीला सर्व सांगीतलं. परंतु त्या परमाणसावर विश्वास कसा ठेवायचा. गोदावरी विचार करु लागली. वाटलं ही माणसं म्हणजे शत्रूंची हेर तर नसावी. शेवटी विचार करीत असतांना ती म्हणाली,
         "आपण शिवरायांची माणसं आहात, याचं प्रमाण काय?"
         गोदावरीनं त्यांना विचारलेला प्रश्न. तसा त्या माणसांनाही विचार आला. परंतु प्रमाण तर द्यावंच लागेल. शेवटी त्यांच्यातीलच एका माणसानं आपल्या धोतराच्या शेल्यावर बांधलेली एक धातूची मोहोर काढली. ती गोदावरीला दाखवत तो म्हणाला,
           "हे घे. एवढंच प्रमाण आहे माझ्याजवळ. याशिवाय दुसरं प्रमाण नाहीच आमच्याजवळ. आम्हाला स्वराज्य वाचवायचं आहे. हे मात्र निश्चित. आपण नाही सांगीतलं तरी आम्ही शोधून घेवू कल्याण दरवाजा."
          ती माणसं विश्वासानं बोलत होती. तसं गोदावरीनं ते नाणं हातात घेतलं. त्या नाण्याला कंदिलाच्या टिमटिमत्या प्रकाशात न्याहाळलं. परंतु तिचं त्या नाण्यानं समाधान झालं नाही. तरीही जो विश्वास त्यांच्या बोलण्यात होता. तोच विश्वास गृहीत धरुन ती म्हणाली,
        "कल्याण दरवाजाने जाल तर कापले जाल. मागून या, डोणगिरी कड्याने."
           गोदावरीनं ते म्हणताच तो हसला. म्हणाला,
           "मी तानाजी. उमरठ्याचा. माझ्या राजाचं गड मला परत घ्यायचंय. माझ्या पोराचं लगीन ठेवलंय, पण मी म्हटलंय, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं."
          तानाजी...... तानाजीनं बरेचवेळेस गोदावरीनं नाव ऐकलं होतं. परंतु प्रत्यक्षात पाहिलं नव्हतंच. आज प्रत्यक्षात तानाजीचं दर्शन झालं होतं आणि त्याच्यासोबत त्याचा भाऊ सूर्याजी देखील होता. त्याचंही दर्शन झालं होतं. तसाच म्हातारा शेलारमामा होता. त्यासोबतच तीनशे मावळे पण होते. सगळ्यांच्या डोळ्यात एकच आग. कोंढाणा जिंकायचाय. कोंढाणा जिंकणे म्हणजे श्रीची इच्छा होती.
         गोदावरीनं तानाजीला ओळखलं. थोडी थोडी पृष्टी झाली. तसं तिनं त्यांना तिच्या झोपडीत आणलं. जे होतं ते दिलं. दोन भाकरी, ताक. वैगेरे. मग म्हटलं की थोडी विश्रांती घ्या. त्यावर तानाजीनं विश्रांती घ्यायला होकार दिला. म्हणाले,
         "वर उदयभानचे लोक दारू पिऊन झोपलेत आता, कल्याण दरवाज्याकडून जायचा रस्ता बरा आहे. थेट गाठतोच व एकेका उदेभानाच्या सैनिकांना कापूनच काढतो आम्ही. तसाच बेत केला होता. परंतु आपलं म्हणणं आहे की तिकडून जाल तर कापले जाल. आपण डोणगिरी कडा चढून जा. परंतु हा कडा सरळ आहे. घोरपड शिवाय नाही चढता येणार."
          "होय. बरोबर आहे. अन् घोरपड हवी तरी कशाला? अहो, आपल्याकडे हा कडा सरसर चढणारा एक माणूस आहेच की."
          तानाजीनं आश्चर्यानं पाहिलं. तसं तिला विचारलं,
          "कोण आहे असा रथी महारथी?"
         "यशवंत. यशवंतराव नाव आहे त्याचं. हवं तर त्याची भेट करुन देवू का?"
          "होय. भेट झाली तर बरं होईल. परंतु एक. हा यशवंत आपल्याला कोंढाण्याच्या हा डोणगिरी भाग चढायला मदत करेल काय?"
         "का नाही करणार? त्याला आपण विश्वासात घेवू. सांगू त्यांना. स्वराज्याचं महत्व व या कोंढाण्याचं महत्व पटवून देवू."
           "ठीक आहे तर. परंतु ते यशवंतराव राहतात तरी कुठे?"
          "याच डोणजे गावात. थोडे म्हातारे आहेत. परंतु अनुभव दांडगा आहे. पुर्वी ते आदिलशाहाच्या सैन्यात होते म्हणे, आपल्या महाराजांचे वडील शहाजीसोबत काम केलं म्हणतात त्यांनी. ते नक्कीच मदत करतील आपल्याला."
          "ठीक आहे तर. चाल मग लवकर." तानाजी बोलले.
          ती रात्र. ती भयाण रात्र होती. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. गोदावरी, सोबत तानाजी व सुर्याजी आणि शेलारमामाही निघाले. सैनिक मावळ्यांना तिथंच थांबायला लावलं व ते थेट यशवंतरावाच्या घरी गेले. त्यांना कोंढाण्याचं महत्व समजावून सांगीतलं. त्यातच शहाजी व शिवाजीसाठी आपण काय काय करतो आहोत, तेही सांगीतलं. खुद्द तानाजीनं, माझ्या मुलाचं लग्न जुळलेलं असून ते करण्याआधी कोंढाण्याची कामगिरी करण्यासाठी आलोय. हेही सांगीतलं. तोच रायबाचा प्रसंग ऐकून यशवंतरावाचं मन पिघललं व ते डोणगिरीचा रस्ता तेवढ्याच भयाण रात्री दाखवायलाही तयार झाले होते.    
          यशवंतराव तो भयानक रस्ता चालत होते. अशातच डोणगिरीचा चढाव आला. गड सपाटच होता. चढता येणं तसं कठीणच होतं. परंतु त्याच ठिकाणाहून चढणं अतिशय आवश्यक होतं. कारण त्या ठिकाणचा चढणीचा भाग हा कठीण असल्यानं शत्रूला त्या भागातून कोणी येईल याची कल्पनाही नव्हती. तसे यशवंतराव, गोदावरी व तानाजीला म्हणाले,
           "मी वर जातोय. तेथून दोर टाकतोय. गोदावरी तू इथंच थांबशील व बाकी सगळे या दोराला पकडून दोरानं वर या."
          यशवंतरावानं म्हटलं. तसे ते गप्प झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या खांद्यावर दोराची गुंडाळी घेतली व ते भराभरा गड चढत गेले. क्षणातच ते गडावर गेले. त्यानंतर त्यांनी तेवढ्याच अंधारात कड्यावर दोर बांधला व तो दोर खाली सोडला. तसा तो दोर पाहताच मावळ्यांना स्फुरण चढलं. ज्यातून मावळे भराभर त्या दोराला पकडून कोंढाण्याचा कडा चढू लागले होते. शेवटी शेलारमामा चढले. 
           शेलारमामा चढल्यानंतर तानाजी जेव्हा चढायचे बाकी होते. त्यांनी सुर्याजीला सांगीतलं की सुर्याजी मी आधी वर जातो. त्यानंतर तू नंतर यायचं. जर मी फडलोच तर मावळ्यांचा धीर खचू द्यायचा नाही. तसा तानाजीनं स्वतः दोर पकडला आणि गोदावरीला म्हणाला, 
         "पोरी, आता तू इथंच थांब. जे होईल ते उद्या कळेलच."
          ते तानाजीचं बोलणं. त्यानंतर ती तिथंच थांबली. त्यानंतर तानाजी गडावर पोहोचताच रात्रभर गडावर मशाली दिसत होत्या. काही वेळानं त्या विझल्या. मात्र तलवारीचा आवाज येत होता. 
          ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र. मध्यरात्र झाली होती. सगळे मावळे लवकरच गडावर भराभर चढून गेले होते. अशातच मावळ्यांनी एकच आरडाओरड केली. 'हर हर महादेव ' 'मारा कापा' वैगेरेचे आवाज गुंजले. 
           ते हर हर महादेवचे आवाज. ती मध्यरात्र. त्या मध्यरात्री आलेले आवाज. ते अचानक निर्माण झालेले आवाज. त्यातच स्वतः तानाजी, गोदावरीनं माहिती दिल्यानुसार उदेभानाच्या वाड्याकडे निघाला. परंतु तिथं पहारेकरी उभे होते. त्यांनी त्याला अडवलं. म्यानातून तलवारी निघाल्या. तोच काही मावळे तिथं आले. त्यानंतर तलवारीवर तलवारी भिडल्या. एकच कल्लोळ माजला. कोणी म्हणत होतं, शिवाजी महाराज की जय. तर कोणी आई भवानी की जय. म्हणत होतं. कोणी हर हर महादेव तर कोणी जगदंब म्हणत होतं. एकच धुमश्चक्री चालली आहे. मशाली विझल्या होत्या. 
          तानाजीचे मावळे आणि उदयभानचे सैनिक एकमेकांत भिडले होते. तसा तो तलवारीचा आवाज उदेभानाच्या कानावर गेला. तसा उदेभान उठला. स्वगत म्हणाला, "हल्ला झालाय. आपल्याला तलवार उपसून निघायला हवं."
          उदेभान उठला. तसा तो बेसावध न राहता तातडीनं निघाला. त्यानंही आपल्या म्यानातील तलवार उपसली होती. तो सैरावैरा धावत सुटला. तसा समोरच तानाजी उभा असलेला दिसला. मग काय दोघंही समोरासमोर. दोघांच्याही तलवारी भिडल्या. तलवारीचे आवाज खणखणू लागले. तो झेंडा बुरुज होता व झेंडा बुरुजाजवळ दोघे समोरासमोर होते.
          ती लढाई व त्या लढाईत दारूच्या नशेतच, तलवार उगारत उदेभान म्हणाला,
          "कोण रे तू? चोरासारखा कड्याने चढून आलास? हिंमत असेल तर समोर ये."
          ते उदेभानाचं बोलणं. ते ऐकत तानाजी म्हणाला,
          "मी चोर नाही. मी तानाजी मालुसरे. उमरठ्याचा सुभेदार. ओळखलं का? शिवाजी राजाचा मावळा. हा गड माझ्या राजाचा आहे, तो घ्यायला आलोय."
           "तो शिवाजी? तो पळपुट्या. राजगडावर लपलाय का तो. त्याची माझ्याशी लढायची हिंमत झाली नाही काय तर तुला पाठवलं. ये म्हणा त्यालाही. उभा कापून काढतोय मी त्यालाही. हा कोंढाणा आता माझा आहे. दिल्लीच्या बादशहाचा आहे. तू तीनशे लोक घेऊन मला हरवणार आहेस का?"
           "तोंड सांभाळून बोल गद्दारा. मीठ इथल्या मातीतील खातो आणि गोडवे मुघलांचे गातोस. ही स्वराज्याची माती आहे आणि हा किल्लाही स्वराज्याच्याच मातीत आहे. तू हे विसरलास की काय? म्हणूनच फितूरी केली आणि मुघलांना मिळाला की काय? परंतु जावू दे. तू आधी माझ्याशी निपट. शिवराय तर दूरच. मीच तुला धूळ चारतो. तू बघतच राहा. अन् हो, तू आमचे लोक मोजू नकोस, हिंमत मोज. तू रयतेला त्रास दिलास. डोणज्याच्या गोदावरीसारख्या पोरींना व लोकांना वर येऊ दिले नाहीस. आता हिशोब होईल. हिशोब होईल तुझ्या आणि तुझ्या बादशाहाच्या एका एका कर्माचा." तानाजी म्हणाला व त्यानं उदेभानावर वार केला. तोच वार अडवत उदेभान म्हणाला, 
          "गोदावरी? त्या गुरवाड्यांच्या पोरीसाठी तू जीव देणार की काय? ये मग." 
         दोघंही नजर एकमेकांना भिडली होती. दोघांच्या तलवारी भिडल्या. त्या तलवारीतून टण टण आवाज निघायला लागले होते. तोच तानाजी म्हणाला,
           "हा गड माझ्या बापजाद्याचा आहे आणि आता माझ्या तलवारीचा होईल." 
          तानाजीनं तसं म्हटलं. तशी त्याची ढाल तुटली. मात्र हातात फक्त तलवार होती. मग काय, ढाल वेळेवर तुटल्यानं तानाजीनं गळ्यातील शेला हाताला गुंडाळला व त्यानं पुन्हा नव्या दमानं लढायला सुरुवात केली. परंतु उदेभानही काही कमजोर नव्हताच. तोही वार करीतच होता तानाजीवर. शेवटी दोघंही पडले. 
          तानाजी व उदेभान गंभीररीत्या जखमी झाले. तशाही अवस्थेत तानाजीनं जय शिवराय म्हटलं व तो तसाच पडून राहिला. त्यातच उदेभानही गंभीररीत्या जखमी झाल्यानं तोही पडला होता.
           पहाट झाली होती. तसं सुर्याजीनं गड चढणं सुरु केलं होतं. त्यातच ते गडावर पोहोचले होते. परंतु सुर्याजी पाहतात काय, मावळे सैरावैरा पळू लागले होते. 
           मावळे पळत होते. तसं सुर्याजीनं त्यांना पाहिलं व ते त्यांना उद्देशून म्हणाले, 
           "असे भागुबिल्लीसारखे का पळता. मागे फिरा. लढा. शत्रुला कापून फेका. हिंमतीनं लढा. जर लढायचं नसेल तर पळा आणि किल्ल्यावरुन उडी टाकून मरा. कारण ज्या दोरानं तुम्ही गडावर आलात. तो दोर मी नुकताच कापून टाकलेला आहे. तुम्हाला वाटतंय ना की धनी पडला. आम्ही लढायचं कसं. तर माझ्याकडे बघा. मी आलोय तानाजी बनून. मी आहेच तुमच्यासोबत लढायला. अरे, आपण मावळे आहोत. तानाजीच्या तालमीत तयार झालेले. अन् ज्या तानाजीवर शिवरायांचा वरदहस्त होता. त्याच शिवरायांचा आपल्यावरही वरदहस्त आहे. आपण त्यांच्यासाठीच लढतोय. अरे, प्राण गेला तरी चालेल. परंतु वचन पाळणारे आपण. असे भागूबाईसारखे कसं पळणार बरं? अरे, ज्या तानाजीनं आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या, रायबाच्या विवाहाचा विचार केला नाही आणि लढायला आले. त्या तानाजीला मानणारे तुम्ही, तो धारातिर्थी पडताच असे पळायला लागलात. आता मागे फिरा. आपण अशी विनाकारण मरणारी माणसं नाहीतच. आपण खरं तर शत्रुंशी लढून मरु. मी आहेच तुमच्यासोबत."
          सुर्याजीनं म्हटलेले शब्द. त्या शब्दानं मावळ्यांना स्फुरण चढलं व ते मागे फिरले. त्यातच ते शत्रुवरही तुटून पडले. तसे त्यांच्यासोबत सुर्याजीही होतेच. तसा उदेभान तानाजीसह केव्हाच मरण पावला होता. जे काही दोनचार सैनिक होते. तेच तेवढे लढत होते. शेवटी सुर्याजी सर्वांना म्हणाला, 
          "तुम्ही लढता तरी कोणासाठी? अरे, तुमचा उदेभानही धरणीवर पडलाय. तुम्ही आपलीच माणसं आहात. मग आपल्याच माणसांना मारणार काय? विचार करा आणि हातातील तलवार सोडा व आमच्या बाजूला या. आम्ही तुमची निश्चितच सुरक्षा करु."
          सुर्याजीनं म्हटलेले शब्द. ज्यांनी ते शब्द ऐकले. त्यांचा जीव वाचला होता आणि बाकीचे मरण पावले होते. पहाटेच गडावरून गवताच्या गंजी पेटल्या याचा अर्थ होता, गड जिंकला. ते दृश्य गोदावरीलाही दिसलं व रात्रभर जागत असलेली व जखमी शिपायांवर उपचार करीत असलेली गोदावरी आनंदीत झाली होती.
          सकाळ झाली होती. तसे यशवंतराव गड उतरुन खाली आले. त्यांनी सर्वात आधी गोदावरीचीच भेट घेतली व म्हटलं,
           "गोदा, आपण जिंकलोत. पण......."
           "पण काय यशवंतराव?" उतावीळपणानं गोदावरी म्हणाली.
           "पण तानाजी पडले."
           यशवंतरावानं सगळी हकीकत सांगीतली. तसं गोदावरीचं अवसान गळलं. तिला त्याचं वाईट वाटलं. जसा घरातील माणूस मरण पावतो. अगदी गोदावरीला तसंच वाटायला लागलं होतं.
          सकाळचे नऊ वाजले होते. कोंढाण्यावर धूर पेटत होता. खाली डोणज्याच्या वाटेवर गोदावरी रात्रभर जागी उभी होती. समोरून सूर्याजी खाली येत होता. त्याच्या अंगावर रक्त व डोळ्यात पाणी होतं. ते पाणी दिसलं गोदावरीला. तशी गोदावरी उद्वेगानं म्हणाली,
           "सुर्याजी, गडाचं काय झालं? मशाल पेटलेली मी पाहिली वर."
           ते गोदावरीचे बोल. त्यावर सुर्याजी डोळ्यातील अश्रुभरल्या नजरेनं धीरगंभीर आवाजात म्हणाला, 
         "गड आला पोरी... गड आपला झाला."
           ते सुर्याजीचं बोलणं. त्यावर गोदावरी म्हणाली,
          "खरंच? मग तानाजी कुठे आहेत? त्यांनी सांगितलं होतं, गड आला की दही-भाकरी खायला येईल."
            "गोदावरी."
             "बोला ना सुर्याजी. ते वर आहेत का? उदेभान मेला का?"
           "उदेभान मेला. तुझ्या दाखवलेल्या वाटेनेच आम्ही चढलो. उंबराच्या झाडाजवळच... तिथेच सगळं घडलं."
            "मग तानाजी, तानाजी का नाही आले? ते कुठं आहेत? गडावरच थांबले काय?"
            "तानाजी नाही राहिला गोदावरी. उदेभानाबरोबर लढता लढता, वीरमरण आलंय माझ्या दादाला सिंहासारखा लढला माझा दादा. पण......"
          "नाही. तुम्ही असं कसं म्हणता? कालच तर बोलले माझ्याशी. म्हणाले, 'आधी लगीन कोंढाण्याचं करीन. मगच रायबाचं. रायबाचं तर लग्न बाकी आहे ना. मग असे कसे मरण पावले ते?"
           "लगीन रायबाचं, पण त्याआधी कोंढाण्याचं...... तेच म्हणत गेला तो. शेवटपर्यंत गडाचीच काळजी."
            "माझ्यामुळे घडलं सगळं. मीच वाट दाखवली. मी वाट नसती दाखवली तर...... तर हे घडलंच नसतं."
          "असं बोलू नकोस पोरी. तुझ्यामुळे गड आला. तुझ्यामुळे शेकडो मावळ्यांचा जीव वाचला. माझ्या दादाने स्वतःसाठी नाही, राजासाठी जीव दिला. त्याला तुझा अभिमान वाटला असता. आता हा कोंढाणा नाही. हा सिंहगड. तानाजीच्या नावाने राजांनी नाव ठेवलंय आणि तू... तू या गडाची पहिली साक्षीदार. चल, वर चल, एकदा बघ तुझ्या वाटेनं घेतलेला गड."
           "मी वर येऊ?"
           "होय, आजपासून हा गड बंद नाही. हा रयतेचा गड आहे. तुझ्यासारख्यांसाठीच तर दादाने जीव दिलाय."      
            सुर्याजी बोलून गेले. तशी गोदावरी गडावर आली सुर्याजी सोबत. तसे शिवाजी महाराज तिच्याही आधी आले होतेच. त्यांनी गडाच्या दरवाजात उभे राहून म्हटलं होतं, "गड आला, पण सिंह गेला."
          लोकांनी गडाला सिंहगड नाव दिलं. तानाजीचं स्मारक बांधलं आणि गोदावरी परत गुरं हाकत राहिली होती. पण त्या रात्रीपासून डोणज्याचे लोक तिला म्हणत, सिंहगडाच्या पायथ्याची गोदावरी. गोदावरीनं तानाजीला काही मोठं केलं नाही. तिनं फक्त वाट दाखवली. गड चढणारा तो होता. हे जरी बरोबर असलं तरी वाट दाखविणारी गोदावरीही तेवढीच महत्वपुर्ण होती. तिनं यशवंतरावाला भेटवून दिलं नसतं तर तानाजीसह मावळे, जे कल्याण दरवाज्यातून वर गेले होते. ते मारले गेले असते. ज्यातून कोंढाणा सहजपणे जिंकताच आला नसता.
          संपुर्ण कोंढाणा पुन्हा एकदा जिंकता आला शिवरायांना. ज्यात गोदावरीची व सईची अमूल्य मदत झाली. परंतु जसं तानाजीचं नाव कोंढाणा लढतांना इतिहासाच्या पानावर लिहिलं गेलं. तसं कोणीच तिचं नाव इतिहासाच्या पानावर लिहिलं नाही. बखरीत तानाजीचं नाव राहिलं, उदेभानाचं राहिलं. पण डोणज्याच्या म्हाताऱ्या आजीला माहिती होतं, त्या रात्री कोंढाणा केवळ घोरपडीने नाही, तर एका पोरीच्या हिंमतीनेही जिंकला होता. म्हणूनच आज एकटे बसले की डोणज्यातील लोकांना वाटतं की कदाचित गोदावरी आजही जिवंत आहे. ती जिवंत आहे, एक इतिहासाची साक्ष बनून. डोणज्याच्या हवेत व बाभळीच्या झाडात ती आहे. असं लोकांना पदोपदी जाणवत असतं.

**********************************************

           तानाजी खाली पडला होता. रक्त वाहात होतं. परंतु आता रक्त थांबलं होतं. श्वास थांबला होता. पण डोळे उघडे होते. 
           तशी ती शेवटची घटका. तानाजी मोठ्यानं ओरडला. 'गड दिसतोय. गड आला का?'
           तानाजी विचार करीत होते. तसं कोणीतरी ओरडलं, हो, गड आला.
         तसे तानाजी म्हणाले, "बस. झालं. मी ऐकलं. आता सुखाने डोळे मिटणार."
          तानाजी स्वगत विचार करु लागले. 'आता मी पडलोय. माझी ढाल तुटलीय. माझा हात... जिथे उदयभानाने वार केला होता तिथं आता दुखत नाही. विचित्र आहे. वरून आवाज येताहेत. सूर्याजी ओरडतोय. "दादा गेला. पण गड घ्या." शेलार मामा रडतोय. तो कधी रडत नाही. आज रडतोय आणि खाली... खाली पुण्याच्या वाटेला बहिर्जी पळतोय. राजगडाला बातमी न्यायला. काय सांगेल तो? "गड आला पण सिंह गेला" महाराज असंच म्हणतील. सिंह... मी सिंह कधी होतो? मी तर मावळा होतो. उमरठ्याचा. शिवबाचा मित्र.
          रायबा...... त्याचं लगीन राहिलं. मी त्याला शब्द दिला होता, आधी लगीन कोंढाण्याचं. मी शब्द पाळला. पण बाप म्हणून नाही. सुभेदार म्हणून पाळला. सावित्री काय म्हणेल? ती म्हणेल, तुम्ही नेहमी असेच. घरापेक्षा गड मोठा म्हणणारे. खरं आहे तिचं. पण सावित्री, एक सांगू? या कातळावर पडल्यावर कळलं. घर आणि गड वेगळे नाहीतच. हा गडच तर घर आहे. आपलं सगळ्यांचं घर. यासाठीच तर..... आता मला कोणी उचलतंय. मावळे उचलताहेत. घेऊन चाललेत. कुठे? खाली? नाही, वर. बुरूजावर ठेवतील. चांगलं आहे. इथून माझा उमरठा दिसतोय. इथून राजगड दिसतोय. इथून रायबाचं लगीन पण दिसेल कदाचित. मी इथेच राहीन. या गडावर.'
            कोंढाणा जिंकला होता व तो जिंकल्यावर दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी, पुण्याच्या वाटेवर बहिर्जी उभा होता. विचार करीत होता. 
          'लोकांना वाटतं लढाई तलवारीने जिंकतात. परंतु नाही. लढाई जिंकता येते माहितीने आणि वाटेने. मी बहिर्जी नाईक. माझं काम काय? लोकांच्या बोलण्यातलं खरं शोधणं. अंधारातला आवाज ऐकणं. महाराजांनी सांगितलंय, कोंढाणा घ्यायचा. मी महिना फिरलोय गडाभोवती. वाण्याच्या वेशात, गुराख्याच्या वेशात. सगळे म्हणतात, कल्याण दरवाजा बंद, चोर दरवाजा बंद, लढून घेता येणार नाही. मग मी डोणज्यात बसलो. एका पारावर. तिथंच ती आली, गोदावरी. हातात काठी, पायात चप्पल नाही. म्हणाली, "आमच्या गुरांसारखीच माणसं आहेत तुमची? वरचं गवत खायला येतात रोज?" मी समजलो. गुरं जिथं जातात, तिथं वाट असते.
          तीच वाट. मी तिला फक्त विचारलं, 'उंबराचं झाड कुठे आहे?' तिनं बोट दाखवलं. त्या एका बोटानं गड दिला. तानाजी गेला. सिंह गेला. लोक रडताहेत. पण मी रडत नाही. मी हिशोब ठेवतो. एका पोरीच्या बोटाने पाचशे सैन्य असलेला किल्ला पडला. एका यशवंतनं तीनशे मावळ्यांना वर नेलं. एका लग्नाने एका स्वराज्याला वेळ दिली. हेच तर आहे. लोक मोठ्या गोष्टी शोधतात. मोठे दरवाजे. पण स्वराज्याचे दरवाजे लहान असतात. उंबराच्या झाडामागे लपलेले. आता पुण्यात जाईन. महाराज विचारतील, 'बहिर्जी, पुढे काय?' मी म्हणेन, 'पुढे काय, राजं, माहिती तयार आहे. पुन्हा एक गुराखी भेटायचा आहे. पुन्हा एक गोदावरी भेटेल. फक्त तिला ओळखता आलं पाहिजे.'
          ते बहिर्जीचं विचार करणं. तसा बहिर्जी गप्प झाला. कारण आज त्याचा मित्र तानाजी जिवंत नव्हता. काल पुरंदर लढतांना मुरारबाजीच्या रुपानं एक मोहरा गमावला होता, स्वराज्यानं आणि आज स्वराज्यासाठी पुन्हा एकदा एक मोहरा कामी आला होता.
           कोंढाणा जिंकल्याला दोन दिवस झाले होते. तशी राजगडाच्या देवघरात जिजामाता बसल्या होत्या. तसू शिवराय आले. त्यातच बातमी आली. गड आला पण सिंह गेला. तसा जिजामातेच्याही मनात विचार आला. ती विचार करु लागली. 
           'मी देवाला दिवा लावत होते. हात थांबला. शिवबा आला नाही सांगायला. तो कधीच अशी बातमी स्वतः सांगत नाही. तो आतल्या खोलीत गेला. मग मी समजले. गड आला म्हणजे कुणीतरी गेलं. स्वराज्यात असंच असतंच. कोण? विचारलं तर कळलं, तानाजी.
          तानाजी... उमरठ्याचा. लहानपणी शिवबाच्या मागे पळणारा. त्याची आई मला म्हणायची, 'जिजाऊ, हा तानाजी तुमचाच. घ्या याला पण.'
         मी त्याला पाहिलं होतं आधी. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आला होता. म्हणाला, "मासाहेब, पोराचं लगीन आहे. यायचं हं." मी म्हणाले, "अरे, पण मी येवू शकणार नाही. कोंढाणा घ्यायचाय. तो घेतल्यावर शिवबाला घेऊन येईन."
          तो हसला व म्हणाला, 'आधी कोंढाणा घेऊन येतो, मग लग्न करु.'
         मी त्याला हळद लावली होती. तिचाच रंग अजून त्याच्या कपाळावर असेल? आता त्याची बायको...... ती काय करत असेल? रायबा काय करत असेल? त्यांच्या घरात तर लग्नाची तयारी होती. एका घरचं लगीन थांबवून या स्वराज्याचं लगीन लावलं त्यानं.
          शिवबा रडत नाही. राजा रडत नाही. पण मी आई आहे. मला रडता येतं. मी रडते, तानाजीसाठी नाही. मी रडते त्या प्रत्येकासाठी ज्याला मी पोरगं मानलं आणि जे गडासाठी गेलेत. मी अभिमानानंही रडते. कारण ही देखील माझीच पोरं आहेत. माझ्या शिवबासोबत राहिलेली. लहानपणी कुशीत खेळलेली. जीवाला जीव देणारी ही पोरं. माझी पोरं अशी आहेत, लग्न सोडून कातळ चढणारी. जीव सोडून गड घेणारी. तानाजी, लेका... तू गेलास. पण तू माझ्या शिवबाला एक गोष्ट शिकवून गेलास. राजाने रडायचं नसतं, राजाने नाव ठेवायचं असतं. आता तो गड सिंहगड झाला आणि तू........ तूच माझा सिंह झालास.' जिजामातेचं बोलणं संपलं. तशी रडायला लागली. तोच राजगडावर गोंधळ निर्माण झाला. जिजामाता का रडतेय.
          जिजामाता रडत होत्या. तोच तिथं शिवराय आले. विचारलं की त्या का रडताय. मग खरं कारण सापडलं. जिजामाता रडक्याच आवाजात म्हणाल्या,
           "माझा तानाजी मरण पावला. ज्या तानाजीला मी देखील या गोदीत खेळवलंय लहाणपणी. लहानाचा मोठा झाला तो याच घरी. हे मी कसं विसरु. बिचारा...... रायबाच्या स्वतःच्या मुलाच्या विवाहाचं निमंत्रण घेवून आला होता. किती आनंद होता त्याच्या चेहर्‍यावर. सांगीतलं आपण की आम्ही येवू शकणार नाही. तुम्ही रायबाचं लग्न निपटवून टाका. परंतु या जिजामातेचं बोलणं जिव्हारी घेतलं त्यानं. अन् रायबाचं लग्न मागं टाकून कोंढाण्याच्या कामगीरीवर निघाला. मी म्हटलंच नसतं तर तो आज मरण पावला नसता."
         शिवरायांनी जिजामातेचं ऐकून घेतलं. तसं त्यानं सांत्वन केलं व ते काही कार्यानिमित्त बाहेर निघून गेले होते.
          ज्याप्रमाणात तानाजी मरण पावताच राजगडावर गोधळ उडाला होता. तसाच गोंधळ उमरठे गावातही उडाला होता. रायबाच्या मनातही आपल्या वडीलांबद्दलचे विचार घोळू लागले होते. जेव्हा त्यानंही सुर्याजीकडून लग्नमंडपात, वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकली होती. तोही विचार करु लागला होता.
          'कालपर्यंत मंडप होता इथं. आईनं केळीची खांबं लावली होती. आत्या हळद दळत होत्या. मी... मी धोतर नेसताना लाजत होतो. बाबा आले. म्हणाले, "रायबा, दोन दिवस थांब. मला कोंढाण्याला जायचंय."
          मी रागावलो होतो त्यांच्यावर. म्हणालो होतो,
          "बाबा, माझं लगीन आहे. तुम्ही कशाला जाता? दुसरं कोणी जाईल."
         ते हसले. डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, "बाळ, तुला नाय कळायचंय. आधी लगीन कोंढाण्याचं, मग तुझं करणार."
         मला वाटलं, बाबांची नेहमीची गोष्ट. ते करतील काहीतरी. ते येतीलच परत. ते गेले. परंतु परत आलेच नाहीत. आज सकाळी घोडा आला. सूर्याजी काका आले. त्यांच्या अंगावर रक्त होतं. आईला काही सांगायच्या आधीच मला म्हणाले, 
        "रायबा, मंडप काढू नकोस. पण लगीन नाही. बाबा......."
         पुढचं मी ऐकलंच नाही. माझा बाप गेला. लोक येताहेत आता. म्हणताहेत, 'तुझा बाप सिंह होता. त्याने गड घेतला. त्याचं नाव सिंहगड ठेवलं.' पण मला गड नकोय. मला नाव नकोय. मला माझा बाप हवाय. जो मला धोतर नेसायला शिकवणार होता. जो माझ्या बायकोला सुन म्हणून घरात घेणार होता. आता मी काय करू? आई रडतेय आता. ती म्हणते की तुझ्या बापाने स्वराज्यासाठी जीव दिला. मग मी पण काय करू? रडू? की अभिमानाने उभा राहू? बाबा, तुम्ही मला एकटं सोडून गेलात. पण जाताना एक गोष्ट ठेवून गेलात. लोक आता मला रायबा नाही म्हणणार. म्हणणार, एका सिंहाचा पोरगा. मग मला तसं वागावं लागेल. लगीन राहू दे. आधी मला त्या कोंढाण्यावर जाऊ दे. मला पाहू दे, ज्या कातळासाठी माझ्या बापाने माझं लगीन सोडलं, तो कातळ किती मोठा होता.'
           रायबाच्या मनाची हालचाल. तानाजी वडील होते त्याचे. काय करणार होता तो. विचार तर मनात येणारच होता त्याच्या. तसा तो तद्नंतर कोंढाण्यावर गेला व त्यानं यथोचित कोंढाण्यावरच आपल्या वडीलांचा अंत्यसंस्कार केला होता. 
           रायबाच्या मनाची जी अवस्था होती. तीच अवस्था तानाचीची पत्नी सावित्रीचीही होती. तिही विचार करीतच होती. 
           'मी सावित्री. तानाजीची सावित्री. कालपर्यंत मी रायबाची आई होते. आज... आज काय आहे मी? काल या अंगणात मी हळद कालवत होते. माझ्या पोराच्या लग्नाची. शेजारच्या बायका म्हणत होत्या की सावित्री, तुझा नवरा कुठे? मंडपात दिसेना? मी म्हणाले, 'गेलेत. राजाच्या कामाला.' मला वाटलं, जातील नेहमीसारखे आणि येतील नेहमीसारखे. परंतु यावेळेस असं घडलं नाही. ते गेले. परंतु परत आलेच नाही.
          'तानाजी, अहो, कधी घरी थांबलाय का? कधी कोंढाणा, कधी माहुली, कधी... मी मोजणं सोडून दिलंय.' लग्नाच्या आदल्या रात्री मी त्यांना म्हणाले, 
        "आता नका जाऊ. पोराचं लगीन आहे. लोकं काय म्हणतील?"
         ते काहीच बोलले नाहीत. फक्त हसले आणि म्हणाले,      
          "सावित्री, आधी लगीन कोंढाण्याचं."
          मला राग आला होता. मी ताट फेकलं होतं. म्हणाले,
         "तुम्हाला हा गडच मोठा. आम्ही कोण? आम्ही कोणीच नाही का?" त्यावर ते काहीच बोलले नाही. फक्त एवढंच म्हणाले,
          'सावित्रे, लय उपकार आहेत राजांचे. अन् आम्ही स्वराज्याची माणसं. मृत्यू रणांगणात पाहणारे. मरण तर कधीतरी येणारच आहे. परंतु लढता लढता जर वीरमरण आलंच तर त्यात धन्यता वाटते आम्हाला.' मी नकार दिला. तरीही ते गेले. मागे वळून पाहिलं नाही. पाहिलं असतं तर कदाचित थांबले असते. आज सूर्याजी आला. त्याला पाहताच कळलं. कळलं की ते मरण पावलेत गडावर. आता ते जीवंत नाहीत.'
          मी रडले नाही. रडून काय होणार? या वाड्यात आता दोन गोष्टी उरल्यात. एक रायबाचं अपूर्ण लगीन. जे पुर्ण करायचंय मला आणि दोन त्या कोंढाण्याचं नाव. म्हणे आता त्याला सिंहगड म्हणतील. ठीक आहे. म्हणू देत. पण मला कोणी विचारणार आहे का? त्या सिंहगडावर माझं कुंकू आहे म्हणून? लोक रायबाला म्हणतील, एका सिंहाचा पोरगा. पण मला कोण म्हणेल? सिंहाची बायको? नको. मी सावित्रीच राहीन. जिच्या नवऱ्याने एका गडासाठी घर सोडलं आणि घरासाठी गड घेतला. रायबा बाहेर बसलाय. त्याला वाटतंय त्याचा बाप गेला. मी त्याला सांगणार आहे, तुझा बाप गेला नाही. तो त्या कातळावर बसलाय आणि बघतोय, तू त्याच्यासारखा होतोस का म्हणून. चल सावित्री, उठ. मंडपातल्या हळदीचा रंग अजून गेला नाही. तीच हळद आता त्या सिंहाला लावायची आहे. अन् तू जर रडत बसलीस तर रायबाही रडेल. संपुर्ण उमरठा गाव रडेल. उठ, चल कामाला लाग.'
          सावित्री त्वेषानं उठली. तिनं डोळे पुसले व ती पती विरहाचं दुःख सोडून खंबीरपणाने रायबाजवळ जावून बसली. कारण तिला रायबाच्या पुढील आयुष्याला घडवायचे होते. 
          तानाजी मरणानंतर काही दिवस लग्न थांबलं होतं. नव्हे तर थांबवलं गेलं होतं. पुढं शिवराय उमरठे या गावी गेले व त्यांनी स्वतःच पुढाकार घेवून रायबाचं लग्न लावून दिलं होतं.

****************************************
            
          उदयभान राठोड कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार. तो किल्ल्यावर असतांना विचार करीत होता. मरण्याच्या दोन घटका आधी.
          'मी उदेभान, राजपूत. लोक म्हणतात, 'तू राजपूत होऊन मोगलांची चाकरी का करतोस? असे म्हणतात. अरे ही चाकरी नाही. नोकरी आहे. तलवारीला नेहमी म्यान लागतं. म्यान मोगलाचं असलं तरी तलवार राजपुताचीच आहे. हा कोंढाणा मला दिला बादशहाने. म्हणाला, 'सांभाळ.' मी सांभाळला. पाच वर्ष झाली. एक मुंगी पण परवानगीशिवाय वर येत नाही. खाली पुण्यात ती म्हातारी जिजाबाई बसलीय, तिचा पोरगा शिवाजी बसलाय. त्यांना वाटतं. आम्ही मावळे, आम्ही गड घेतो. घे. ये म्हणावं. मी दरवाजे बंद केलेत. तोफा लावल्यात. कल्याण दरवाजा बंद, पुणे दरवाजा बंद. आता या. या कातळावरून या. बघू किती येता. बातमी कानी आली होती एका गुप्तहेरांकडून. तानाजी येणार. त्याच्या पोराचं लगीन आहे म्हणे. तरी येणार. मला हसू आलं. मराठ्यांचं हेच. लगीन अर्धवट सोडून युद्धाला येतात. मग म्हणतात. आम्ही भावनिक. अरे युद्ध भावनेने नाही जिंकता येत. शिस्तीने जिंकलं जातं. पण आज... आज काहीतरी वेगळं वाटतंय. संध्याकाळपासून किल्ल्यावर कावळे ओरडताहेत. माझा हात दुखतोय. सकाळी तलवार धरताना घसरला आणि ती डोणगिरीची वाट... तिथे कोणीतरी आहे असं वाटतंय. बहिर्जी नावाचा कोल्हा फिरतोय म्हणे खाली. तो वाट शोधतोय.
         शोधू दे. वाट सापडली तरी मी आहे इथे. मी उदयभान. मी ऐकलंय, तानाजी मोठा योद्धा आहे. येऊ दे. दोन हात होऊ देत. जर मी मेलो तर? मेलो तर काय? राजपुताला मरणाची कसली भीती? पण एक वाईट वाटतं, मी जर इथे मेलो, तर माझं प्रेत राजस्थानात जाणार नाही. इथेच या काळ्या कातळावर पडेल आणि लोक म्हणतील, एक राजपूत मोगलांसाठी मेला. नाही, मी मोगलांसाठी नाही मरत. मी माझ्या किल्ल्यासाठी मरतोय. जो किल्ला मला दिलाय, तो मी सोडणार नाही.'
         उदेभान विचार करीत होता. तोच त्याला आठवली पुजापाठ व तो पुजा करण्यासाठी देवीकडे गेला. त्यातच त्यानं देवी समोर एक दिवा लावला. एकच प्रार्थना केली. उद्या जो येईल, तो मर्द असू दे. माझ्या लायकीचा असू दे. मग मरणंही गोड लागेल.
          उदेभान पडला होता. शेलारमामानं पाडलं होतं त्याला. तोही मरणाच्या घटका मोजतच होता. त्यानंतर शेलारमामा विचार करु लागले.     
           'हात थरथरतोय. सत्तर वर्षाचा झालोय मी. मी या हाताने किती लोक मारले, मोजले नाहीत. पण आज... आज हात थरथरतोय. तानाजी पडला. माझ्या डोळ्यासमोर पडला. उदयभानाची तलवार त्याच्या छातीत. तो म्हणाला, "मामा......." पुढे काही बोलला नाही.
         मी काय करणार होतो? मी म्हातारा. मावळे पळत होते. म्हणत होते, सुभेदार पडला, गड नाही येणार. मग मी काय केलं? मी माझी तलवार काढली. या सत्तर वर्षाच्या हाताने. उदयभान समोर आला. जवान पोरगा. ताकदवान. म्हणाला, "म्हाताऱ्या, हो बाजूला."
        मी म्हणालो, "अरे, मी शेलार मामा. तानाजीचा मामा. तू माझ्या भाच्याला मारलंस? जरा माझ्याशी लढून पाहा."
         त्याने वार केला. मी अडवला. खरं सांगू? त्या क्षणी मला माझ्या बहिणीचा चेहरा दिसला. तानाजीची आई. म्हणाली होती, 'दादा, याला सांभाळ.' 
         मी सांभाळू शकलो नाही तानाजीला. परंतु मी उदेभानाला मारलं. एका घावात नाही. तीन घावात. म्हाताऱ्याच्या रागात ताकद असते रे. तो पडला. मग आम्ही ओरडलो. गड आला. गड आला. पण तानाजी नाही उठला. आता सगळे म्हणताहेत, शेलार मामाने उदेभानला मारलं. मामा मोठा पराक्रमी. अरे कसला पराक्रमी? मी जर दोन प्रहर आधी पोहोचलो असतो तर? मी जर त्याच्या जवळ असतो तर? रायबाचं लगीन आहे म्हणे. तानाजी म्हणाला होता, आधी लगीन कोंढाण्याचं. आता मी काय सांगू रायबाला? की तुझ्या बापाला मी वाचवू शकलो नाही, पण त्याचा बदला घेतला? परंतु बदल्याने पोराचा बाप परत येतो का? मी आता इथेच बसेन. या बुरूजावर. जोपर्यंत हा गड शिवबाच्या हातात आहे, तोपर्यंत इथेच बसेन. कारण माझा भाचा इथेच झोपलाय. याच स्वराज्याच्या मातीत बसलाय.' शेलारमामा तिथंच विचार करीत बसले होते.
          गोदावरी वर गेली होती. तोच कातळ दिसला. रक्ताने भिजलेला. एका बाजूला तानाजी, दुसऱ्या बाजूला उदेभान. शेलार मामा तिथंच बसला होता, अजूनही. म्हणत होता की मी गड राखीन.
          ज्याप्रमाणे तानाजी कोंढाणा लढता लढता धारातीर्थी पडला. तसाच उदेभानही कोंढाणा लढता लढता धारातीर्थी पडला. तसा तो मरण पावला नव्हताच. त्यातच त्याच्या मनात विचार आले होते. मरणानंतर, कोंढाण्याच्या कातळावर असतांना आलेला विचार होता तो.
          'संपलं. किती वेळ लागला? एक वार? दोन वार? शेलार मामा म्हातारा होता. पण त्याच्या वारात..... त्याच्या वारात राग नव्हता, दुःख होतं. ते दुःख जास्त लागतं. मी पडलोय. माझ्या छातीतून रक्त वाहतंय. शरीर थंड होतंय. वर आकाश दिसतंय. तेच आकाश जे राजस्थानात दिसायचं. तेच इथे पण आहे. फरक नाही. मी काय केलं आयुष्यभर? राजस्थान सोडलं. मोगलांची नोकरी धरली. किल्ले राखले. कोंढाणा राखला. लोक म्हणायचे, उदेभान मोठा लढवय्या. पण कोणी म्हणालं नाही, उदेभान मोठा माणूस. आता समजतंय. तो तानाजी...... तो आधी पडला. माझ्याच हाताने. तो पडताना काय म्हणाला होता? 'गड आला का?' त्याला स्वतःच्या जिवाची चिंता नव्हती. त्याला गडाची चिंता होती आणि मी? मी मरताना काय विचार केला? माझं प्रेत कुठे जाईल? हाच फरक आहे. तो त्याच्या मातीसाठी मेला. मी दुसऱ्याच्या पगारासाठी. दोघेही एकाच कातळावर पडलोय. पण उद्या लोक त्याच्या नावाने गडाचं नाव ठेवतील. अन् माझ्या नावाने...... काय ठेवतील? काहीच नाही. एक बुरुज पण नाही. ठीक आहे. हेच योग्य आहे. 
          शिवाजी राजा जिंकला. त्याचा सिंह गेला, पण त्याचं स्वराज्य राहिलं आणि मी? मी पण राहिलो. या कातळात. या मातीत. मी आता या गडाचाच झालो. कायमचा. कोंढाणा... नाही, आता सिंहगड... माफ कर मला. मी तुला राखू शकलो नाही. पण तू मला ठेवून घेतलंस. बस. आता शांत झोपतो.'
           ते उदेभानाचं स्वगत विचार करणं. तोच श्वास भरुन येत होता. तसं त्यानं इकडं तिकडं पाहिलं. त्याला लढाई चालू असलेली दिसली. त्याला हायसं वाटलं नाही. तो निराश झाला व त्यातच विचार करीत करीत तो गतप्राण झाला.
          गोदावरीचं स्वतः विचार करीत होती.
         'मी गोदावरी. डोणज्याची. लोक म्हणतात, नदीचं नाव आहे माझं. पण मी नदी कधी पाहिलीच नाही. मी पाहिलाय तो फक्त हा कडा. हा कोंढाणा. 
          मी रोज सकाळी गुरं घेऊन निघते, याच कड्याखालून. वर पाहते, तर वाटतं की एवढा मोठा किल्ला, पण आपल्यासाठी नाही. उदेभानचे लोक वरून दगड मारत होते, म्हणत होते. खालीच रहा. मग त्या रात्री तो आला. बहिर्जी. म्हणाला, "राजाचा माणूस आहे. मला वाटलं खोटं बोलतोय. पण त्याच्या डोळ्यात चोरी नव्हती. मी वाट दाखवली. उंबराच्या झाडाची. मला वाटलं, मी फक्त वाट दाखवतेय. अन् तेव्हा कळलंच नाही, मी काय दाखवतेय ते.
            दुसऱ्या रात्री दुसरा आला. त्यानं तानाजी नाव सांगीतलं. लग्नाच्या पंगतीवरून आलो म्हणाला. मला म्हणाला की उद्या भगवा दिसेल. मी रात्रभर झोपले नाही. वर मशाली दिसत होत्या. ओरडणं ऐकू येत होतं. मी फक्त जपत होते. जय भवानी, जय भवानी. पहाटे अग्नी पेटला. सकाळी सगळे खाली आले. परंतु तानाजी नाही आला. जेव्हा सूर्याजी आले. तेव्हा कळलं की तानाजी मरण पावले.
           लोक म्हणतात मी गड जिंकून दिला. पण मी तर काहीच नाही केलं. मी फक्त माझी वाट सांगितली. माझ्या बापाने दाखवलेली वाट. आता सगळे वर जातात. म्हणतात हा सिंहगड आहे. मी पण जाते कधी कधी. त्या उंबराच्या झाडाजवळ उभी राहते. तिथे अजूनही दोराचे व्रण आहेत कातळावर. मी हात लावते त्या व्रणांना, तर वाटतं, तानाजीनंच माझा हात धरलाय आणि सांगतोय की पोरी, रडू नकोस. तुझी वाट खरी होती. मी गोदावरी. डोणज्याची. जिच्या वाटेने एक सिंह वर गेला आणि कधीच परत खाली आला नाही.
           बहिर्जी धावतच आला होता. परंतु महाराजांना वाटलं की तो धावत आला नाही. चालत आला. हळू हळू. मान खाली घालून. मग महाराजांना कळलं. 'गड आला.'
          बहिर्जी म्हणाला, "गड आला राजं."
          ती बातमी. ती ऐकताच शिवरायांना आनंद झाला. एक क्षण. फक्त एक क्षण. मग विचारलं, "तानाजी कसा आहे?" त्यावर तो काही बोलला नाही. फक्त बघत राहिला. मग शिवराय पुन्हा ओरडले, "तानाजी कुठे आहे?" त्यावर तो म्हणाला, "राजं, सिंह गेला."
         ती बातमी. ती ऐकताच शिवरायांनी छातीला हात लावला. ते स्वप्न पाहात की आता सगळे समोर उभे आहेत. सूर्याजी, शेलार मामा वैगेरे वैगेरे. सगळे तानाजीला घेऊन आलेत. पालखीत. त्यानंतर शिवराय जवळ गेले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तसा तो त्यांना थंड पडलेला दिसला.
         शिवरायांनी तानाजी मरणाची बातमी ओकताच विचार करु लिगले. 
          "हा तोच तानाजी. जो लहानपणी माझ्यासोबत रोहिड्याच्या घाटात आंबे चोरायचा. जो म्हणायचा,
          "शिवबा, तू राजा हो, मी तुझा सुभेदार होतो. मी अजून राजा झालो नाही. फरंतु तो सुभेदार झाला आणि लवकरच गेला पण. मी गड जिंकायला सांगितला होता. त्यानं जीव जिंकून दिला. आता लोकं म्हणतील, "गड आला पण सिंह गेला. नाही, सिंह नाही गेला. सिंह इथेच आहे. या गडांमध्ये, या मातीमध्ये. फक्त माझा मित्र..... फक्त माझा मित्र गेला."
         ते शिवरायासमोर तानाजीबद्दलचे विचार. ते विचारच करीत होते.
         "आता या कोंढाण्याला काय करू मी? या विजयाचं काय करू? कोणत्या तोफा उडवू?"
            ते राजगडावर तानाजीबद्दल विचारच करीत होते. तोच रायबा समोर आला. बारा वर्षाचा पोरगा. बापाच्या प्रेताजवळ उभा आहे. रडत नाही. शिवरायांकडे बघतोय. तोच शिवराय परत विचार करु लागले. 
         "मी त्याला काय देऊ? गड देऊ? जहागिरी देऊ की बाप देवू त्याचा. जहांगीरी देवून काय फायदा? त्याचा बापच गेला ना. आता त्याला बाप पाहिजे. तो मी देऊ शकत नाही. तशा माँसाहेब म्हणायच्या, 'शिवबा, स्वराज्याला किंमत लागते.' आज कळली किंमत. एका किल्ल्याची किंमत एक तानाजी. महाग आहे सगळं. खूप महाग आहे. उद्यापासून लोक या किल्ल्याला सिंहगड म्हणतीलही. पण माझ्यासाठी तो कधीच कोंढाणा नाही राहणार, सिंहगडही नाही होणार. कारण माझ्यासाठी तो तानाजीच्या रक्ताने पावन झालेला एक थडगं आहे. जिथे माझा भाऊ, माझा जीवलग, माझा तानाजी झोपलाय."
        शिवराय विचार करता करता उठले. त्यांना राहावलं नाही व ते लगबगीने निघाले. ते सिंहगडावर निगाले. आता त्यांना वाटू लागलं होतं. तानाजीची भेट केव्हा घेतो आणि केव्हा नाही. असं त्यांना होवून गेलं होतं. 

********************************************

           गोदावरी अठ्ठावीस वर्षाची होती. तिचा जन्म सन १६४२ चा. ती कोंढाण्याच्याच पायथ्याशी, डोणजे गावात राहत होती. तिच्या घरी शेळ्या होत्या व ती शेळ्या चारण्याचे काम करीत असे.
          तिचा वडिलोपार्जित धंदा कुंभारकाम होता. जातीनं ती कुंभारीण होती. परंतु ती तो धंदा न करता नित्यनेमाने गडावर जात असे. कधी गडावर वा गडाच्या आसपास ती बकऱ्या चारत असे व ते करीत असताना ती गडावरील हिशोब ठेवत असे. गडावर कोणकोणत्या हालचाली घडतात, याचे निरीक्षण करीत असे. ते बाळकडू तिला तिच्या आजोबांकडून व वडिलांकडूनच मिळालेले होते.
            कोंढाणा अभेद्य किल्ला होता. त्यावर मुघलांचा कडक पहारा होता. कोणतेही शत्रुसैन्य तिकडे भटकतच नव्हते. अन् भटकलेच तर त्यांचा वेळीच बंदोबस्त केला जात असे.
            ती वाटेवर असलेल्या सैनिकांना टोपल्यात काहीतरी जीवनावश्यक वस्तू नेऊन विकत होती. बदल्यात तिला काही मोबदलाही मिळायचा. ज्यातून तिच्या कुटुंबाला आधार व्हायचा.
           कोंढाणा किल्ला....... त्या कोंढाण्यावर सर्वात आधी कोळी राजा नाग नाईक याची सत्ता होती. त्याच्या नावावरूनच कोंढाण्याला कोंढाणा असे नाव पडले. जवळपास सन १३२८ पर्यंत तो या किल्ल्यावर अधिवास करीत होता. मग सत्ता बदलली.
           तो वेढा महम्मद बिन तुघलकाचा होता. ज्या वेढ्याला आठ महिने लागले होते. तरीही तो किल्ला राजे नाग नाईकांकडून महम्मद तुघलकाला जिंकता आला नाही. परंतु तद्नंतर रसद संपल्याने राजे नाग नाईकांनी तो किल्ला महम्मद बिन तुघलकाच्या स्वाधीन केला. पुढे काही वर्षे महम्मद बिन तुघलकाने या किल्ल्यावर राज्य केले. पुढे या ठिकाणी बहामनीची सत्ता आली व तद्नंतर हाच किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाने जिंकून घेतला. तो काळ होता, स १४९०. तो होता मलिक अहमद निजामशाह.
           काही दिवस निजामशाहाने या किल्ल्यावर आपली सत्ता गाजवली. त्यानंतर हाच किल्ला आदिलशाहाने जिंकून घेतला. तेव्हापासून तो किल्ला आदिलशाहाकडेच होता. त्यानंतर या किल्ल्यावर आदिलशाहाने दादोजी कोंडदेवांना सुभेदार म्हणून नेमले.
         दादोजी कोंडदेव..... शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचे मित्रच. ज्यांच्यावर शहाजी राजांची विशेष मर्जी होती. शिवरायांना डावपेच शिकविण्यात व राज्यकारभाराचे ज्ञान देण्यात शहाजी राजांना दादोजी कोंडदेवांनी मदत केली. याचेच उपकार म्हणून की काय, शिवरायांनी वयात येताच इतर बाकीचे किल्ले घेतले. परंतु कोंढाण्याकडे लक्ष दिले नाही.
           दादोजींचे शिवरायावर असलेले उपकार. त्याच उपकाराची परतफेड म्हणून कोंढाणा किल्ला सन १६४७ पर्यंत आदिलशाहाच्याच ताब्यात राहिला. परंतु दुर्दैव असे की कोंढाण्याचे सुभेदार असलेले दादोजी सन १६४७ ला मरण पावले. तद्नंतर शिवाजी दादोजींच्या उपकारापासून मोकळे झाले.
           दादोजी कोंडदेव मरण पावताच आदिलशाहाने या किल्ल्यावर नवा किल्लेदार बसवला. ज्याचे नाव होते सिद्दी अंबर. सिद्दी अंबर हा विलासी व चैन भोगणारा किल्लेदार होता. ज्याची माहिती गुप्तहेरांकडून शिवरायांना मिळाली होती. मग शिवरायांनी एक दूत कोंढाण्यावर पाठवला.
           गुप्त बैठका होऊ लागल्या. कळले की या किल्ल्याचा किल्लेदार असलेला सिद्दी अंबर हा लाच घ्यायला तयार आहे. असे कळताच शिवरायांनी सिद्दी अंबरला लाच दिली व हा किल्ला सन १६४७ ला जिंकून घेतला व त्याला लष्करी केंद्र बनवले.
          शिवरायांनी आदिलशाहीचे बरेच किल्ले जिंकले होते. हेच खटकले आदिलशाहाला. मग डावपेच सुरू झाले. शहाजी राजांना विचारणा केली गेली. त्यावर शहाजींचे स्पष्ट उत्तर होते की जहागिरीचा कारभार चालविण्यासाठी किल्ले घेतले जात आहेत. त्या उत्तराने समाधान न झाल्याने शेवटी आदिलशाहाने शहाजी राजांना अटक करण्याचा विचार केला. अशातच २५ जुलै १६४८ उजाडले व त्या दिवशी शिवरायांच्या राजकीय हालचाली रोखण्यासाठी आदिलशाहाने शहाजी राजांना अटक केली गेली. बदल्यात काही अटी ठेवल्या. त्यात मुख्य अट होती, जिंकलेला कोंढाणा आदिलशाहाला परत देणे व बंगळुरूचा काही भाग देणे. ज्यातून शहाजी राजांची सुटका करून घेण्यात आली. ते साल होते, सन १६४९.
           शहाजी राजांची सुटका करून घेतल्यानंतर कोंढाणा परत आदिलशाहाच्या ताब्यात गेला व तो सन १६५६ पर्यंत आदिलशाहाच्याच ताब्यात राहिला. परत कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आदिलशाहाकडे नको म्हणून सन १६५६ ला तो परत घेण्यात आला व त्यानंतर तोच किल्ला सन १६६५ पर्यंत म्हणजेच पुरंदरच्या तहापर्यंत तो किल्ला शिवरायांकडेच होता.
           गोदावरीचा जन्म सन १६४२ ला झाला. तिचं बालपण सिंहगडाच्याच मातीत गेलं. लहान असताना ती आजी-आजोबांच्याच कुशीत खेळायची. ज्यांच्या सानिध्यात वावरताना गोदावरी हेरखातं शिकत होती, ते तिचं लहानगं वय होतं. तसं पाहिलं तर त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यामुळे गोदावरी शाळेत जाऊ शकली नाही. कारण शाळा तशा नव्हत्याच आणि होत्या तर तिथे फक्त राजदरबारातील मुलांना शिकायला परवानगी होती. शिवाय गोदावरीचे मायबाप अगदी सामान्य परिवारातील.
          गोदावरी शिकली नाही, परंतु तरीही ती हुशार झाली. त्याचं कारण म्हणजे घरात चालणाऱ्या गोष्टी. आई-वडील सतत पोट जगवण्यासाठी कामाच्या शोधात असायचे. घरी आजी-आजोबाच असायचे. ते आजी-आजोबा तिला गोष्टी सांगायचे नाही, तर घरात कधीकधी गोष्टींना पेवच फुटायचा. ज्या गोष्टी गोदावरी ऐकायची, त्यात असायचं स्वराज्याचं गणित. स्वराज्यात काय काय घडतंय, त्याच्या गोष्टी. मग एखाद्या वेळेस एखाद्या सरदाराने कसा पराक्रम केला, ह्याही गोष्टी गोदावरीच्या घरी नित्यनेमाने निघत असत. त्या ऐकूनच गोदावरी तरबेज झाली होती.
          गोदावरीला बहिर्जी आवडत असत. त्यातच आवडत असत तानाजी. ते तानाजीचे पराक्रम ऐकण्यात गोदावरीला आनंद वाटायचा व वाटायचं की आपणही तानाजीसारखंच नाव मिळवावं.
           गोदावरीचा जन्म जेव्हा झाला. तेव्हा तिचं गाव डोणजे होतं. बालपणापासूनच हेरगिरीचं दान तिला मिळालं नव्हतं. तिचे आईवडीलच नाही तर तिचे आजीआजोबाही हेरगिरी करुन स्वराज्याला मदत करीतच नव्हते. ज्यातून कोंढाण्यात स्वातंत्र्य निर्माण होईल. परंतु शत्रुंच्या हालचाली व त्यांचा वार्तालाप कानी पडताच गोदावरीच्या मनात स्वराज्याचं स्फुर्लिंग पेटलं. ज्यातून ती जेव्हा गडावर जात असे. तेथे असलेली माहिती ती स्वराज्यरक्षकाला पुरवीत असे.
          गोदावरी वयात येताच पहाटे पाचला उठून आईसोबत गडावर जात असे. ज्यातून शे॓ळीचं दूध ती विकायला नेत असे गडावर. दुपारी कांदाभजी, कधी पिठलं भाकरी देखील गडावर नेत असे विकायला. त्या अनवाणी पायाने, पायात चप्पल न घालता कल्याण दरवाज्याची उतरंड चढतांना तिला फारच मजा येत असे. 
          गोदावरी तशी शाळेत गेली नाही. परंतु आकडेमोड आणि अक्षरमोड शिकली होती ती. घरी तिच्या आजोबांनी तिला अक्षरमोड व आकडेमोड शिकवलं होतं. 
          पावसाळ्यात तर ती सिंहगडाची राणीच असायची. कारण पावसाळ्यात सगळं सैन्य निवासाला असायचं गडावर. ते बाहेर निघायचं नाही. त्यामुळंच तिचा कांदा भजी विकण्याचा धंदा चांगला व्हायचा. मात्र अशा दिवसात अनवाणी चालतांना फार काळजी घ्यावी लागत असे. त्याचं कारण होतं, अनवाणी चालल्या जाणाऱ्या वाटेत संकट असणं. कधी त्या वाटेवरुन सापासारखे प्राणी जात असत. ज्यांच्या शरीरावर नकळत पाय पडण्याचा धोका निर्माण झाला होता. 
          थंडीच्या दिवसात गड उंच टेकडीवर असल्यानं वर गडावर धुकंच पडायचं. अशा धुक्यातून वाट काढतांना कठीण व्हायचं. परंतु पायी चालत जात असल्यानं चालणारी वाट अगदी सहज चालवून घ्यायची तिला. 
          गोदावरी दररोजच आईसोबत गडावर जात असे. त्याचं कारण होतं, गडावरुन होणारं पुण्याचं दर्शन. गडावरुन अख्खं पुणं दिसायचं. अख्खं पुणंच नाही तर पुरंदर व आसपासचे किल्लेही दिसायचे. 
           गोदावरीचं नाव गोदावरी ठेवलं होतं आणि तिनंही आपलं नाव सार्थक केलं होतं. कारण ती कठीण परिस्थितीत धुक्यातून वाट काढत काढत आपली वाटचाल करीत होती. ती नदीसारखी होती, कितीही प्रवाहाची वाट अडवली तरी नदी जशी आपलं वाहाणं बंद करीत नाही. तशाच स्वरुपाची ती होती.
            गोदावरी ज्यावेळेस जन्मास आली. त्यावेळेस कोंढाण्याचे किल्लेदार दादोजी कोंडदेव होते. ती लहानच होती, तेव्हा तिला कडेवर घेवून तिची आई गडावर काम करण्यासाठी जायची. तेव्हा गडावर जाताच ती लहान असल्यानं तिचा गडावर खूप लाड करीत असत, गडावरील माणसं. त्यातच दादोजी कोंडदेव सुद्धा तिचा लाड करायचे. अशा लाडातच ती आज पाच वर्षाची झाली होती. जेव्हा दादोजी मरण पावले. 
          दादोजी जेव्हा मरण पावले. तेव्हा असलेलं गोदावरीचं वय हे डोळ्यात भरणारं होतं. अशातच दादोजी जरी तिचा लाड करीत असले तरी तिला दादोजीच्या मरणाचं दुःख वाटलं नाही. कारण तिला त्यावेळेस काही समजतच नव्हतं. परंतु जसा काळ सरकला. तसे तिला दादोजी आठवले व दादोजीचं प्रेमही तिला आठवायला लागलं होतं. ज्या दादोजींनी शिवरायांना लष्करी व राजनीतीक शिक्षण दिलं. त्याच दादोजीचे उपकार म्हणून शिवरायांनी कोंढाणा सन १६४७ पर्यंत जिंकला नाही. तेच आठवलं तिला व तिला शिवरायांबद्दल आस्था वाटायला लागली होती. त्यातच स्वराज्यनिष्ठाही वाटायला लागली होती. मग तिच्या मनात स्वराज्याच्या मातीतील प्रेम निर्माण झालं. ज्या मातीच्या प्रेमानं स्वराज्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली व ती तद्नंतर त्याच स्वराज्यासाठी प्रयत्न करु लागली होती.
          गोदावरीला बहिर्जी आवडत असत. त्याचं कारण बहिर्जी मोठा सरदार होता म्हणून नाही. बहिर्जी दिसायचा सामान्य माणसासारखा. कधी माळी व्हायचा, कधी भिकारी, कधी वारीला निघालेला वारकरी. पण त्याच्या डोळ्यांनी तो शत्रूचा सगळा डाव टिपायचा.
          गोदावरीला वाटायचं, तलवार चालवणाऱ्यापेक्षा बातमी आणणारा मोठा. कारण एका चुकीच्या बातमीने गड जातो आणि एका बरोबरच्या बातमीने स्वराज्य वाचतं. तसे ते तिचा लाडही करायचे. 
           एक दिवस सिंहगडाच्या पायथ्याशी बहिर्जींची टोळी आली. गोदावरीने धाडस करून त्यांना पाणी दिलं. तिनं तोवर ऐकलेल्या सगळ्या गोष्टी, कोणता व्यापारी गडावरून खाली उतरला, कोणत्या वाटेने मुघलांचे घोडे गेले, वाड्यात कोणाची कुजबुज सुरू आहे, अगदी जशाच्या तशा सांगितल्या.
           बहिर्जी हसले आणि म्हणाले, "पोरी, तू शाळेत गेली नाहीस, पण तू हेर झालीस."
           तिथूनच गोदावरीचा खरा प्रवास सुरू झाला. ती आता फक्त गोदावरी राहिली नाही, ती झाली होती सिंहगडाची डोळस गोदावरी.
           बहिर्जींनी त्या दिवशी गोदावरीला नाव दिलं नाही, काम दिलं.
           ''उद्यापासून तू गडावर भाजी विकायला यायचं.''
           बहिर्जी म्हणाले होते. 
           "परंतु फक्त भाजी विकू नकोस, डोळे विक."
           गोदावरीला काही कळलं नाही. पण दुसऱ्या दिवसापासून ती टोपली घेऊन सिंहगड चढू लागली. वरचे पहारेकरी, त्यांची बदलणारी पाळी, कोणता सरदार केव्हा वाड्यात येतो, कोणत्या रात्री मशाली जास्त पेटतात. ती सगळं लक्षात ठेवायची. 
            बहिर्जी हुशार होते. त्यांच्याजवळ अनेक माणसे काम करीत असत. कोंढाण्याचा गड उतरताना आंब्याच्या झाडाखाली बहिर्जीचा एक माणूस असायचा. गोदावरी त्याला एका वाक्यात सगळं सांगून जायची. कधीच कागद नाही, कधीच खूण नाही. सगळं तोंडपाठ.
          हळूहळू गोदावरीला कळू लागलं की हेरगिरी म्हणजे लपून ऐकणं नाही, तर लोकांना बोलतं करणं आहे. ती बायकांमध्ये मिसळायची. त्यांच्या गप्पांतूनच तिला कळायचं. कोणता हवालदार लाच घेतो, कोणत्या व्यापाऱ्याच्या पोत्यात मिठाऐवजी बंदुकीची दारू आहे. एकदा तर तिने मोठा घात ओळखला. पुण्याहून आलेला एक सोनार गडावरच्या तटबंदीची मापं काढत होता. सगळ्यांना वाटलं सोनं मोजतोय. गोदावरीने त्याच्या पायाकडे पाहिलं. त्याच्या पायात माती नव्हती, गडावरच्या माणसाच्या पायात असते तशी. ती धावतच बहिर्जींकडे गेली. त्या रात्रीच तो सोनार पकडला गेला. तो मुघलांचा हेर निघाला. त्या दिवसापासून बहिर्जी तिला म्हणू लागले. 'सिंहगडाची गोदा' पण गोदावरीचं खरं कसोटीचं काम अजून बाकी होतं. स्वराज्यावर मोठं संकट येणार होतं आणि त्याची पहिली खबर गोदावरीलाच आणायची होती.
            १६५८ चं साल. आदिलशाहीने सिंहगडावर नजर ठेवायला आपली माणसं पाठवली होती. बहिर्जींना खबर लागली होती की गडाचा एक सेवक फुटणार आहे.
          बहिर्जी चाणाक्ष विचारांचे होते. त्यांनी गोदावरीला बोलावलं. म्हणाले,
          "गोदे, आता भाजी विकून नाही चालणार. तुला शत्रूच्या तोंडात जावं लागेल. कोंढण्याच्या पायथ्याच्या बाजारात एका बांगडीवालीच्या वेशात बसायचं. तिथे तो फितूर सेवक आपल्या मालकाला भेटणार आहे."
            ते बहिर्जींचं बोलणं. गोदावरीनं फक्त मानेनंच होकार दर्शवला व विचार करु लागली. कारण तिनं कधीच गावाबाहेर पाऊल टाकलं नव्हतं. पण तिने चुडा भरला, कपाळावर टिकली लावली आणि बांगड्यांची पेटी घेतली. ती बाजारात बसली. दुपार टळली तसा तो सेवक आला. त्याच्यामागे एक उंच दाढीवाला व्यापारी. गोदावरीने बांगड्या घालताना त्यांचं बोलणं ऐकलं. उद्या पहाटे गडाचा मागचा दरवाजा उघडा ठेवायचा, असा कट होता.
          तिच्या हातात बांगड्या थरथरत होत्या, पण तिचा आवाज नाही. तिने बांगडी घालता घालता त्या व्यापाऱ्याच्या हातावर एक कुंकवाचं बोट उमटवलं. तीच खूण होती बहिर्जींच्या माणसासाठी. मग रात्रीतच दोघं पकडले गेले. गड वाचला. पण... गोदावरी एक महिला. ती गोष्ट हवेसारखी इतरत्र पसरली. त्यातच चला याचं बक्षीस म्हणून गोदावरीला दरबारात बोलावलं नाही. तिला बोलावलं तिच्याच वाड्यात. विचारणा केल्या गेली.
          "बाईच्या जातीने हे असलं हेरगिरीचं काम करणं शोभतं का?" 
           गावातली चार माणसं तिच्या आजीला म्हणाले.       
           "उद्या लग्न कोण करणार तिच्याशी?"
          ते गावातील लोकांचे बोलणे. ते सहन न झाल्यानं तिची आजी रडली. गोदावरीने पहिल्यांदा पाहिलं की शत्रूपेक्षा आपल्याच लोकांची भीती मोठी असते. ती पुढे बहिर्जींना जाऊन म्हणाली,
           "मला नको हे काम. मला माझ्या आजीसाठी जगायचंय."
            ते तिचं बोलणं. मात्र बहिर्जी त्या दिवशी पहिल्यांदा गंभीर झाले. म्हणाले,
           "गोदे, स्वराज्य तलवारीने नाही, तर अशा बदनामी पचवणाऱ्या बायकांनी उभं राहातं. तू मागे हटलीस तर उद्या दुसरी कोणतीच बाई पुढे येणार नाही."
           बहिर्जी असे म्हणून निघून गेले. त्यातच त्यांना वाटलं की आता गोदावरी कामच करणार नाही स्वराज्यासाठी. परंतु आश्चर्य घडलं. एक दिव्य चमत्कार घडावा तसा. दुसऱ्या दिवशी गोदावरीनं पुन्हा टोपली उचलली. पण आता ती फक्त सिंहगडासाठी नाही, तर तिच्यासारख्या सगळ्या गोदावऱ्यांसाठी चालत होती, ज्यांना शाळा नव्हती पण डोळे होते.
            
******************************************

         श्रावण महिना उजळला होता. सिंहगडावर धुकं पसरलं होतं. गोदावरी रोजच्याप्रमाणे भाजीची टोपली घेवून वर आली. पण आज वाड्याबाहेर गर्दी वेगळीच होती. घोड्यांचे टाप, शिंगांचे आवाज. इत्यादी देखील ऐकायला येत होते. अशातच कोणीतरी कुजबुजलं.
          "महाराज गडावर आलेत."
           गोदावरीचा श्वास अडकला. ज्या माणसाच्या गोष्टी ऐकून ती मोठी झाली, तो माणूस आज त्याच मातीत होता.
            बहिर्जींनी तिला आत बोलावलं. दिवाणखान्यात एक तेजस्वी, पण अगदी साध्या धोतरात बसलेला माणूस. डोळे मात्र. सगळं आरपार पाहणारे. अशातच महाराज बहिर्जींना म्हणाले,
         "हीच का ती गोदा?" महाराज म्हणाले.
          बहिर्जी हसले व म्हणाले,
          "होय महाराज. हिच्या बांगडीच्या खुणेने गड वाचला."
          महाराजांनी गोदावरीकडे पाहिलं. तिला वाटलं आता ते मोठं बक्षीस देतील, सोन्याची माळ देतील. पण महाराज उठले, तिच्या जवळ आले आणि म्हणाले,
           "गोदावरी, तू शाळेत गेली नाहीस म्हणतेस? पण तू आम्हाला शाळा शिकवलीस. गड कसा राखायचा ते शिकवलंस."
          त्यांनी आपल्या हातातली छोटी कट्यार काढली. मुठीवर राजमुद्रा होती. तसे ते म्हणाले. तेव्हा त्यांचा आवाज कडक होता. 
         "ही तलवार नाही. ही जबाबदारी आहे. आजपासून तू माझ्या हेरखात्यातील पहिली महिला हेर. पण एक अट......"
           महाराजांची ती अट. महाराज अट बोलून गेले. तसं गोदावरीला आश्चर्य वाटलं. तशी तिनं मान वर केली. त्यातच महाराज उत्तरले,
          "उद्यापासून तू एकटी काम करणार नाहीस. तुझ्यासारख्या आणखी दहा गोदावऱ्या तू घडवायच्या. ज्यांना कोणी शिकवत नाही, त्यांना तू शिकवायचं."
          तो दिवस व त्या दिवशी गोदावरीला पहिल्यांदा वाटलं की ती शिकली नाही, याची खंत बाळगायची गरज नाही. कारण आता ती स्वतःच शाळा झाली होती. बाहेरचं धुकं विरलं होतं आणि सिंहगड उन्हात चमकत होता. जसा तिच्या डोळ्यात स्वराज्य चमकत होतं तसं.
          महाराजांचा शब्द मिळाला, पण काम सोपं नव्हतं. कोणता बाप आपल्या पोरीला हेर व्हायला पाठवणार होता? मात्र गोदावरीने शाळा काढली नाही. तिने अंगण काढलं. दुपारी जेव्हा सगळे पुरुष शेतात असायचे, तेव्हा ती वाड्याच्या मागे दहा पोरींना जमवायची. कोणी कुंभाराची, कोणी गुराख्याची, कोणी विधवा. तिनं त्यांना लिहायला शिकवलं नाही. तिनं त्यांना पाहायला शिकवलं. उघड्या डोळ्यानं निरीक्षण करायला शिकवलं. 
           "रांगोळी काढता येते ना?" ती म्हणायची.
           "उद्या वेशीवरची रांगोळी जर सरळ रेषेत असली तर शत्रू नाही आणि जर रांगोळीच्या मध्यभागी एक ठिपका जास्त असला, तर समजा घोडदळ आलंय."
           "ओवी म्हणता येते ना? ओवीतून निरोप पाठवायचा. सासूला वाटेल गाणं म्हणतेय, पण बहिर्जींना कळेल की ती बातमी आहे."
          महिनाभरात सिंहगडाच्या आसपास दहा डोळे तयार झाले. त्या पोरी आता बाजारात, पाणवठ्यावर, मंदिरात असायच्या. कोणी त्यांच्याकडे लक्षही देत नसे. कारण बाईकडे कोण लक्ष देतं? अन् नेमकं तेच स्वराज्याचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरलं.
          सन १६६० उजाडलं होतं. त्यावेळेस पावसाळ्यात मुघलांची मोठी फौज पुण्याकडे निघाली होती. याची पहिली खबर तलवारीने नाही, तर एका पोरीने पाणवठ्यावर म्हटलेल्या ओवीतून आली.
        ओवी होती, "पावसाने नदी भरली, परदेशी मासे लागले किनाऱ्याला."
         बहिर्जींनी ते ऐकलं, ओळखलं. परदेशी मासे अर्थात मुघल. आणि ते ओरडले, मुघल निघाले.

*********************************************

            वाड्याच्या मागचं अंगण. दुपारची ऊन मी म्हणत होती. तशा दहा पोरी गोल करून बसल्यात. गोदावरीने जमिनीत काठीने एक रांगोळी काढली.
            "ही बघा, ही सरळ रांगोळी म्हणजे सगळं निवांत आहे." मग तिनं त्याच रांगोळीच्या मधोमध एक जाड ठिपका ठेवला आणि म्हणाली,
           "हा ठिपका म्हणजे घोड्यांचे टाप. शत्रू आला आहे. हा संकेत देणारा शब्द."
           ते ऐकताच वाड्यातील कुंभाराची सई हसली. म्हणाली,
          "अगं गोदा ताई, एवढ्याशा ठिपक्याने स्वराज्य वाचणार?"
           ते कुंभाराच्या सईचं बोलणं. त्यावर गोदावरी हसली नाही. ती उठली, सईच्या हातातील पाण्याची घागर घेतली आणि अंगणाच्या बाहेरच्या वाटेवर एक ठिपका असलेली रांगोळी काढली. मग तासाभरात बहिर्जींचा माणूस त्या वाटेवरून गेला. त्याने रांगोळी पाहिली आणि घोडा वळवला. तो काहीच बोलला नाही. मग संध्याकाळी बातमी आली. मुघलांचे दोन हेर वेशीवर पकडले.
            ती बातमी. ती बातमी येताच सईच्या अंगावर काटा आला. त्या रात्री पाणवठ्यावर सई पाणी भरत होती. तिथं बहिर्जी पाणी प्यायला आले. तसं त्यांना पाहताच सईने घागर उचलताना हळूच एक ओवी म्हटली,
        "पावसाने नदी भरली, परदेशी मासे आले किनाऱ्याला
माझ्या घागरीला भोक पडलं, पाणी लागलं वाहायला."
         बहिर्जींनी ते ऐकलं. त्यांनी पाणी प्राशन केलं. पाणी पिऊन घागर खाली ठेवली व ते सईकडे बघून फक्त म्हणाले,
          "उद्या दुसरी घागर घेऊन ये."
           बहिर्जींनी तसं म्हणताच सईला कळलं. निरोप पोहोचला. उद्या फौज निघणार. आपणही पिसले जाणार. ज्यातून ती आता मनातून घाबरली होती. 
           गोदावरी कुवारी असतांनाच हेरगिरी करायला लागली होती. तिचं जीवन संघर्षमयच होतं. कारण हेरगिरी करणं. ही एका पुरुषासाठी तेवढ्या प्रमाणात चिकाटीची गोष्ट नव्हती. परंतु महिलांच्या बाबतीत ती चिकाटीची गोष्ट होती. त्यातच तिनं आपल्याच शिकवणीतून दहा स्रिया हेर बनवल्या होत्या. ज्यात शत्रुंची माहिती त्या स्रिया खडान् खडा मिळवीत असे व त्या ती माहिती व्यवसाय करीत करीत स्वराज्यरक्षकाला पुरवीत असत. ज्यात सईसुद्धा होती. 
           हेरगिरी सांभाळता सांभाळता तिनं गावकऱ्यांचाही रोष पत्करला होता. अख्ख्या गावाला वाटत होतं, की गोदावरी हेरगिरी तर करीत आहे. परंतु हे हेरगिरीपण जेव्हा शत्रूला माहित झालं तर शत्रू तिलाच नाही तर अख्ख्या गावालाही सोडणार नाही. म्हणूनच अख्खं गाव तिच्या हेरगिरीपणाला विरोध करीत होता. हेच वाटत होतं तिच्या आईवडीलांनाही. त्यांनीही गावाच्या रोषावर उत्तर म्हणजे तिला हेरगिरीपासून वंचीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्या काळातील गोदावरी नावाचं ते इवलसं फुल आपल्या आईवडीलांचंही ऐकायला तयार नव्हतं. त्यातूनच गावाला वाटत होतं की तिच्यावर कुसंस्कार झालेले आहेत व होत आहेत.
          शिवरायांची खास मर्जी असलेली गोदावरी. तिला खास नजराणाही शिवरायांनी दिला होता. परंतु शिवरायांची तिच्यावर खास मर्जी असूनही शिवरायांची विशेष देखरेख तिच्यावर नव्हती. मात्र बहिर्जी तिच्यावर खास लक्ष ठेवून होते व तेच तिला हुरूप द्यायचे. ज्यातून गोदावरीच्या मनाचा निश्चय पक्का झाला होता.
          आपली मुलगी सुधारत नाही. हे लक्षात आल्यानं गोदावरीच्या आईवडीलांनी तिचा विवाह करण्याचं ठरवलं. तशी ती वयातही आली होतीच. वाटत होतं की तिच्या हेरगीरीची माहिती पंचक्रोशीत होण्यापुर्वी तिचा विवाह निपटून टाकायचा. नाहीतर तिच्या विवाहासाठी कोणीच तयार होणार नाही व तिच्याशी कोणीच विवाह करणार नाही. मग अशातच तिच्यासाठी एक पुण्यातील उपवर मुलगा चालून आला. ज्यानं तिला मागणी घातली होती.
         गोदावरीला आलेलं ते स्थळ. तशी तिची विवाह करण्याची मनातून इच्छा नव्हतीच. वाटत होतं, की जर मी विवाह केला वा विवाहबद्ध झालीच तर माझ्या सासरकडील मंडळी मला हेरगिरी करु देणार नाही. खासकरुन पतीही माझा हेरगिरीला विरोध करेल. परंतु काय करणार, त्या काळात महिलांना विशेष अशी स्वतःचे निर्णय घेण्याची सूट नव्हती. त्यामुळंच ती विवाहाला तयार झाली व अशातच साखरपुडा आटोपला.
          गोदावरीचा साखरपुडा जरी आटोपला असेल. परंतु तिनं हेरगिरी सोडली नाही. अशातच तिचा विवाहही निश्चीत झाला. त्यानंतर तिच्या विवाहाची तिथी उजाडली.
         गोदावरी विवाहासाठी तयार झाली होती. तिच्यासाठी कपडे घेतले गेले होते विवाहाचे. सायंकाळी तिला हळदही लागली होती. फक्त तिची हळदीची चोळी तेवढी घालायची बाकी राहिली होती. ती दुसऱ्या दिवशी घालणारच होती. 
         गोदावरीच्या मनात विवाहाचा तीव्र आनंद होता व तोच आनंद तिच्या डोळ्यातून झळकत होता. सनई चौघडाही वाजायला लागल्या होत्या. घरी विवाहासाठी मंडप सजला होता. पाहुणे आले होते. सगळीकडे आनंदी आनंद होता आणि अशातच कधी न घडावं असं घडलं. एक दूत लग्नमंडपात वऱ्हाडी बनून आला. त्यानं तिला एक संदेश दिला. जो संदेश बहिर्जीनंच पाठवला होता. संदेशात लिहिलं होतं, 'उद्या पहाटे मुघलांची रसद पुरंदरला जाणार आहे. वाटेतील वाट दाखवायला कोणीतरी हवंय. नाहीतर आपलीच माणसं मारली जातील. आपल्याला शत्रूला भटकंवायचं आहे. ही वाट फक्त तुलाच माहित आहे. तुला शत्रुला भटकंवायचं आहे. ही जिकरीचं काम आहे व हे जिकरीचं काम तूच करु शकतेस. अन् हे स्वराज्याचं काम आहे.'
          तो बहिर्जीचा निरोप. तो रात्री आलेला निरोप. घरात विवाहाचा आनंद. मंडप, तोरणं पताका सजलेल्या. अंगी स्वराज्याची निष्ठा. गोदावरीला विचार येत होता. एकीकडे स्वराज्य होतं तर दुसरीकडे स्वतःच्या विवाहाचा प्रश्न. काय करावं सूचत नव्हतं. नाही गेलं तर आपलीच स्वराज्यातील माणसं मारली जाणार. आपला विवाह होणार. परंतु स्वराज्यातील माणसं. अन् एकदा का स्वराज्य गेलं की बस, सारं संपलं. त्यातच ती विचार करु लागली होती दुसऱ्या अंगाने. समजा मी स्वराज्य रक्षणासाठी गेलेच तर आपली माणसं मला आपली म्हणणार नाही. माझा विवाह तुटेल. कदाचित मला घरातून हाकलूनही देतील. साऱ्या उत्साहावर पाणी फेरलं जाईल. काय करावे. कदाचित ही गोष्ट आपल्या आईवडीलांना सांगीतली तर...... तर माझे आईवडील ती गोष्ट माहित झाल्यानं मला स्वराज्यरक्षणाच्या कार्यावर ते जावू देणार नाहीत. ज्यातून स्वराज्याची माणसं वाचू शकणार नाहीत. मग कुठलं स्वराज्य असणार?
         गोदावरी विचार करु लागली. तिला प्रश्न पडला. तशी ती डोणज्याची. प्रश्न होता पुरंदरचा. त्यातच तिला त्या प्रकरणावर विचार करीत असतांना रात्रभर झोप लागली नाही. तशी अर्धी रात्र झाली. गाव संपुर्णतः झोपलं होतं. मग ती हळूच उठली. मनात विचार पक्का केला. विचार निश्चित झाला. आपला विवाह तुटला तरी चालेल. परंतु आपण स्वराज्यासाठी काम करायचं. आपल्याला घरातून हाकलून लावलं तरी चालेल. आपण सध्यातरी बहिर्जींनी सांगीतलेली कामगिरी करायची. मग ठरलं व बेतही ठरला. ती उठली. तिनं विवाहासाठी खास तयार केलेली हळदीची चोळी पेटीत ठेवली. त्यावर आपली हळदीची माळ ठेवली. अन् ती घराबाहेर पडली व आपल्या विवाहाचा विचार सोडून ती स्वराज्य रक्षणासाठी पुढे पाऊल टाकत पायवाट चालू लागली आणि असं करीत असतांना तिनं घरी एक चिठ्ठी ठेवली. ज्यात लिहिलं होतं, 'आई, मी कुठे जात आहे, हे तुलाही सांगू शकत नाही. सांगीतलं असतं तर तूच अडवलं असतं. माझी पाऊलवाट अडवली असती. मात्र एक की मी स्वराज्यासाठी जात आहे. सायंकाळपर्यंत परत येणार आहे आणि ही हळदीची चोळी स्वराज्याचं काम पुर्ण करुन आल्यावर नेसतेच.'
          ते ध्येय. ते ध्येय होतं, तिच्या मनातील मातीत अंकुरलेल्या स्वराज्यनिष्ठेचं. ती पेटून उठली होती, स्वराज्यनिष्ठेनं. ज्या स्वराज्यनिष्ठेनं तिचं मन तयार झालं होतं. बाहेर अंधार होता. बाहेर पाऊसही सुरु होता. सगळं गाव स्मशानागत झोपलं होतं. कुत्री भुंकत होती. परंतु तिनं त्याची तमा बाळगली नाही. स्वराज्यनिष्ठेच्या ध्येयानं तिला पछाडलं असल्यानं ती वाट चालू लागली व वाटेतील सर्व रस्ते रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे दिसत होते तिला. 
          तो पुरंदरचा घाट. ती घाटाची वाट चालत होती. एकेक पाऊल टाकत होती. त्यातच तिनं आपल्या सैन्याला घाटाची वाट दाखवली त्या अंधाऱ्या रात्री, आपल्या होणाऱ्या विवाहावर पाणी फेरुन. ज्यातून १६५६ ला पुरंदर शिवरायांना जिंकता आला होता.
           शिवरायांनी पुरंदर जिंकला. कोणामुळं जिंकला हेही शिवरायांना कळलंच नाही. ज्या रणरागीणीनं आपल्या विवाहाचा विचार न करता पुरंदर शिवरायांना जिंकून दिला. तेही शिवरायांनी तपासलं नाही. त्यातच तिनं जेव्हा परतीची वाट धरली. तेव्हा कोणीही तिला निरोप द्यायला आला नाही. ना ही तिला कोणी वाजत गाजत पुरंदर किल्ल्यावरुन पाठवलं होतं.
         पुरंदर जिंकला होता शिवरायांनी गोदावरीच्या प्रयत्नातून. त्यानंतर गोदावरीचा सत्कारही केल्या गेला नव्हता. तरीही गोदावरी निराश झाली नाही. कारण स्वराज्यनिष्ठा तिच्या मनात कुटकूट भरली होती. ती परत फिरली व परत येईपर्यंत दुसरा दिवस उजळला होता. 
          दुसरा दिवस उजळला. गडावरील सगळे सैन्य आनंदात होते. मात्र गोदावरीच्या घरी आनंद नव्हता. कारण ती मंडपात नव्हती. कुठं गेली असेल? या प्रश्नांकित नजरेनं सगळे घायाळ झाले होते. त्यातच वर व वराकडील आलेले पाहुणे मंडळी विचलीत झाले होते. ते नाना तऱ्हेची दुषणं लावत होते गोदावरीवर आणि तिच्या कुटुंबावर. त्यातच कितीतरी वेळ वाट पाहूनही गोदावरी परत न फिरल्यानं पाहुणे आले तसे परत गेले होते. 
          गोदावरी जेव्हा घरी परत आली, तेव्हा तिची आई रडत बसलेली होती. लाल हळदीची चोळी पेटीवर पडलेली होती. कोणीही तिला विचारत नव्हतं. तो दिवस व त्या दिवशी पुरंदर वाचला. परंतु गोदावरीचा आनंद, तिचं सामान्य आयुष्य त्या सिंहगडाच्या मातीत असलेल्या डोणजे गावातील विवाहाच्या मंडपात विरुन गेलं होतं. पुरंदर वाचला होता. परंतु तो वाचला असला तरी तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली होती. तिचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. तिचा विवाह तुटला होता. 
          गोदावरी पुरंदरवरुन घरी आली. तसं रडत असलेल्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं. तसं तिनं दुर्लक्ष केलं. ते पाहून गोदावरी आईजवळ गेली व आईला म्हणाली,
          "आई, मला क्षमा कर. मी स्वराज्यासाठी गेली होती. पुरंदर जिंकायचा होता. आपल्या सैन्याला वाट दाखवायची होती. माहित आहे, मी जर नसती गेली तर आपलेच सैनिक मरण पावले असते. पुरंदर जिंकताही आला नसता. विवाह काय, कधीतरी होईलच. परंतु पुरंदर जिंकण्याची अशी नामी संधी कधीच आली नसती. आई, मी विवाहाची लढाई हरले. परंतु पुरंदरची असलेली स्वराज्यनिष्ठेची लढाई मी जिंकलेली आहे."
         लेकीनं बोललेले विवाहाचे शब्द. ते पाहून रडत असलेली गोदावरीची आई, ती आई रडतरडतच म्हणाली,
          "बाळ, खरं आहे, तुझं म्हणणं. अगं, तू अगदी थोराचं कार्य केलेलं आहेस. तुझ्यामुळेच पुरंदर जिंकता आला. तू स्वराज्यनिष्ठा बाळगली. परंतु समाज हे कधीच बघत नाही. समाज बघतो, एका स्रीकडं एका कुत्सीत भावनेनं. त्यांना स्रीचं चांगलं कार्य कधीच आवडत नाही. त्यांना आवडतं, एका स्रीचं चूल आणि मुल. हा समाज एका स्रीला तिच्यामध्ये असलेल्या चूल आणि मूल, याच भुमीकेत बघतं. ते बघतांना त्यांना आनंद होतो. त्यासाठीच ते विवाह देखील करतात. परंतु जर असं काम करायला एका स्रीनं नाकारलं आणि तिनं स्वराज्यनिष्ठेसारखं दुसरंच कार्य केलं, तर ते कार्य समाजाला कधीच आवडत नाही. त्या कार्यामुळेच समाज बदनामी करतो एका स्रीची. पोरी, मला अभिमान आहे तुझा. तू केलेलं कार्य मला आवडलं. आता समाज यापुढे तुला काहीही म्हणो, मी कधी काहीच म्हणणार नाही."
         ते गोदावरीच्या आईचे बोल. ती आई शिकली नव्हती. परंतु ती जे काही बोलली. त्यातून तिला हुरुप आला होता. ज्यातून ती पुढील स्वराज्यनिष्ठेचं कार्य करण्यास प्रेरीत झाली होती.
          लग्न मोडलेली गोदावरी घरी परत आली, पण ती आता आधीची गोदावरी राहिली नव्हती. गाव तिच्याकडे बघून कुजबुजायचा. म्हणायचा, 
          "बघा, हळद लागून पळून गेलेली पोरगी आली." 
          गोदावरी ते ऐकायची व दुःखी व्हायची. तेव्हा तिला आठवायची तिची स्वराज्यनिष्ठा. मात्र ती कधीच विचलीत झाली नाही. जरी कोणी तिला शुभ कार्याला बोलवत नव्हतं तरी. ज्या मुलाने तिला मागणी घातली होती, त्याने तर स्पष्ट सांगितलं होतं की अशी बाई आम्हाला नको, जी लग्नाच्या मंडपातून पळून जाते. ते तर तिची बदनामीच करीत सुटले होते.
        पहिले आठ दिवस ती फक्त रडत बसली. आईने समजावलं, पण समाजाने तिला वाळीतच टाकलं. आठव्या दिवशी तिनंच निर्णय घेतला. तिनं तीच हळदीची चोळी उचलली. पण आता ती लग्नासाठी नाही, तर लढण्यासाठी नेसायची होती. तिनं ती चोळी कातरली, तिची झोळी शिवली आणि त्यात तिची कट्यार ठेवली. मग ती थेट बहिर्जी नाईकांना भेटायला गेली. बहिर्जी म्हणाले,
          "गोदावरी, तुझं लग्न मोडलं म्हणून मला वाईट वाटतंय. पण तू जे काही केलंय, त्यामुळे शेकडो मावळे वाचले."
          गोदावरी म्हणाली,
         "परंतु आता मला कोणीच घरात घेणार नाही. माझं लग्न झालं नाही, आता कधी होणारही नाही. मग माझं घर हेच स्वराज्य. मला पूर्ण वेळ तुमची हेर होऊ द्या."
           तो दिवस व तिथूनच पुढे गोदावरीचे दुसरे आयुष्य सुरू झाले. तिनं लग्न न करण्याचा निर्णय पक्का केला. ती डोणज्यात राहिली नाही. ती पुरंदरच्या पायथ्यालाच एका छोट्या झोपडीत राहू लागली. लोक तिला 'पुरंदरची वेडी बाई' म्हणायचे.
         तिनं तिच्या त्या दहा स्त्रियांची टोळी वाढवून आज पन्नास केली होती. विधवा, परितक्ता, ज्यांना समाजाने नाकारले होते, अशा सगळ्या स्त्रियांना तिनं हेर बनवले होते. त्या काळात हे एक क्रांतिकारी पाऊल होतं. त्यातच तिच्या टोळीचे नाव पडलं होतं "हळदी-कुंकवाचं पथक"
          ते पथक विलक्षण असंच कार्य करीत होतं. ज्यातून शत्रूला धडकी भरत असे. कधी वाटायचं की बायका हळदी-कुंकवाला चालल्या आहेत की काय, पण त्या आतील गोटातून स्वराज्याच्या बातम्या नेत होत्या.
         गोदावरीनं विवाह केला नाही, अंतिम टप्प्यापर्यंत. त्यातच तिच्या त्या टोळीत एक मुलगी होती, सई. जी डोणज्याचीच होती. तीही गोदावरीसोबत पुण्याला आली होती. तिला तिच्या पतीनं सोडलं होतं आणि कुटुंबातील लोकांनीही तिचा बहिष्कार केला होता. तिनं सईला आपली बहिण मानले होते. सईचेही परत लग्न झाले नाही. दोघींनी मिळून पुढे १६६५ साली जेव्हा मिर्झाराजे जयसिंगने पुरंदरला वेढा घातला, तेव्हा किल्ल्यात अन्न-पाणी पोहोचवण्याचे काम केले होते. 
          गोदावरीला नवरा मिळाला नाही, पण तिला स्वराज्य मिळालं आणि त्या काळात स्वराज्याच्या ध्येयानं पेटून उठलेल्या गोदावरीसाठी स्वराज्य हाच सगळ्यात मोठा संसार होता.
           १६६५ ते साल. गोदावरीच्या लग्नाला विवाह तुटल्याला नऊ वर्षे झाली होती. ती आता २३ वर्षांची झाली होती. गाव अजूनही तिला नावं ठेवत होतं. पण आता तिच्या मागे पन्नास स्रिया उभ्या होत्या. सई आता तिची उजवी हात होती. ती एकोणवीस वर्षांची होती आणि धीट व तेवढीच साहसी होती. तिलाही तलवार चालवता येत असे.
          एकदा बहिर्जी आले होते. त्यांनी एकदा दिवा विझवला होता. बहिर्जीने दिवा विझवला, तेव्हा सई घाबरली नाही. ती सरळ त्याच्या डोळ्यात बघत राहिली. बहिर्जी गोदावरीशी बोलत होता. पण त्याचं लक्ष सईकडेच होतं. ते सईचं निरीक्षण करीत होते. तशी गोदावरी म्हणाली,
          "ही सई माझ्याकडे आलीय. तेव्हा सासरच्यांनी हाकललं होतं. म्हणाले होते की जीभ लांब आहे."
         बहिर्जीने सईला विचारलं,     
         "खरं आहे का? जीभ लांब आहे तुझी?"
         सई म्हणाली, "होय. म्हणूनच तर मी अजून जिवंत आहे."
           तद्वतच तिला उत्तर येतंय हे पाहून बहिर्जीला गंमत वाटली. तसे ते म्हणाले, 
          "उद्या मरण पत्करून किल्ल्यावर जायचंय. तू येणार?"
         ते सईनं ऐकलं. तशी ती म्हणाली, "गोदावरी आक्का जाणार असेल तर मी जाणारच."
          तोच बहिर्जी पुढे म्हणाले, 
          "तुला भीती नाही वाटत का? मुघल आहेत खाली."
          तो बहिर्जीचा प्रश्न. सईने तिच्या पायाजवळचा एक लाकडी दांडका उचलला. जो तिनं स्वतः तासून तलवारीसारखा केला होता. ती म्हणाली, 
          "मला लहानपणापासून तलवार चालवायची हौस होती. माझ्या भावाने मला शिकवलं होतं. लग्न झाल्यावर सासू म्हणाली. बाईने तलवार नाही, लाटणं धरायचं. म्हणून त्यांनी मला हाकललं. आता परत एकदा तलवार धरायला मिळत असेल, तर भीती कशाला?"
          बहिर्जीने तो लाकडी दांडका तिच्या हातातून घेतला. पाहिलं. बऱ्यापैकी धार होती. तसे ते म्हणाले, 
           "उद्या ताटात पीठ नेणार आहेस. पण समज, मुघलाने ताट फोडलं, तर काय करशील?"
         सई एक क्षण थांबली नाही. तशी ती म्हणाली,
         "पळणार नाही. मी म्हणेन. हे पीठ नाही, ही माझ्या नवसाची राख आहे. मला मूल होत नाही, म्हणून मी ही राख भवानीला वाहायला नेत आहे आणि मग मी रडेन. खूप रडेन. पुरुषांना बाईचं रडणं बघवत नाही, ते लगेच जाऊ देतात."
          ते सईचं बाणेदार उत्तर. बहिर्जी, जे आयुष्यभर वेष बदलून, खोटं बोलून जगले होते. ते आज पहिल्यांदाच हसले. तसे ते म्हणाले, "तू हेर व्हायला पाहिजे होतीस."
          त्यावर सई म्हणाली, 
         "मी हेर नाही, मी बाई आहे. हेराला फक्त वेष बदलावं लागतं, बाईला रोजच वेष बदलावे लागतात. सासरी एक वेष, माहेरी एक वेष, गावात एक वेष. आम्हाला सवय आहे त्याची."
           ते सईचं उत्तर. त्या उत्तरावर बहिर्जी काहीच बोलले नाहीत. त्यांनी उठता उठता फक्त एकच गोष्ट केली. त्यांनी स्वतःच्या धोतराच्या आत लपवलेली एक छोटी, खरी कट्यार काढली आणि ती सईच्या हातात ठेवली. म्हणाले,
           "ही लाकडी नाही. उद्या काही झालं, तर ही वापर. पण कोणावर नाही. स्वतःवर पण नाही. फक्त कापड फाडायला, दोर कापायला आणि शत्रुंनाही कापायला आणि एक लक्षात ठेव. उद्या तू किल्ल्यावर जाणार नाहीस, तू इतिहासात जाणार आहेस. पण इतिहास बायकांची नावं लिहीत नाही. त्यामुळे परत यावं लागेल. समजलं?"
           सईनं कट्यार घेतली. ती म्हणाली,
           "मी परत येईन. पण एकटी नाही, पन्नास जणींना घेऊन येईन."
        बहिर्जी गोठ्यात परत गेला. पण जाताना तो गोदावरीला म्हणाला,
           "गोदावरी, तुझी ही बहिण सांभाळ. ही फक्त धीट नाही, ही हुशार पण आहे. स्वराज्याला अशाच मुलींची गरज आहे."
           तोच तो क्षण होता, जेव्हा सई पहिल्यांदा 'सईआक्का' झाली. हातात लाकडी तलवार नाही, तर खरी कट्यार घेऊन. तो एक अभिनव असाच क्षण होता.
          ते १६६५ साल. त्या साली स्वराज्यावर मोठं संकट आलं होतं. दिल्लीहून मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पन्नास हजार फौज घेऊन पुरंदरवर चालून आले होते. पुरंदरला वेढा पडला होता. किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे.
          वेढा फारच कडक होता की मुंगीलाही आत जाता येत नव्हतं. किल्ल्यावर धान्य संपत आलं होतं. मावळे उपाशी मरू लागले होते. त्या यातना पाहून बहिर्जींना सहन झालं नाही व त्यांनी त्या रात्री गोदावरीच्या झोपडीत निरोप पाठवला.       
         "गोदावरी, किल्ला वाचवायचा असेल तर धान्य पोहोचलं पाहिजे. पण मुघलांची नाकेबंदी आहे."
           गोदावरीने सईकडे बघितलं आणि हसली. दुसऱ्या दिवशी सकाळी, पुरंदरच्या पायथ्याच्या मुघल छावणीत एक वेगळंच दृश्य होतं. गोदावरीच्या मर्जीतल्या पन्नास स्रिया, डोक्यावर हळदी-कुंकवाचे ताट, हातात लहान मुलं, अंगावर फाटके कपडे. त्या मोठ्याने रडत-ओरडत मुघलांच्या पहाऱ्याजवळ आल्या.
          "आम्हाला जाऊ द्या. आज वटपौर्णिमा आहे. आम्हाला पुरंदरच्या भवानीच्या मंदिरात जायचंय. नवस फेडायचाय." 
          मुघल सरदारानं ते ऐकलं. तसा तो हसला. त्या स्रियांचा त्याला संशय आला? त्याने तपासायला सांगितलं. ताटात फक्त हळद, कुंकू, फुलं. पण त्याला माहित नव्हतं. त्या प्रत्येक ताटाच्या खाली, दुहेरी तळ होता. त्यात भाजलेल्या ज्वारीचं पीठ, मीठ आणि गूळ भरलेला होता आणि त्या लहान मुलांच्या अंगावरच्या दुपट्यात नाही, तर त्या दुपट्याच्या आतल्या शिवणीत अफूच्या गोळ्या शिवलेल्या होत्या, जखमी मावळ्यांसाठी.
          "जाऊ द्या यांना," मुघल सरदार म्हणाला. त्यातच त्या पन्नास स्रिया किल्ल्यात गेल्या. त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि रात्री जेव्हा सगळे झोपले, तेव्हा त्यांनी पीठ, मीठ, गूळ मुरारबाजीच्या हवाली केलं. ते पाहून मुरारबाजी थक्क झाले. ते विचारु लागले, "तुम्ही कोण?"
           ते मुरारबाजीचं बोलणं. तशी गोदावरी पुढे आली. तिची तीच जुनी हळदीच्या चोळीची झोळी तिच्या खांद्यावर होती. तशी ती म्हणाली,
           "आम्ही कोणीच नाही. आम्ही फक्त त्या स्रिया आहोत, ज्यांना समाजाने नाकारलंय. आमचं लग्न मोडलंय, कोणी विधवा आहेत, कोणी वांझ आहेत. पण आमचा नवस एकच आहे. स्वराज्य जगलं पाहिजे."
          ती रात्र व त्या रात्री बऱ्याच दिवसानंतर किल्ल्यावर भाकरी भाजली गेली. पुढे बरेच दिवस दिवस हाच खेळ चालला. दर तीन दिवसांनी हळदी-कुंकवाच्या बहाण्याने स्रिया धान्य आतमध्ये नेत असत. परंतु एके दिवशी दिलेरखानाला संशय आला. त्याने त्यांना अडवलं आणि ताट फोडलं. आतलं पीठ सांडलं. तसं त्यानं गोदावरीला ओळखलं. विचारलं, 
          "तूच ती मागच्या वेळची हेर आहेस ना?"
           तो त्याचा प्रश्न. त्यावर काय उत्तर द्यावं. ते गोदावरीला कळेनासं झालं. शेवटी धीरगंभीर होत, सर्व बळ एकवटून ती बोलली,
          "होय, मीच ती गोदावरी. मी खरं बोलतेय. आता तुम्हास्नी काय करायचं ते करा."
           ते तिचं बाणेदार उत्तर. त्यावर त्यानं तिच्या पोटात तलवारीच्या मुठीने जोरात मारलं. गोदावरी खाली कोसळली. सई धावली, पण तिला दोन शिपायांनी पकडलं. त्यानंतर त्याच दिवशी गोदावरी आणि सईला मुघलांनी कैद केलं. त्यांना पुरंदरच्या पायथ्याच्या त्या बुरुजावर बांधून ठेवलं. त्याच दिवशी दुपारी मुरारबाजी दिलेरखानाशी लढताना धारातीर्थी पडला. पुरंदरचा एक बुरुज ढासळला.
         गोदावरी बुरुजाला बांधलेली, रक्तबंबाळ अवस्थेत ओरडत होती, "मुरारबाजी, मागे फिरू नका. पुरंदर देऊ नका." परंतु कोण धावणार. मुरारबाजी तर मरुन पडले होते. अन् स्वराज्याची माणसेही मरत होती.
          तीच आरोळी शिवरायांनी ऐकली. त्यांना अतीव दुःख झालं. आपलीच माणसं मरताहेत. कोणी कैद होताहेत. ज्यात स्रियाही आहेतच. शेवटी विचार करुन त्यांनी पुरंदरचा तह केला. मग नाईलाजानं १६६५ ला शिवरायांना पुरंदर मुघलांना द्यावा लागला. सोबतच कोंढाणा सुद्धा मुघलांना गेला होता. त्याचबरोबर डोणजे गाव सुद्धा. 
         तो तहाचा दिवस. त्या तहाच्या दिवशी जयसिंगाने सई व गोदावरी, अशा त्या दोन स्रिया सोडून दिलं. तो म्हणाला,     
         "तुमच्यासारख्याच स्रियांमुळे शिवाजी अजूनही जिवंत आहे."

******************************************

           मे १६६५. वेढा पडून दीड महिना झाला होता. खाली पुरंदरच्या पायथ्याला पन्नास हजार मुघल तंबू होते. वर किल्ल्यावर फक्त सातशे मावळे. धान्य संपलं होतं. पाणी होतं, पण पोटात भाकरी नव्हती. मुरारबाजी देशपांडे बुरुजावर उभे होते. त्यांनी खाली पाहिलं. सगळीकडे मशाली. मुंगीही आत येऊ शकत नव्हती. त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि एका मावळ्याच्या हातात दिली.
        "काहीही करून राजगडावर पोहोचव."
          ती चिठ्ठी राजगडावर पोहोचली नाही, ती पोहोचली थेट बहिर्जी नाईकांच्या हातात. जे बहिर्जी नाईक स्वराज्याचे डोळेच होते.
          बहिर्जी तेव्हा पुरंदरच्या पायथ्याच्या डोनजे गावात, एका वाड्यात नाही, तर एका गुरांच्या गोठ्यात लपला होता. वेष होता, वारीला निघालेला गोसावी. त्याने चिठ्ठी वाचली. फक्त एकच ओळ होती,
         "धान्य संपले. मावळे उपाशी."
         बहिर्जीने डोळे मिटले. त्याला माहित होतं, पुरंदर पडला तर स्वराज्याचं दारच उघडेल. पण पन्नास हजारांची नाकेबंदी तोडून धान्य न्यायचं कसं? मावळा गेला तर कापला जाईल. तेवढ्यात त्याला आठवली. डोनजेच्या माळावरची झोपडी. ती गोदावरीची झोपडी.
         गोदावरीची झोपडी म्हणजे गावाच्या बाहेरची, ओढ्याकाठी असलेली एक खोपट. तिथं गावात नको असलेल्या बायका राहायच्या. जिला नवऱ्याने सोडलं, जिला मूल होत नाही म्हणून हाकललं, जी विधवा झाली, म्हणून हाकलली गेली.
         त्या रात्री पाऊस पडत होता. झोपडीत एकच दिवा होता. गोदावरी पीठ मळत होती. पण पीठ नव्हतं, ती फक्त हाताने अभ्यास करत होती. समोर सई बसली होती. एकोणवीस वर्षांची, तिच्याकडे आलेली. तिचंही लग्न मोडलं होतं, कारण ती 'जास्त बोलते' म्हणून.
          त्या दोघीही निवांत बसल्या होत्या. तशी दारावर ठकठक झाली. गोदावरीने दार उघडलं. बाहेर एक भिजलेला गोसावी उभा दिसला. तसं त्यानं विचारलं,
         "भाकरी मिळेल का, माय?"
          गोदावरीने त्याला आत घेतलं. सईने पाहिलं, या गोसाव्याच्या पायाला चिखल नाही, फक्त राख आहे आणि त्याच्या डोळ्यांत भूक नाही, घाई आहे.
           गोसाव्याने आत येऊन दिवा विझवला आणि आवाज बदलला.
           "गोदावरी?"
            गोदावरी दचकली. हा आवाज तिनं ऐकला होता. नऊ वर्षांपूर्वी, जेव्हा तिचं लग्न तुटलं होतं. ती जेव्हा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडली होती, तेव्हा याच माणसाने तिला पाणी दिलं होतं. तो म्हणाला होता की तू मेली नाहीस, तर स्वराज्यासाठी काहीतरी करशील. कारण तेव्हा तिलाही जगावंसं वाटत नव्हतंच.
          तो बहिर्जी होता. बहिर्जी खाली बसला. म्हणाला,
          "गोदावरी, तुला माहित आहे का, तुझ्या झोपडीकडे मुघल कधीच संशयाने बघत नाहीत? कारण तुम्ही बायका आहात आणि या जगात बायकांकडे कोणी शस्त्र म्हणून बघतच नाही. हेच आपलं शस्त्र आहे."
          त्याने सगळं सांगितलं, वेढा, धान्य, मुरारबाजी आणि ती मावळ्यांची उपाशी असण्याची अवस्था. मात्र गोदावरी काहीच बोलली नाही. तिनं फक्त तिच्या त्या हळदीच्या चोळीच्या झोळीकडे पाहिलं. ती म्हणाली,
         "किती धान्य लागतंय?"
          ते गोदावरीचं बोलणं. तसा बहिर्जी म्हणाला, 
          "किमान एक खंडी. पण एका वेळी नाही नेता येणार."
           गोदावरीनं सईकडे पाहिलं. सईनं मान हलवली. तशी गोदावरी म्हणाली, 
           "आम्ही पन्नास जणी आहोत. उद्या वटपौर्णिमा आहे."
            गोदावरी बोलत होती. मात्र बहिर्जीला लगेच कळलं. वटपौर्णिमा...... सुवासिनींचा सण...... बायका वडाची पूजा करायला किल्ल्यावरच्या भवानी मंदिरात जातात. मुघल त्यांना अडवणार नाहीत, कारण त्यांना वाटेल, बायकांचा सण आहे.
          "ताटात काय नेणार?" बहिर्जीने विचारलं. तशी गोदावरी म्हणाली, 
         "हळद-कुंकू आणि त्याखाली दुहेरी तळ करून भाजलेलं पीठ. प्रत्येक ताटात दोन मूठ. पन्नास ताटं म्हणजे शंभर मूठ. एका माणसाला दोन दिवस पुरेल."
         "आणि जखमींसाठी?"
          तशी सई पुढे आली. ती म्हणाली, 
           "माझ्या लुगड्याच्या घोळात अफूच्या गोळ्या शिवते. लहान मुलाला गुंडाळल्यासारखं घेऊन जाईन. कोणी तपासणार नाही."
           ते सईचं बोलणं. ते ऐकताच बहिर्जी उठला. त्याने हात जोडले. स्वराज्याच्या हेर खात्याच्या प्रमुखाने, दोन नाकारलेल्या बायकांना हात जोडले. तो म्हणाला, 
          "उद्या पकडल्या गेलात तर?"
           गोदावरी हसली. पहिल्यांदा हसली. ती म्हणाली,
            "नऊ वर्षांपूर्वी जेव्हा माझं लग्न मोडलं, तेव्हाच मी पकडले गेले होते, समाजात. समाजानं पकडलं होतं मला आणि जकडलंही होतंच. आता कसली भीती? किल्ला जगला पाहिजे, बस."
          ते गोदावरीचं बोलणं. बहिर्जी काय समजायचं ते समजला व तेथून निघून गेला. तसा पाऊस थांबला होता.
          पाऊस थांबला होता. तसा दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं, पन्नास बायका, हळदी-कुंकवाची ताटं आणि मुघलांच्या डोळ्यांदेखत पुरंदरमध्ये गेलेलं धान्य. ते वाखाणण्याजोगंच होतं. त्यात गोदावरी व सईच्या धाडसाचं कर्तृत्व होतं.
          ती रात्र व त्या रात्री एका गोठ्यात एका हेराने, एका झोपडीतल्या दोन बायकांना स्वराज्याचा सगळ्यात मोठा गुप्त संदेश दिला होता. त्या दोघींनी तो शब्द पाळला.
            दुपारची वेळ होती. पुरंदरच्या बालेकिल्ल्यावरच्या भवानी मंदिरात आरती सुरू होती. पन्नास बायका रांगेत आल्या. डोक्यावर ताटं, हातात लहान मुलं, अंगावर फाटकी लुगडी. त्या रडत होत्या, मोठ्याने,
          "भवानी माते, नवस फेडायला आलो गं..."
         मुघलांच्या पहाऱ्याने त्यांना वर सोडलं होतं. त्यांना वाटलं, स्रियांचा सण आहे.
           ते मंदीर व त्या मंदिरात पुजारी नव्हता, पुजारी दोन दिवसांपूर्वीच उपाशीपोटी मेला होता. त्यामुळे त्या बायकाच थेट गाभाऱ्यात गेल्या. आत मुरारबाजी देशपांडे उभे होते. अंगावर चिलखत नव्हतं, फक्त धोतर. सात दिवसांत त्यांचा चेहरा आत गेला होता. हातात तलवार होती, पण हात थरथरत होता भुकेने. त्यांनी या बायकांना पाहिलं आणि ते ओरडले, 
             "कोण तुम्ही? मंदिरात कोणालाही यायला बंदी आहे आज. बाहेर व्हा."
            गोदावरी पुढे आली नाही. ती सगळ्यात मागे उभी होती. तिच्या खांद्यावर तीच हळदीची झोळी होती.
           सई पुढे आली. तिनं तिच्या डोक्यावरचं ताट खाली ठेवलं. हळद, कुंकू, फुलं बाजूला केली आणि ताटाचं खालचं झाकण काढलं. आत... भाजलेल्या ज्वारीच्या पिठाचा ढीग. मुरारबाजींनी ते पाहिलं आणि ते दोन पावलं मागे सरकले. सईने काहीच न बोलता, दुसरं ताट घेतलं, तिसरं घेतलं. प्रत्येक ताटाखाली तेच. पीठ, थोडं मीठ, गुळाचा खडा. पन्नास ताटं. पन्नास ढीग. मागच्या एका बाईने तिच्या लहान मुलाला खरं तर लाकडी बाहुलीला गुंडाळलेलं पांघरूण उघडलं. आत अफूच्या गोळ्या, हळदीच्या गाठी. मुरारबाजींना काहीच कळेना. ते म्हणाले, 
          "हे... हे आणखी काय आहे?"
          तेव्हा गोदावरी पुढे आली. तिनं तिच्या खांद्यावरची झोळी खाली ठेवली. त्या झोळीतून तिनं एक मूठभर पीठ काढलं आणि मुरारबाजींच्या हातात ठेवलं. तशी ती म्हणाली,
          "भाकरी आहे, मुरारबाजी. तुम्ही सात दिवसांत खाल्ली नाही, ती भाकरी."
           मुरारबाजींनी ते पीठ हातात धरलं. त्यांचे डोळे भरून आले. सात दिवसांत पहिल्यांदा त्यांच्या हातात धान्य आलं होतं. तसे ते म्हणाले, 
          "तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी पाठवलं?"
          तशी गोदावरी म्हणाली,      
          "आम्हाला कोणीच नाही पाठवलं. आम्ही डोणजेच्या माळावरच्या बायका. आम्हाला गावाने नाकारलंय. आमचं लग्न मोडलंय, आम्ही विधवा आहोत. पण बहिर्जी नाईक म्हणाले होते, किल्ल्यावर माणसं उपाशी आहेत."
           "बहिर्जी? कुठं आहेत बहिर्जी?" मुरारबाजींना धक्काच बसला. तसे ते परत म्हणाले,
            "बहिर्जी इथं आहे?"
            "होय. गुरांच्या गोठ्यात." गोदावरीनं पुष्टीदाखल म्हटलं. 
            मुरारबाजींनी त्या पन्नास बायकांकडे पाहिलं. त्या सगळ्या खाली मान घालून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांत भीती होती. पण भूक नव्हती.
           मुरारबाजी देशपांडे........ ज्यांनी आयुष्यात कधी कोणासमोर मान झुकवली नव्हती, ज्यांनी दिलेरखानाला सांगितलं होतं की पुरंदर दिला तरी शीर दिलं नाही. ते त्या दिवशी पहिल्यांदा खाली वाकले. त्यांनी जमिनीवरचं पीठ उचललं, कपाळाला लावलं आणि म्हणाले,
          "आजपर्यंत मी समजत होतो, किल्ले मावळे लढवतात. आज कळलं, किल्ले भाकरी लढवते आणि भाकरी तुम्ही आणलीत. म्हणजेच किल्ले बायाच लढवतात."
          मुरारबाजी विचार करु लागले होते. ही कोण असेल बरे. तसा विचार येताच त्यांनी तिला प्रश्न केले.
         "तुमचं नाव काय? तुम्ही अजूनपर्यंत नाव नाही सांगीतलं."
           गोदावरीनं ते ऐकलं. तशी ती म्हणाली, 
           "माझं नाव गोदावरी. हिचं नाव सई. बाकीच्यांची नावं नाहीत, कारण गावाने त्यांची नावं कधीच ठेवली नाहीत."
         ते मुरारबाजीनं ऐकलं. तसे ते म्हणाले,    
         "आजपासून तुमची नावं मी लिहिणार. माझ्या रोजच्या हजेरीत. पन्नास मावळे म्हणून."
           ती रात्र व त्या रात्री, दीड महिन्यांनंतर पुरंदरवर पहिल्यांदा चूल पेटली. भाकरी भाजली गेली. फक्त मावळ्यांसाठी नाही, तर त्या पन्नास बायकांसाठी पण. कारण गोदावरीने एक अट घातली होती. 
          "आम्ही आणलेलं पीठ आधी आम्ही खाणार, मग तुम्ही. आम्ही उपाशी राहून दुसऱ्याला जगवणार नाही."
           मुरारबाजी हसले होते तेव्हा. ते म्हणाले होते की हाच स्वराज्याचा खरा नियम आहे. हा तो क्षण होता जेव्हा पुरंदरच्या किल्लेदाराला कळलं. किल्ला फक्त तलवारीने नाही, तर हळदीच्या झोळीने पण वाचतो. तेव्हा त्यांना अतीव गहिवरुन आलं होतं.

**********************************************

            ताट फुटलं तेव्हाचा दिवस. दोन वेळा सगळं नीट झालं होतं. पहिल्या वटपौर्णिमेला पन्नास ताटं आत गेली. दुसऱ्या वेळी सईने नाव बदललं. म्हणाली,
        "आमची जत्रा आहे." तेव्हाही मुघलांनी सोडलं. पण तिसऱ्या वेळी दिलेरखानाच्या कानावर गोष्ट गेली. त्याला संशय आला. दिलेरखान....... औरंगजेबाचा सगळ्यात क्रूर सरदार. त्याला कोणीतरी सांगितलं, 
           "हुजूर, या बायका रोज वर जातात. रोजच ताट नेतात. पण खाली येताना त्यांची ताटं हलकी असतात आणि वर गेल्यावर किल्ल्यावरून धूर येतो. काहीतरी भाजल्याचा धूर."
          ते दिलेरखानानं ऐकलं. तसा तो म्हणाला,
          "आज त्यांना मीच तपासणार."
          सकाळ झाली होती. त्या दिवशी पाऊस नव्हता. ऊन होतं. गोदावरी, सई आणि पन्नास जणी पुन्हा निघाल्या होत्या. डोक्यावर ताटं. पण आज गोदावरीच्या मनात धाकधूक होती. बहिर्जीने रात्रीच सांगितलं होतं, 
          "उद्या जाऊ नका. संशय आलाय."
           मात्र गोदावरी डरपोक नव्हतीच. ती विचार करीत होती की आज नाही गेलो तर मावळे उद्या मरतील. त्यामुळं ती निघाली. त्यापाठोपाठ त्या पन्नास जणीही निघाल्या. सोबत सईही निघाली.
          ती पुरंदरची वाट. ती चालत होती गोदावरी अगदी बिनधास्तपणे. अशातच नाका आला. नाक्यावर आज दोन शिपाई नाही, तर स्वतः दिलेरखान उभा होता, घोड्यावर. अंगात काळा अंगरखा. त्याने हात केला, "थांबा."
          ते दिलेरखानाचे शब्द. तशा पन्नास जणी थांबल्या. दिलेरखान घोड्यावरून उतरला. तो गोदावरीसमोर आला. त्याने तिचं ताट पाहिलं. वर हळद, कुंकू, फुलं. सगळं नेहमीसारखंच. त्यानं सईकडे पाहिलं. सईच्या हातातली बाहुली. तिच्या पांघरुणात अफूच्या गोळ्या होत्या. दिलेरखान हसला. विचारणा केली. 
         "रोज-रोज कसली पूजा करताय तुम्ही? देव एवढा भुकेला आहे का?"
           ते दिलेरखानाचं बोलणं. गोदावरी काहीच बोलली नाही. तसा दिलेरखानाने एका शिपायाला इशारा केला. शिपायाने गोदावरीच्या हातातलं ताट घेतलं आणि जमिनीवर आपटलं. तसा खण्णऽऽ असा आवाज आला. ताट फुटलं. हळद-कुंकू सांडलं आणि त्याखालून पांढरं, भाजलेलं पीठ सगळीकडे पसरलं. सगळे शिपाई स्तब्ध झाले. तसं दिलेरखानने दुसरं ताट फोडलं. त्यातही तेच. तिसरं ताट, त्यात मीठ आणि गूळ. त्यानं सईच्या हातातली बाहुली हिसकावून घेतली. पांघरूण फाडलं. आतून काळ्या गोळ्या खाली पडल्या. दिलेरखानने गोदावरीकडे पाहिलं. डोळे लाल झाले होते.
          "तूच ती आहेस ना? मागच्या दोन वेळा धान्य नेणारी?"
           तिनं ते ऐकलं. गोदावरी थरथरत होती. पण तिनं मान खाली घातली नाही. आजूबाजूला पन्नास बायका रडू लागल्या होत्या. सई पुढे यायला बघत होती, पण दोन शिपायांनी तिला धरून ठेवलं होतं.
           गोदावरीनं एक दीर्घ श्वास घेतला. तशी ती म्हणाली,
          "होय, मीच ती गोदावरी. डोणजेच्या माळावरची. जिनं स्वराज्यासाठी आपली लाल हळदीची चोळी सोडली. जिनं नवरा नाकारला. जिला गावानं नाकारलं. मीच दोन वेळा तुमच्या डोळ्यांदेखत किल्ल्यावर धान्य नेलं. कारण तो किल्ला माझा आहे. तो काही फिरंग्यांचा नाही, तुमचाही नाही. तो माझ्या लेकराचा आहे."
           गोदावरीचं ते बाणेदार उत्तर. दिलेरखानाला हे उत्तर अपेक्षीत नव्हतं. त्याला वाटलं होतं की ती रडेल, पाया पडेल. शेवटी त्याला राग आला. त्यानंतर त्यानं रागात तिच्या पोटात तलवारीच्या मुठीने जोरात मारलं. 
          तो तलवारीच्या मुठ्ठीचा वार. गोदावरी खाली कोसळली. तिच्या तोंडातून किंकाळी नाही, फक्त एकच शब्द आला.
          "सई... पळू नकोस. आपण काही भेकडांची औलाद नाही."
          सई तेव्हा लहानच होती. तिनं ते पाहिलं. तशी सई धावली अन् तिनंच तिला पकडलं. त्या दिवशी दुपारीच दोघींना दिलेरखानानं पुरंदरच्या पायथ्याच्या जुन्या बुरुजाला बांधून ठेवलं. समोरच मुरारबाजी आणि दिलेरखानाची लढाई सुरू होती. जिथे मुरारबाजी धारातीर्थी पडले.
          ती सई व गोदावरीची बांधलेली अवस्था. त्या बांधलेल्या अवस्थेत गोदावरी ओरडत होती.
          "मुरारबाजी, मागे फिरू नका."
           असे म्हणत असतांना तिचा आवाज पुरंदरच्या कातळावरून घुमत होता. अशातच तो तहाचा दिवस उजडला. सन ११ जून १६६५. कारण मुरारबाजी पडले होते. स्वराज्याची माणसं मरत चालली होती. शिवरायांना काय करावं सूचत नव्हतं. अशातच पुरंदर पाठोपाठ पुरंदरचा वज्रगडही पडला होता. मावळ्यांनी शस्त्रं खाली ठेवली. पांढरं निशाण लागलं. मग तह. तहच झाला होता.

**********************************************

         तहच तो...... तो तहाचा दिवस. खाली मुघल छावणीत जयसिंग बसला होता. वय झालेला, पण डोळे अजूनही पारखी. त्याच्या शेजारी दिलेरखान उभा होता. हातात अजूनही तलवार होतीच. समोर दोन बायका उभ्या होत्या गोदावरी आणि सई. दोघींचे हात बांधलेले, पायात बेड्या नाहीत, पण अंगावर माराच्या खुणा. तीन दिवस बुरुजाला बांधून ठेवलं होतं त्यांना. पाऊस त्यांच्यावरच पडला होता. ऊन त्यांच्यावरच पडलं होतं. दिलेरखानानं त्यांच्याकडे पाहिलं. तसा तो म्हणाला,
          "राजाजी, याच दोघींनी धान्य नेलं. यांना काय करायचं?"
           जयसिंगाने गोदावरीकडे पाहिलं. गोदावरी लंगडत होती. पोटावरील मुठीचा व्रण काळा झाला होता. पण ती मान खाली घालत नव्हती. तसं जयसिंगानं विचारलं,
         "नाव काय तुझं?"
         "गोदावरी." क्षणाचाही विलंब न लावता गोदावरी म्हणाली. तसा जयसिंगानं परत प्रश्न केला.
          "गाव?"
          "डोणजेची माळ."
          "नवरा करतो काय?"
           गोदावरी एक क्षण थांबली. मग म्हणाली,
           "नवरा नाही. नवरा केलाच नाही मी. हळदगाठ बांधणार होते. परंतु स्वराज्यासाठी तेही त्यागलं. त्यानंतर गावानंही सोडलं. फक्त हा किल्ला सोडत नव्हता, म्हणून मी आले. आम्ही या मातीतील माणसं. आम्ही या मातीशी कधीच बेईमान होणार नाही. आम्ही मीठ खाल्लंय या मातीचं."
          जयसिंगानं ते उत्तर ऐकलं. त्याला हे उत्तर लागलं. तो स्वतः राजपूत होता. त्याला बायकांचं हे रूप माहित होतं. राण्या जोहार करतात, पण ही बाई लढते. त्यानं सईकडं पाहिलं आणि परत बोलला.
        "आणि तू वं भवाने?" त्याच्या तोंडून वात्रट शब्द निघाले.
          ते जयसिंगाचे शब्द. ते सईनं ऐकले. तशी ती म्हणाली,
           "मी सई. हिच्यासारखीच सोडलेली आहे."
          जयसिंग उठला. तो दिलेरखानाला म्हणाला, 
          "हात सोडा यांचे."
           ते जयसिंगाचं बोलणं. त्यावर दिलेरखान म्हणाला,
         "पण यांनी गद्दारी केली."
         ते दिलेरखानाचं बोलणं. ते ऐकताच जयसिंग जोरात ओरडला, 
          "गद्दारी? ही गद्दारी नाही. ही स्वामिनिष्ठा आहे. जी आपल्या सैनिकातही नाही, ती या बायांमध्येही आहे."
           तो गोदावरीच्या जवळ आला. त्याने तिच्या हातातील ती हळदीची झोळी पाहिली. फाटकी, पिठाने माखलेली. तसा तो म्हणाला,  
         "मला वाटलं होतं, मी पुरंदर जिंकला. पण आज कळलं, मी एक किल्ला जिंकला, पण दोन बायकांकडून हरलो. शिवाजी महाराजांकडे तुमच्यासारख्या स्रिया आहेत, म्हणूनच तो अजून जिवंत आहे. आमच्याकडे पन्नास हजार फौज आहे, पण तुमच्यासारखी एकही गोदावरी नाही."
           तो दिवस........ त्या दिवशी तहाची कागदं लिहिली गेली. पुरंदर मुघलांना दिल्या गेला. पण जयसिंगाने एक अट घातली तहात. जी कोणीच लिहिली नाही, पण सांगितली गेली. तो शिवाजी महाराजांना भेटायला गेला तेव्हा म्हणाला,
          "राजे, तुमचा किल्ला घेतला, पण तुमच्या दोन लेकी मी सोडतोय. त्यांना काही करू नका. त्यांनी तुमचा किल्ला दोन वेळा वाचवलाय."
        शिवाजी महाराजांना हे कळलं तेव्हा ते पुरंदरवर नव्हते, ते राजगडावर होते. त्यांनी फक्त एकच निरोप पाठवला डोणजेच्या माळावर. एक पांढरं पागोटं आणि दोन भाकरी. निरोप असा होता.
          "गोदावरी आणि सई, तुम्ही पुरंदरच्या मावळणी आहात. तुम्हाला किल्ला नाही, पण माळ दिला. तिथं तुम्हाला हवं ते करा."
          ते पांढरं पागोटं. त्या पांढऱ्या पागोट्याचा अर्थ गोदावरीला कळला नाही, पण सईला कळला. सई म्हणाली,
         "आक्का, महाराजांनी आपल्याला सैनिक केलं नाही, त्यांनी आपल्याला मालक केलं. या माळाची मालकीण केलं."
          त्याच दिवशी दोघींनी ठरवलं. आता किल्ले लढायचे नाहीत, आता पोटं लढवायची.
           गोदावरीच्या पराकाष्ठेने कोंढाणा ४ फेब्रुवारी १६७० ला जिंकला होता. त्याच घटनेपासून बोध घेतला मावळ्यांनी व कोंढाणा जिंकल्यावर मावळ्यांना पुन्हा एकदा स्फुरण चढलं होतं व त्यांनी एकाच महिन्यात निळोपंत सोनवणे मुजूमदार यांच्या नेतृत्वात पुरंदरचा किल्लाही जिंकून घेतला होता.

**********************************************

          गोदावरी लंगडत-लंगडत घाट उतरू लागली होती. सई तिला आधार देत होती. तिच्या खांद्यावर अजूनही तीच हळदीच्या चोळीची झोळी होती, आता फाटलेली, रक्ताने माखलेली होती ती झोळी.
          सईने विचारलं, "आक्का, आपण हरलो का गं?"
          गोदावरी म्हणाली, "नाही गं सई. किल्ले येतील जातील. पण आपण जी वाट दाखवली, ती कधीच मिटणार नाही. शिवराय पुन्हा येतील. पुरंदर पुन्हा जिंकतील. तेव्हा परत आपलीच हवा निर्माण होईल."
          अन् खरंच पाच वर्षांनी म्हणजे सन १६७० ला शिवरायांनी पुरंदर पुन्हा जिंकला. ती तिच्याच प्रयत्नांची पुन्हा एकदा पराकाष्ठा होती.
          पावसाळा संपला होता. सह्याद्री हिरवागार झाला होता. तशी बातमी आली. शिवरायांनी पुरंदर परत घेतलाय. कोंढाणा तर तानाजी गेल्यावरच घेतला होता. आता पुरंदरही. पुरंदरही मुरारबाजी गेल्यानंतरच घेतला होता.
          ती बातमी सईला समजताच तिनं गोदावरीला ही बातमी दिली. ती धावतच आली होती झोपडीत, ती बातमीच सांगायला.
           गोदावरी तेव्हा चुलीपाशी बसली होती. तिचा पाय अजूनही लंगडत होता. दिलेरखानाच्या त्या मुठीचा व्रण अजूनही पोटावर होता. तिनं बातमी ऐकली तशी मान वर केली व म्हणाली,
        "खरं. खरंच बोलते की काय तू. पुरंदर घेतला काय, महाराजांनी." 
          ते गोदावरीचं म्हणणं. त्यावर सई परत म्हणाली,
          "होय आक्का. आपला पुरंदर परत आपला झालाय."
           ती बातमी. ती बातमी ऐकताच गोदावरीनं दिर्घ श्वास घेतला. तशी ती रडली नाही. ती फक्त त्या फाटक्या हळदीच्या झोळीकडे बघत राहिली. नऊ वर्षांपूर्वी लग्न मोडल्यावर याच झोळीत तिनं तिचं उरलेलं आयुष्य बांधून आणलं होतं, पुरंदरला राहायला येतेवेळेस.
           पुरंदर जिंकला होता. तरीही शिवरायांना भेटायला त्या दोघी गेल्या नाहीत. त्या गेल्या डोणजे गावाच्या मागच्या माळावर. जिथे आता त्या पन्नास स्रिया राहत होत्या. कोणी विधवा होत्या, कोणी परितक्ता होत्या, तर कोणी मुलगी नको म्हणून आल्या असलेल्या. गोदावरीनं तिथं येताच एक ठराव केला.
            'आता किल्ले लढायचे नाहीत. आता पोटं लढवायची.' त्यानंतर त्या माळावर त्यांनी पहिली गोष्ट केली. ती म्हणजे त्यांनी तिथं एक धान्याची कोठी बांधली. मग एक नियम आखला. नियम एकच. इथे येणाऱ्या कोणत्याही बाईला जात, लग्न, मूल यावरून विचारायचं नाही. तिला फक्त एक प्रश्न करायचा. तुला काय काय येतं? कोणाला पीठ मळता येत होतं. कोणाला जखम बांधता येत होती. कोणाला तलवार चालवता येत होती, सई सारखी. त्यानंतर सई व गोदावरीनं तिथंच पहिली तालीम सुरू केली. सकाळी लाकडी तलवारी शिकविणे व संध्याकाळी अक्षर ओळख. आता लोकं त्यांना मावळणी म्हणून ओळखू लागले होते. आता त्यांना 'गोदावरीच्या स्रिया' नाही, तर 'पुरंदरच्या मावळणी' म्हणू लागले होते.
          सन १६७४. शिवरायांचा राज्यभिषेक होता. राज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावरून निरोप आला. एक मानाचा विडा ठेवलेला आहे. गोदावरी आणि सईसाठी. ते निमंत्रण होतं. राजदरबारातून आलेलं. परंतु त्या दोघी गेल्या नाहीत. गोदावरीनं तो विडा त्या माळावरच्या कोठीच्या दारात ठेवला. तोच सईनं गोदावरीला तोच जुना प्रश्न विचारला.        
            "आक्का, आपण जिंकलो का गं?"
            गोदावरीला सईनं विचारलेला प्रश्न. यावेळी गोदावरी लंगडत नव्हती, ती सरळ उभी होती. ती म्हणाली,
             "सई, १६६५ ला आपण किल्ला वाचवायला गेलो होतो. आज आपण माणसं वाचवतोय. किल्ला एकदाच जिंकायचा असतो. माणूस रोज जिंकावा लागतो."
           तो दिवस गोदावरीसाठी महत्वाचा वाटत असला तरी ती राज्यभिषेक सोहळ्याला गेली नाही. कारण तिच्या मागे पन्नास स्रियांचा घोळका होता. त्यांच्या हातात आता हळदी-कुंकवाची ताटं नव्हती, तर नांगर, पुस्तकं आणि झोळ्याच होत्या.
             राज्याभिषेक होऊन महिना झाला होता. रायगडावर शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. सोन्याचे सिंहासन, अष्टप्रधान, इंग्रज वकील, सगळं झालं होतं. पण महाराजांना एक गोष्ट सतत टोचत होती. बहिर्जीने सांगितलेली. बहिर्जी म्हणाला होता,
         "महाराज, राज्याभिषेकाला पन्नास राजे आले, पण ज्या पन्नास बायकांनी पुरंदर वाचवला व कोंढाणा जिंकून दिला, त्यातील एकही आली नाही."
         महाराज म्हणाले, "का?"
         त्यावर बहिर्जी म्हणाला,
         "त्यांनी मानाचा विडा परत पाठवला. म्हणाल्या, 
        "आम्ही किल्ल्यावर नाही, माळावर राहतो."
         महाराज त्या दिवशी काहीच बोलले नाहीत. पण दुसऱ्या दिवशी पहाटे, त्यांनी फक्त दोन घोडे घेतले. सोबत फक्त बहिर्जी. ते थेट रायगडावरून डोणजेला रवाना झाले, माळावर. डोणजेच्या मागच्या माळावर तेव्हा पन्नास नाही, शंभर बायका राहत होत्या.
            गोदावरी आता पन्नास महिलांसह डोणजेच्या माळावर राहात होती. आता त्या डोणजेच्या माळावर धनाची कोठी झाली होती. शेजारी एक छोटी शाळा. जिथं सई लाकडी तलवारीने नाही, तर बांबूच्या दांडक्याने अक्षरे शिकवीत होती.
           गोदावरी चुलीपाशी होती. पायाचा लंगडेपणा कायम होता, पण आता ती सरळ बसायला शिकली होती. दुपारचं ऊन होतं. एका मुलीने धावत येऊन सांगितलं,
        "आक्का, दोन माणसं आलीत घोड्यावर."
         गोदावरी बाहेर आली नाही. पण सई आली. समोर दोन माणसं उभी. एकाच्या अंगात साधं धोतर, दुसऱ्याच्या अंगात गोसाव्याचे कपडे. तोच बहिर्जी होता. सईनं बहिर्जीला ओळखलं. तसंच शिवरायांना ओळखलं नाही. जे आज छत्रपती झाले होते, स्वराज्याचे.
           सईनं शिवाजी महाराजांना ओळखलं नाही. तिनंही कधी महाराजांना पाहिलं नव्हतं, पण त्या पांढऱ्या पागोट्याची गोष्ट ऐकली होती. तेच पागोटं, जो महाराजांनी तहाच्या वेळी पाठवला होता. सई हळूच म्हणाली,
          "आक्का....... महाराज आले."
           गोदावरी माजघरात स्वयंपाक करीत होती. सईचे महाराज आले, हे शब्द ऐकताच ती थबकली. तिच्या हातातलं लाटणं खाली पडलं. महाराज पुढे आले नाहीत. ते तिथंच, त्या कोठीच्या दारातच उभे राहिले. जसे इतर येतात तसेच. ते म्हणाले, "गोदावरी?"
          गोदावरीने मान हलवली.
           महाराज म्हणाले,
          "मी शिवा."
           गोदावरीला काय बोलावं ते कळेना. प्रत्यक्षात महाराजच दारात. आपलं काही चूकलं असावं, असं तिला वाटलं. आज वीस वर्ष झाले होते. वीस वर्षांपूर्वी तिनं घर सोडलं होतं. ती गावानं नाकारलेली, दिलेरखानानं मारलेली बाई. तिच्यासमोर साक्षात छत्रपती उभे होते. तिनं फक्त हात जोडले. तसे महाराज म्हणाले, "हात नको जोडू. तू मला कायम लाजवतेस."
           ते महाराजांचं बोलणं. ते बोलणं गोदावरीला कळलं नाही. महाराज पुन्हा म्हणाले, 
           "१६६५ ला माझ्या किल्लेदाराला वाटलं होतं,
           "किल्ला तलवारीनं वाचतो. परंतु तू दाखवून दिलंस. किल्ला तलवारीनं नाही तर भाकरीने वाचतो. १६७४ ला सगळ्या राजांना वाटलं. राज्य सोन्याच्या सिंहासनाने पुर्ण होतं. परंतु तू दाखवून दिलंस. राज्य या कोठीनं पुर्ण होतं. जिथं कोणत्याही बाईला जात विचारत नाहीत."
         महाराजांनी एक दिर्घ श्वास घेतला. तसे ते पुन्हा म्हणाले,
          "मी तुला मानाचा विडा पाठवला होता, तू परत पाठवलास. का?"
         गोदावरीनं ते ऐकलं. तशी ती पहिल्यांदा बोलली. त्यावेळेस तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली,
         "महाराज, विडा आम्ही नाही ठेवला, कारण विडा घेतला असता तर आम्हाला रायगडावर यावं लागलं असतं आणि रायगडावर गेलो असतो तर या शंभर जणी पुन्हा उपाशी राहिल्या असत्या. आम्हाला किल्ला नको होता, आम्हाला ही चूल हवी होती. जी महत्वाची आहे."
           महाराज हसले. त्यांनी आपल्या खिशातून काहीच काढलं नाही. सोनं नाही, मोहरा नाही. त्यांनी आपल्या पायातली पादत्राणं काढली आणि त्या कोठीच्या दारात ठेवली. तसे ते म्हणाले, 
          "आजपासून या कोठीच्या दारात माझी पादत्राणे राहतील. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळेल की या घरात जायचं असेल तर पादत्राणे बाहेर काढून जावं लागेल. कारण हे घर नाही, तर एका देवीचं मंदिर आहे. ज्या देवीनं एका काळात स्वराज्याला मदत केली होती. तिच्याचमुळं कोंढाणा व पुरंदर हे दोन्ही किल्ले जिंकता आले होते."
             महाराज बोलता बोलता थांबले. तसे ते परत म्हणाले,
          "आणि एक मागणं मागू का?"
           गोदावरी म्हणाली, "मागा, महाराज." त्यावेळेस तिची महाराजांबाबतची भीती कायमची निघून गेली होती. तसे महाराज म्हणाले,
          "मला एक भाकरी मिळेल का? तुझ्या हातची? जी तू पुरंदरवर नेली होतीस?"
           गोदावरीनं ते ऐकलं. तशी ती रडली. वीस वर्षांत पहिल्यांदा ती मनापासून रडली होती. कारण स्वतः तिला स्वराज्याच्या छत्रपतीनं जेवनासाठी भाकरी मागितली होती. ते महालातील महाराज आज तिच्या झोपडीत जेवन करणार होते.
         ते महाराजांचं मागणं. तिनं चुलीवरची गरम भाकरी, चटणी आणि थोडं मीठ महाराजांच्या हातात दिलं. महाराजांनी ती भाकरी तिथंच, जमिनीवर बसून खाल्ली. छत्रपती जमिनीवर बसून भाकरी खात आहेत हे पाहून तिथं शंभर बायका गोळा झाल्या. ज्यांना तो प्रसंग पाहून गहिवरुन आलं होतं. भाकरी खाऊन झाल्यावर महाराज उठले. त्यांनी सईला विचारलं,
        "सई, तू अजूनही तलवार चालवतेस का?" त्यावर सई म्हणाली, 
          "नाही महाराज, आता मी अक्षरं चालवते."
          महाराजांना ते बऱ्यापैकी समजलं. तसे ते म्हणाले,
         "ते जास्त अवघड आहे. तलवार एकाला मारते, अक्षर हजारांना जगवतं. तू तेच कर."
          जाताना महाराजांनी मागे वळून पाहिलं. त्या कोठीच्या दारावर अजूनही तीच फाटकी हळदीची झोळी लटकत होती. तसे महाराज बहिर्जीला म्हणाले,
           "बहिर्जी, रायगडावर माझी नोंद होईल. शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. पण खरा इतिहास इथे लिहिला जातोय. या झोपडीत. या परीसरात. जिथं एक बाई, दुसऱ्या बाईला विचारते, 'तुला काय येतं?'
          महाराजांचं बोलणं पुर्ण झालं. तसे ते निघून गेले व त्यांचे दोन्ही घोडे रायगडाच्या वाटेला गेले. परंतु शिरायांची पादत्राणे तिथंच राहिली. डोणजेच्या माळावरच्या कोठीच्या दारात. आजही म्हटलं जातं की त्या माळावर गेलं की ती पादत्राणे दिसतात. कोणाला मुर्त स्वरुपात तर कोणाला अमुर्त स्वरुपात. जी पादत्राणे, महाराजांनी गोदावरीला भेट देतांना दिलेली होती.
          गोदावरीचा जन्म नाकारला गेला, परंतु तिचा शेवट छत्रपतींनी आपली पादत्राणे तिच्या दारात ठेवून केला होता.
     
**********************************************
 
         ६ जून १६७४. त्या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला होता. राजाभिषेकानंतर शिवराय छत्रपती झाले. सगळीकडे आनंद आनंद झाला. पण डोणज्याची गोदावरी आनंदी नव्हती. ती आली नाही राजाभिषेकाला. तिला वाटत होतं की शिवरायांनीच तिला भेटायला यावं. त्यामुळं ती त्यांची वाट बघत बसली होती डोणजेच्या माळावरच.
             राजाभिषेक होऊन बरेच वर्ष झाले होते. शिवरायांना डोणज्याची आठवण सतावत होती. त्यातच त्यांना गोदावरीचीही आठवण येतच होती. वाटत होतं की याच गोदावरीनं आपल्याला पुरंदर व कोंढाणा जिंकण्यासाठी मदत केली. अन् तिला राज्याभिषेकाचं निमंत्रण दिलं तरी ती आली नाही. त्यामुळंच शिवरायांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता व त्याची उकलही करावीशी वाटत होती. शेवटी त्याच आठवणीत रायगडावरून शिवराय राजगडाला आले. त्यांनी सांगितलं, "आता छत्रपती झालोय, आधी मी सिंहगडावर जाऊन येतो."
          सगळ्यांना वाटलं की राजे सिंहगडावर जातील. परंतु नाही. ते डोणज्यातच थांबले. त्यांनी तिची भेट घेतली व तिला आपली पादत्राणे दिली होती व ते परत फिरले होते. त्यानंतर ते सिंहगडावर गेले होते.
          आज ते रायगडावरच होते. तसे बरेच वर्ष झाले होते. जिंजीची मोहीम आटोपून ते नुकतेच रायगडावर आले होते. आजही आठवण सतावू लागली होती शिवरायांना. तसे ते परत तिची भेट घेण्यासाठी डोणज्यावर गेले. 
         शिवराय डोणज्यात थांबले व ते गोदावरीच्या झोपडीत गेले. गोदावरीची झोपडी ओस पडली होती. चूल थंड होती.
          शिवरायांनी गोदावरीच्या झोपडीत जाण्यापुर्वी त्यांनी चौकशी केली. मग गावकऱ्यांनी सांगितलं, "ती गेल्या पंधरा दिवसांपासून अंथरुणाला खिळलीय. काही खात नाही. फक्त एकच म्हणते, 'छत्रपती आले का?'
           शिवरायांनी ते ऐकलं. तसे गोदावरीच्या झोपडीजवळ गेले. तसे तेआत प्रवेशले. गोदावरी उठायचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तशी ती उठली. त्यानंतर ती म्हणाली, 
           "आलात राजे. मी ऐकलं, तू आता छत्रपती झालास. छत्रपती म्हणजे काय असतं?"
            ते गोदावरीचं म्हणणं. तसे शिवराय म्हणाले, "पोरी, छत्रपती म्हणजे तुझा भाऊ. आज राजा झाला."
           ते शिवरायांचं बोलणं. तशी ती हसली. तिनं हळूच आपल्या उशाखालून एक रुमाल काढला. त्यात तीन दाणे होते. ज्वारीचे. त्या रात्रीचे, जेव्हा तानाजी गडावर गेला होता. ते दाणे, तिनं जपून ठेवले होते. म्हणाली,
           "हे घ्या महाराज. तुमच्या राजाभिषेकाची भेट. माझ्याकडे दुसरं काही नाही तुम्हाला राज्याभिषेकाची भेट द्यायला."
            शिवरायांनी ते दाणे हातात घेतले. तेवढ्यात तिचा हात थंड झाला.
          गोदावरी उठली नाही. परंतु थंड झाली, अगदी शांतपणे. जणू वाटच बघत होती शिवरायांच्या येण्याची. माझा छत्रपती झालेला राजा शिवबा तिला पुन्हा एकदा बघायचा होता. मगच ती सुखानं या जगाचा निरोप घेणार होती.
          शिवरायांच्या हातात ज्वारीचे दाणे दिले व ती शांत झाली. त्याचबरोबर थंडही. शिवरायांनी तिला छत्रपती म्हणून अग्नी दिला नाही. आपली एक मुलगी म्हणून अग्नी दिला आणि त्या दिवशी रायगडाच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपतींना पहिल्यांदा कळलं. राज्याभिषेक म्हणजे सोन्याचं सिंहासन नाही. राज्याभिषेक म्हणजे अशा गोदावऱ्यांचे आशीर्वाद पाठीशी असणं.
         शिवराय विचार करीत होते. तसा गोदावरीचा अंत्यसंस्कार आटोपला व ते परत एकदा सिंहगडाची भेट घेवून रायगडावर परतले होते. 
          शिवरायांनी डोणज्यात जावून गोदावरीचा अंत्यसंस्कार केलेला आहे. ही गोष्ट बहिर्जीला माहित नव्हती. कारण ते कोणत्यातरी गुंतागुंतीत फसले होते. परंतु ही गोष्ट जेव्हा त्यांना माहित झाली की गोदावरी गेली. तेव्हा हीच गोष्ट सांगण्यासाठी बहिर्जी शिवरायांकडे आले होते. म्हणाले,
         "धनी, गोदावरी गेली."
         बहिर्जीने बातमी आणली. म्हणाले, "राजे, डोणज्याची गोदावरी गेली."
          ते बहिर्जीचं बोलणं. त्यावर शिवराय काहीच बोलले नाहीत. फक्त वेषांतर करुन घोड्यावर बसले. राजगडावरून थेट डोणजे. बहिर्जीला काहीच कळत नव्हतं. मात्र ते मौन बाळगून होते. घडणारी घटना फक्त पाहात होते. 
          शिवराय जसे डोणज्यात पोहोचले. तसं त्यांनी डोणजं गाव न्याहाळलं. झोपडी तशीच होती. चूल तशीच होती. पण धूर नाही. तशी बहिर्जीनंच गोदावरीविषयी विचारपूस केली. तसे गावकरी सांगत होते,
         'तीन दिवस ताप होता गोदावरीला. कोणाला सांगितलं नाही. म्हणाली, "मावळे येतील, त्यांना भाकरी कोण करून देईल?" शेवटच्या दिवशी ताप अंगात असतांना पण तिनं भाकरी केल्या. पाच भाकरी. म्हणाली, "कोणीतरी येईल गडावरून." कोणी नाही आलं. फक्त शिवाजी महाराज आले होते. त्यांनीही भाकरी खाल्ल्या नाहीत. त्या तशाच पडल्या होत्या. मग ती शिवरायांच्या समक्षच गेली. जणू ती त्यांचीच वाट पाहात होती की काय? असंच वाटत होतं. ती चटईवर झोपली होती. शांतचित्तानं, मात्र तोंडावर तेज होतं.
          गोदावरी जाताच शिवरायांनी तिच्या उशाखाली पाहिलं. त्याखाली काय काय आहे? तर तिथं होती, एक छोटी पिशवी. उघडली. त्यात काय? एक तांब्याचं कडं आणि एक चिठ्ठी. निरक्षर बाईची चिठ्ठी, दुसऱ्याकडून लिहून घेतलेली. त्यात लिहिलं होतं ,
              "शिवबा राजा, माझ्या मेल्यावर मला कोंढाण्यावर पुरू नका. मला इथेच डोणज्यात पुरा. म्हणजे गडावर जाणाऱ्या मावळ्यांचे पाय माझ्या छातीवरून जातील. मला कळेल, स्वराज्य अजून जिवंत आहे."
         शिवरायानं चिठ्ठी वाचली आणि पहिल्यांदा........ तानाजी गेल्यावर पण जे रडले नसतील. त्यावेळेस ते धाय मोकळून रडले. ओरडले, "पोरी." पण ते रडणं ती ऐकायला नव्हती.
          शिवरायांनी तिला पुरलं. तिथंच, वाटेच्या कडेला. जिथून कोंढाणा दिसतो. मग एक दगड लावला. त्यावर लिहिलं, "इथे गोदावरी राहते. जी मावळ्यांना भाकरी देत असे.
          तिला पुरल्यानंतर शिवराय शेवटी म्हणाले, 
          "कोण होती ती? ती कोणीच नव्हती. म्हणूनच ती सगळं होती. आजपासून जो पण मावळा या वाटेने जाईल, तो त्या दगडाला हात लावून जाईल. कारण त्या दगडाखाली फक्त एक बाई झोपली नाही. त्या दगडाखाली डोणजे गावचं व सिंहगडाचं काळीज झोपलंय आणि जोपर्यंत ते काळीज धडधडतंय, तोपर्यंत सिंहगडाला काही होणार नाही.
           गोदावरी गेल्यानंतर शिवरायांना गहिवरुन आलं होतं. शिवराय विचार करु लागले होते. डोणजे...... सिंहगडाच्या पायथ्याचं गाव. इथूनच कोंढाण्यावर जातो. इथल्या प्रत्येक दगडाला मावळ्यांच्या पावलांची आठवण आहे आणि इथेच राहत होती गोदावरी. कोण होती ती? कोणी मोठी नाही. एक साधी बाई. नवरा नाही. पोरगा नाही. एकटी राहत होती. सई तिची बहिण. तेही तिच्यासारखीच समदुःखी. कोंढाण्याच्या वाटेवर तिची झोपडी आहे. तानाजी ज्या गेला त्या रात्री, याच गोदावरीने वाट दाखवली होती म्हणे. मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटायला आलो. तानाजी गेल्यावर पहिल्यांदा डोणज्यात आलो. ती झोपडीबाहेर बसली होती. मला पाहून उठली नाही. म्हणाली, "कोण आहे?" मी म्हणालो, "मी शिवबा." ती म्हणाली, "ओळखलं. तानाजीचा शिवबा ना?"
          माझ्या काळजात चर्र झालं होतं. तानाजीचा शिवबा. मी गप्प राहिलो होतो. तशी ती परत म्हणाली होती,
          "त्या रात्री ते तीनशे जण इथून गेले. मी त्यांना भाकरी दिली होती. तानाजीला म्हणाले, "जरा जपून जा. तो हसला. म्हणाला, "तू फक्त आशीर्वाद दे. गड घेऊन येतो." "मी दिलाय आशीर्वाद. पण तो नाही आला परत. त्याचे लोक आले, त्याला घेऊन जाणारे, परत आले, रक्ताने भरलेले." ती प्रसंग सांगत होती. रडतरडत, अश्रूभरल्या नजरेने. मग मी म्हणालो, "गोदावरी तुला काय पाहिजे? जमीन देऊ? वाडा बांधून देऊ?" पण ती लोभी नव्हती. स्वार्थी नव्हतीच. ती म्हणाली होती, "नको राजा. काही नको. फक्त एक कर. माझ्या झोपडीसमोरून जो पण मावळा गडावर जाईल, त्याला कोणी अडवू नकोस आणि जो गडावरून येईल, त्याला भाकरी मिळू दे. एवढंच." त्यावर मी काय बोलणार? आम्ही राजे, आम्ही किल्ले जिंकतो, आम्ही इतिहास लिहितो. पण हा इतिहास खरा कोण बनवतो? ही गोदावरी बनवते. जी रात्रीच्या अंधारात तीनशे मावळ्यांना भाकरी देते, वाट दाखवते आणि सकाळी कोणाला न सांगता आपली झोपडी झाडून काढते.
         ती गोदावरी धन्य आहे. मी तिच्या पायाला हात लावला. त्यावर ती म्हणाली होती की राजा, पाया पडू नकोस. तानाजीला जपायला पाहिजे होतं.
          ते वाक्य...... ते वाक्य मला सिंहगडापेक्षा जास्त टोचतंय आज. मी डोणजे सोडताना मागे वळून पाहिलं नाही. गोदावरी पुन्हा चूल पेटवत होती. उद्या पुन्हा कोणीतरी गडावर जाईल. याची काळजी करीत. तिला माहिती होतं. म्हणून ती चूल विझू देत नव्हती. तीच खरी स्वराज्याची आई होती. तिनंच मातीतून स्वराज्य निर्माण केलं होतं, एका हळदीच्या चोळीवर मात करुन. जिनं हळदीच्या चोळीपासून झोळी बनवली होती. 

*****************************************

           सन १७०७ उजाडलं होतं. आता गोदावरी या जगात नव्हती. ती गेल्यावर सई, 'सई' राहिली नाही. माळावरच्या सगळ्या बायका तिला 'सईआक्का' म्हणू लागल्या होत्या. ती आता तलवार चालवत नव्हती. तिची तलवार तिनं कोठीच्या भिंतीवर टांगली होती. तिच्या जागी तिच्या हातात आला होता एक बांबूचा दांडका. जो दांडका मुलांना अक्षर शिकवायचा.
         सई झोपडीतच बसली होती. तोच तिला आठवलं ते साल, सन १६८९. सन १६८९ ला संभाजी महाराज गेले. स्वराज्यावर पुन्हा अंधार आला. औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये तळ ठोकून बसला होता. पुरंदर, सिंहगड, राजगड. एकामागून एक किल्ले पडत होते. पण डोणजेच्या माळावरची कोठी पडली नाही. कारण सईने एक नवीन युक्ती काढली होती. मुघल सैनिकांना ती म्हणायची,
          "आम्ही कोणी नाही, आम्ही फक्त विधवा बायका, आमच्याकडे काही नाही." 
         ते सईचं बोलणं असायचं. मात्र स्वराज्यातील तेच सैनिक तिच्याच कोठीतून धान्य घेऊन जात असत, त्यांच्या लक्षातही येत नसे की त्या धान्यातूनच शेजारच्या जंगलात लपलेल्या मराठ्यांच्या तुकडीला भाकरी जात आहे. गोदावरीने तिला वटपौर्णिमेचं नाटक शिकवलं होतं, सईने त्याचं रूप बदललं होतं.
         सन १६८१. सईला कोणीतरी आधार हवा होता. म्हणूनच तिनं एक मुलगी दत्तक घेतली होती. ती दत्तक घेतलेली छोटी मुलगी, जिचं नाव पुरंदरी ठेवलं होतं. पुरंदर जेव्हा महाराजांनी सन १६५६ ला जिंकला. तो जिंकता आल्यानं त्या मुलीचं नाव सईनं पुरंदरी ठेवलं होतं. पुरंदरी आता २६ वर्षांची झाली होती. ती तरुण झाली होती. 
         तीच गोदावरीची झोळी घेऊन ती आता धान्य नेत होती. सन १७०७ च्या एका संध्याकाळी बातमी आली. औरंगजेब अहमदनगरला मेला. सई तेव्हा कोठीच्या दारात बसली होती. वय झालं होतं, ६१ वर्षं. केस पिकले होते, पण वेणी अजूनही तशीच लांब. पुरंदरी धावत आली. म्हणाली, "आक्का, औरंगजेब मेला."
         सईने मान वर केली. तिला गोदावरीचा तोच प्रश्न आठवला, "आपण हरलो का गं?" आणि तिचं उत्तरही आठवलं, "किल्ले येतील जातील, पण वाट कधीच मिटणार नाही."
         सईनं ते शब्द ऐकले. तशी तिनं भिंतीवरची आपली जुनी तलवार काढली. ती तलवार गंजली होती. तिनं ती पुरंदरीच्या हातात दिली नाही. मात्र तिनं ती तिथेच ठेवली. त्याऐवजी तिनं कोठीच्या दारावर टांगलेली ती रिकामी, पांढरी झालेली हळदीची झोळी काढली आणि पुरंदरीच्या खांद्यावर टाकली. म्हणाली,
         "पुरंदरी, आता तुला तलवारीची गरज नाही गं. आता या झोळीची गरज आहे. जा, माळावरून बी गोळा कर. उद्या पेरायचंय."
        त्या रात्री सई झोपली. गोदावरी झोपली तशीच. शांतचित्तानं. तसा दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरंदरीने पाहिलं, सई अंथरुणातच होती. ती अंथरुणावर निश्चल, निर्जीव अवस्थेत पडून होती. कोणाला कळलंही नव्हतं. ती केव्हा गेली अन् केव्हा नाही ते. मात्र ती गेली होती. पण तिच्या पायाजवळ, तिनं रात्री पुन्हा एकदा तांदळाने रांगोळी काढली होती. पण या वेळी रांगोळी वेगळी होती. मध्यभागी पुरंदरचा बुरुज नव्हता. मध्यभागी एक झोळी होती आणि त्या झोळीभोवती शंभर छोटी पावलं. गोदावरीनं पन्नास पावलांची वाट सुरू केली होती, सईने ती शंभर केली होती.
         पुरंदरीने ती रांगोळी पुसली नाही. तिनं त्या शंभर पावलांच्या पुढे अजून दहा पावलं स्वतः काढली आणि कोठीच्या पाटीखाली एक दुसरी ओळ लिहिली,
        "तलवार गंजेल, पण झोळी कधीच रिकामी होणार नाही."
          सन १६६५ ला ज्या दोघींना मुघलांनी पुरंदरच्या बुरुजाला बांधलं होतं, त्याच दोघींनी चाळीस वर्षांनी स्वराज्याला पुन्हा उभं राहायला बी दिलं होतं. किल्ले लढवले जात होते व त्या किल्ल्यांना सैनिक लढवत होते, मावळे बनून. परंतु त्यांना बळ देण्याचं काम भाकरीनं केलं होतं. ज्या भाकरी गोदावरी व सईच नाही तर त्या महिलांनी पुरवल्या होत्या. ज्यांची आजही इतिहासात नोंद नाही. त्या महिलांना जरी समाजानं नाकारलं असलं तरी त्याच महिलांमुळं स्वराज्य उभं राहिलं होतं.
            डोणजे गाव. कोंढाण्याच्या पायथ्याशी असलेलं गाव. डोणज्यातून कोंढाणा दिसत नाही, तो डोणज्यावरच उभा होता. सकाळी धुक्यात बुडालेला, दुपारी उन्हात तापलेला. पुरंदरी लहान असताना गोदावरी तिला रात्री चुलीपाशी सांगायची.
          "अगं पुरंदरी, हा दिसतोय ना वर? याला आधी कोंढाणा म्हणायचे. इथं कौंडिण्य ऋषी तपाला बसायचे. आता तसं नाही. आता आपली सत्ता नाही. मग काय, मोगल आले. वर उदेभान नावाचा राठोड बसला होता. गड त्याच्या हातात.
        आपल्या राजाला गड हवा होता. त्याने तानाजीला बोलावलं. तानाजीच्या पोराचं लग्न ठरलं होतं. तानाजी म्हणाला, "आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं. माघाची काळोखी रात्र होती. तानाजी आणि त्याचे मावळे. सोबत एक घोरपडे. त्या घोरपडेनं दोर बांधला आणि कड्यावरुन सोडला. तो दोर खाली आला. त्याला धरून माणसं वर चढली. कल्याण दरवाज्याकडून नाही, थेट काळकट कड्यावरून. वर मोठा रणसंग्राम झाला. तलवारी, आरडाओरडा. तानाजी आणि उदेभान दोघंही पडले. रक्तानं कातळ लाल झालं होतं.
         कातळ लाल झालं होतं. राजाला निरोप गेला होता. राजे म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला.' त्या दिवसापासून आमच्या कोंढाण्याचं नाव झालं सिंहगड.
           आज गोदावरी व सई जिवंत नव्हत्या. गोदावरी व सईही गेली होती. पण एकटी असताना जेव्हा पुरंदरी कोंढाण्याकडे बघत असे, तेव्हा तिला वाटायचं की आपल्यालाही असंच एकदा, स्वतःच्या आयुष्याच्या कड्यावरून, कोणाला न सांगता वर चढून जावं लागेल.
            पुरंदरीला ही झोळी कधीच रिकामी नसते. हे माहित होतं. ती माळावर गेली. तिथं तिच्यासारख्याच दहा बायका उभ्या होत्या. विधवा, परित्यक्ता, ज्यांना गावाने नाकारलं होतं. पण ज्यांच्या कोठीतूनच स्वराज्य जगलं होतं. पुरंदरी त्यांच्याकडे गेली. परंतु आता पुरंदरी त्यांना 'लढायला चला.' म्हणाली नाही. ती म्हणाली, 'पेरायला चला.' कारण १६६५ ला जेव्हा मुघलांनी गोदावरी आणि सईला पुरंदरच्या बुरुजाला बांधलं होतं, तेव्हा त्यांनी विचार केला होता की या बायका संपल्या. त्यांना माहित नव्हतं की बाईला बुरुजाला बांधता येतं, तिच्या झोळीला बंदिस्त करता येत नाही.
        संध्याकाळ झाली. डोणज्यावरून सिंहगड दिसत होता. तो अजूनही तसाच उभा होता, काळाकभिन्न. पुरंदरीने एकदा मागे वळून बघितलं. कोठी दिसत होती. कोठीच्या भिंतीवर दोन तलवारी टांगलेल्या होत्या. एक गोदावरीची, एक सईची. दोन्ही गंजलेल्या होत्या आणि दारात एक ताजी रांगोळी होती एकशे दहा पावलांची. तिनं मनात म्हटलं, 'गोदावरीनं वाट दाखवली. सईनं वाट दाखवली. आता माझी पाळी आहे. ही वाट मिटू द्यायची नाही.
         ती चालू लागली. तिच्या खांद्यावरची रिकामी झोळी हलत होती. पण वाटेतल्या प्रत्येक पावलागणिक ती जड होत होती. कारण इतिहास किल्ल्यांवर लिहिला जात होता, पण स्वराज्य झोळीतून जगता येत होतं. हेच पुरंदरीला माहित होतं. ज्याप्रमाणे गोदावरी व सईनं वाट दाखवली होती मावळ्यांना. पुरंदरीही आज जगाला वाट दाखवणार होती, तिला माहित असलेल्या ज्ञानाच्या चश्रुतून. जे ज्ञानकण तिनं गोदावरी व सईसोबत राहून मिळवले होते. 

***********************************************************************समाप्त**************