स्टॅम्प पेपर
पात्र परिचय
प्रशांत. वाड्याचा मालक
विशाखा प्रशांतची बायको.
विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर
जयसिंग भाडेकरू.
मल्हार भाडेकरू.
अप्पासाहेब भाडेकरू.
विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा.
गणेश भाडेकरू
सुधाकर भाडेकरू
भाग २
भाग १ वरुन पुढे वाचा........
“मला असं वाटतं की जयसिंग जे काही आत्ता बोलला, त्यावर विचार करायला हरकत नाही. आपण उद्या संध्याकाळी पुन्हा बसू. तो पर्यन्त सर्वच विचार करून ठेवा.” अप्पासाहेब म्हणाले आणि मग मीटिंग संपली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तर नाही पण रात्री पुन्हा मीटिंग भरली. जयसिंगने सुरवात केली.
“तुम्हाला सर्वांना हे माहितीच असेल की आपण सर्व इथे बरीच म्हणजे जवळ जवळ ४० ते ५० वर्ष राहात आहोत. १२ वर्ष राहिल्यावर घराची मालकी आपोआप तुमच्या कडे येते. हे मी नाही, तर कायदा सांगतो आहे.” – जयसिंग.
“जयसिंग तू पुन्हा पुन्हा तेच बोलतो आहेस. तुझं आणि प्रशांतचं काही भांडण झालं आहे का? त्याला कसंही करून लुबाडायचंच असं ठरवूनच तू सगळ्या योजना सांगतो आहेस. हे बरोबर नाही. प्रशांतच काय त्यांच्यापैकी कोणीही इतकी वर्ष आपल्याला त्रास दिलेला नाहीये. आणि मुख्य म्हणजे सुरवात आपणच केली होती. आपणच त्याच्या कडे जाऊन चाळ रिडेव्हलप करण्याची मागणी केली होती. त्याने त्यावेळेसच सांगितलं होतं की त्याला अजिबात वेळ नाही. आपल्यालाच बिल्डर ठरवायला सांगितलं होतं. त्याला काहीच हरकत नव्हती. पण आपणच आग्रह केला म्हणून त्याने हा वाडा डेव्हलप करायचं काम अंगावर घेतलं आहे, तू सुद्धा होतासच की त्या वेळेस. तरी तू असा बोलतो आहेस. मला आता जरा शंका यायला लागली आहे.” – अप्पासाहेब.
“मला अप्पासाहेब, जयसिंगच्या बोलण्यात तथ्य दिसतं आहे. आपला जर फायदा होत असेल तर जयसिंग म्हणतो तशी प्रशांत बरोबर थोडी सौदेबाजी करण्यात काय हरकत आहे. झाला तर सर्वांचाच फायदा होईल.” – गणेश.
“आणि आपला जर होत नसेल, तर प्रशांतचा पण व्हायला नको.” - सुधाकर.
“अरे हे सगळं तुम्ही प्रशांतचे शत्रू असल्यासारखे बोलता आहात. सुधाकर, गणेश जयसिंगच्या बोलण्याला फसू नका. तो चुकीचं वागतो आहे.” – अप्पासाहेब.
“अप्पासाहेब मी तुम्हा सर्वांच्या भल्याचा विचार करतो आहे आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता आहात. तुम्ही ज्येष्ठ आहात आणि आम्ही तुम्हाला मान देतो, पण तुम्ही असे आरोप करता आहात. हे बरोबर नाही.” – जयसिंग
“जयसिंग तू तर भाडेकरू पण नाहीयेस, तुमच्या सर्व पिढ्या इथे फुकट रहातात. प्रशांतच्या आजोबांनी, वडीलांनी आणि खुद्द प्रशांतने तुम्हाला कधी त्रास दिला नाही, तरी सुद्धा तू त्यांच्या बद्दल असं कडवट बोलतो आहेस हे काही आम्हाला पटत नाही.” अप्पासाहेब. म्हणाले.
“अप्पासाहेब, तुम्ही काही बोलूच नका. तुम्ही किती भाडं देता, ५० रुपये, म्हणजे जवळ जवळ फुकटंच राहता आहात. माझं नाव घ्यायची काहीच आवश्यकता नाहीये. तुमच्या लक्षात येत नाहीये, मी सांगतो खरं काय आहे ते. प्रशांतची ताकद कशात आहे? त्यांच्या बिल्डर मधे. तो त्याचा मित्र आहे. तो प्रशांतचाच फायदा बघणार. त्याचा बिल्डर त्याला जे सांगतो, प्रशांत तेच आपल्याला सांगतो. आपण बिल्डरच बदलू. माझ्या ओळखीचा एक बिल्डर आहे, आपण प्रशांतला सांगू की, या बिल्डरला विचार मग माझा बिल्डर आपल्याला भरपूर पैसे देईल. पण प्रशांतला तो काय देईल, ते तो आणि प्रशांत बघून घेतील. कशी वाटते माझी आयडिया?” – जयसिंग
आता दोन तट पडले होते. काही जणांना जयसिंगचं बोलणं पटलं तर काहींना नाही. बराच वेळ वाद विवाद चालला पण निष्पन्न काही निघालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रशांत आणि विजय राघव दोघं वाड्यावर आले.
सर्वांची मुलं ऑफिस मधे गेली होती, पण वयस्कर सगळे घरीच होते. प्रशांत आला आहे म्हंटल्यांवर सर्वच गोळा झाले.
“काय अप्पासाहेब, काय विचार ठरला आहे तुम्हा लोकांचा? झाला का विचार करून? काय ठरलं ते सांगू शकाल का?” – प्रशांत.
मग आप्पासाहेबांनी जयसिंगची सौदेबाजीची योजना सांगितली. ३ BHK फ्लॅट आणि २० लाख मिळायला हवेत ही गोष्ट अर्ध्या लोकांना पटली असल्याचंही सांगितलं.
“अप्पासाहेब, हे शक्य नाहीये हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्हा लोकांच्या विनंती वरुनच मी ही योजना आखली आहे. जयसिंग म्हणतो आहे त्याप्रमाणे, ही घरं तुमची झाली आहेत हे खरं आहे, पण जमीन माझी असल्याने तुम्हाला नवीन घरं माझ्या परवानगी शिवाय बांधता येणार नाहीत. मी तुमच्या साठी बेस्ट पर्याय घेऊन आलो होतो, पण आता ती सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. ठीक आहे हे प्रोजेक्ट आपण कॅन्सल करू. येतो आम्ही.”,
“तो जयसिंग म्हणत होता की त्याचा ओळखीचा एक बिल्डर आहे, तो ३ BHK आणि वरतून २० लाख द्यायला तयार आहे. त्यांच्याशी एकदा बोलतोस का?”- अप्पासाहेब.
“तुम्ही भेटला आहात का त्याला? कारण ही जी काही ऑफर आहे ती अवास्तव आहे. तुम्ही एकदा सर्व जण त्याला भेटा, त्यांची योजना समजावून घ्या. जर तुम्हाला ठीक वाटली, तर मला सांगा. आम्ही येऊ त्याला भेटायला.” – प्रशांत.
घरी गेल्यावर, विजय म्हणाला,
“प्रशांत तो जयसिंग दुसऱ्या कोणाला घेऊन येतो असं म्हणाला आहे, त्याच्या काय आयडिया आहेत हे नीट तपास, कारण आपलं कॅलक्युलेशन बरोबर आहे.”
“अरे आज माझ्याजवळ, घेऊन या म्हणण्या शिवाय काही पर्यायच नव्हता, मी नाही म्हंटलं असतं तर उगाच गैरसमज वाढले असते. तुझा काय अंदाज आहे? तो म्हणतो आहे ते शक्य आहे?” – प्रशांत.
“हे बघ आपला हिशोब तुला पूर्ण माहीत आहे. तू त्यांना उत्तम घर आणि उर्वरित आयुष्यासाठी 5 लाख देतो आहेस. हे कोणीच करत नाही. 10X10 च्या दोन खोल्यांत राहणाऱ्या लोकांना बाकीचे बिल्डर जास्तीत जास्त 500 स्क्वेअर फुटाचा 1 BHK फ्लॅट देतील. तू तर डबल देतो आहेस आणि वर 5 लाख. तो दूसरा माणूस जर 3 BHK आणि वर 20 लाख देणार असेल, तर यात काही तरी गोम आहे. पण मला वाटतं की त्यांना सर्वांना त्या बिल्डरची भेट घेऊदे, मग बघू आपण.” – विजय.
त्या दिवशी रात्री, वाड्यावर मीटिंग भरली.
“जयसिंग, आज प्रशांत आला होता. आम्ही त्याला तुझ्या बिल्डर बद्दल सांगितलं. तर तो म्हणाला की आधी तुम्ही सर्व त्याला भेटा, तुम्हाला सर्वांना पटलं, तर मग आम्ही त्यांच्याशी मीटिंग करू. मग केंव्हा आणतोस तुझ्या बिल्डरला?” – अप्पा साहेब.
हे ऐकल्यावर जयसिंग चिडला. म्हणाला,
“अप्पासाहेब, हे लांडे कारभार करायला तुम्हाला कोणी सांगीतलं? आपल्या प्लॅन्स बद्दल तुम्ही प्रशांतला सांगून खूप मोठी चूक केली आहे. आपल्याला ज्या विषयातलं काही कळत नाही त्याच्या बद्दल गप्प बसावं ना, आता तो प्रशांत महा चालू आहे, तो नक्की काही काड्या करणार आणि आपले प्लॅन्स ओंफुस्स होणार.” – जयसिंग.
जयसिंगचं हे बोलणं ऐकल्यावर विश्राम भडकला. साहजिकच होतं ते, त्यांच्या वडीलांचा
जयसिंगने अपमान केला होता, तो म्हणाला,
“जयसिंग तोंड आवर, आप्पांना तू असं बोललेलं मी खपवून घेणार नाही. हा नाक्या वरचा कट्टा नाहीये, सभ्य माणसासारखा वाग आणि बोल.” – विश्राम
“मी काय चुकीच बोललो? अप्पासाहेबच चुकीचे वागले. आपले प्लॅन्स सगळे उघड करून टाकले.” – जयसिंग.
“जयसिंग, फालतू बडबड बंद कर. आपले प्लॅन्स म्हणजे काय? मला समजत नाही की यात सीक्रेट काय आहे? तू काही बेकायदेशीर करण्याचा विचार करतो आहेस का? तसं असेल, तर आम्ही तुझ्या बरोबर नाही.” – मल्हार
“मल्हार तू आधी माझ्यावर आरोप करण्याचं सोडून दे. मी तुम्हा सर्वांच्या भल्याचाच विचार करतो आहे.” – जयसिंग.
“काय विचार आहे तुझा ते तरी कळू दे आम्हाला.” – मल्हार.
“ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेन.” – जयसिंग.
“नाही जे काही आहे ते आत्ताच सांग. मीटिंग कशासाठी भरवली आहे? गोष्टी लपवायला? ते काही नाही आज आता सगळं क्लियर झालाच पाहिजे” – मल्हार.
“हो जयसिंग सांगून टाक” – गोविंद राव.
“आत्ता सांगितलं तर हे अप्पासाहेब जाऊन त्या प्रशांतच्या कानाला लागतील आणि सगळंच गाड फसेल. सॉरी.” – जयसिंग.
“आम्हाला हे मान्य नाही. कामांमध्ये पारदर्शी पणा आवश्यक आहे. तो जर नसेल तर आम्ही यात नाही. चला अप्पा आपलं इथे काही काम नाही.” – मल्हार.
मल्हार आणि अप्पा उठले, गोविंदराव आणि अजून चार जण उठले. मीटिंग मधे आता जयसिंग आणि तिघंच उरले.
“जयसिंग तुझे प्लॅन्स आम्हाला सांग.” – गणेश.
“नाही, मी आत्ता सांगणार नाही. मला आधी माझ्या बिल्डर मित्राशी बोलावं लागेल. मगच मी तुम्हाला सांगेन.” – जयसिंग.
“काय नाव आहे तुझ्या मित्राचं? त्यालाच का बोलवत नाहीस इथे? जे काही ठरायचं असेल, ते सर्वांसमोरच ठरू दे.” – गणेश.
“अरे गणेश तुला काही कळत नाही. काही गोष्टी आशया असतात, की ज्या सर्वांसमोर उघड करायच्या नसतात. जरा धीर धर. यात तुझाही फायदा आहे.” – जयसिंग.
मीटिंग संपली.
क्रमश:......
दिलीप भिडे