Stamp Paper Part 3 in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 3

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 3

स्टॅम्प पेपर

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार              भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग  3  

भाग 2  वरुन पुढे वाचा........

“काय नाव आहे तुझ्या मित्राचं? त्यालाच का बोलवत नाहीस इथे? जे काही ठरायचं असेल, ते सर्वांसमोरच ठरू दे.” – गणेश.

“अरे गणेश तुला काही कळत नाही. काही गोष्टी अश्या असतात, की ज्या सर्वांसमोर उघड करायच्या नसतात. जरा धीर धर. यात तुझाही फायदा आहे.” – जयसिंग.

मीटिंग संपली.

गच्चीवरून खाली उतरातांना गणेश थांबला, सुधाकरकडे वळून म्हणाला,

“सुधाकर, तो म्हणाला की काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत, पण यात आपलाही फायदा आहे. याचा अर्थ काय? तुझ्या लक्षात येतो आहे का?”

“मी पण त्याचाच विचार करतो आहे. जयसिंगच्या मनात काहीतरी शिजतं आहे. आणि जर तो ते आपल्या पासून लपवत असेल, तर ते सरळ काम नाहीये. मला दाट शंका आहे त्याच्या हेतु बद्दल.” – सुधाकर

“अगदी बरोबर. अख्या वाड्याचं रिनोवेशन चं काम आहे, तर सर्वांना सर्व गोष्टी माहीत असायला हव्यात. लपून छपून काही उद्योग करणं बरोबर नाही. पण आता काय करायचं?” – गणेश.

“मला असं वाटतं की आपण मल्हारशी या बाबतीत बोलायला हवं.” – सुधाकर.

“आत्ताच जायचं?” – गणेश.

“नको आधीच रात्रीचे अकरा वाजले आहेत. उद्या सुट्टी नाहीये. उद्या संध्याकाळीच बोलू.” – सुधाकर.

पण त्याच दिवशी रात्री उशिरा जयसिंगच गणेशला भेटायला आला. त्याने सुधाकरला पण बोलावून घेतलं.

“”ही बघा मित्रांनो, कुठलाही बिल्डर धुतल्या तांदूळाचा नसतो. हा माझा मित्र पण  नाही. तो काय लांडया  लबाड्या करतो त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे? आपला कार्यभाग साधला की झालं. तुम्ही साथ दिली तर मी तुम्हाला थोडे जास्त पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. बघा.” – जयसिंग

“असं असेल तर मला कबूल आहे.” – गणेश.

“मला पण” – सुधाकर.

“फक्त ही कोणाला सांगू नका. ही गोष्ट आपल्यातच राहायला पाहिजे.” – जयसिंग

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मल्हार आल्यावर गणेश आणि सुधाकर त्यांच्या घरी गेले. त्याला जयसिंग काय म्हणाला ते सांगितलं. त्यावर मल्हार म्हणाला की,

“मलाही तो आप्पासाहेबांना जे बोलला ते आवडलं नव्हतं. तो काहीतरी वेगळंच बोलत होता.” – मल्हार.

“मला हे समजत नाही, की आप्पासाहेबांनी प्रशांतला जयसिंगच्या बिल्डर बद्दल सांगितलं तर जयसिंग एवढा भडकला का?” – सुधाकर.

“याचा अर्थ त्याच्या मनात काही वेगळच आहे पण काय ते सांगायला तो तयार नाहीये. आणि ते कळल्या शिवाय मी सहभागी होणार नाही.” – मल्हार.

“आपण आज रात्री मीटिंग बोलावू आणि जयसिंगला सगळ्या गोष्टी क्लियर करायला सांगू. आणि मग बघू.” – गणेश.

रात्री मीटिंग भरली. सगळ्यांचं एकच म्हणण पडलं की जे काय असेल ते स्पष्ट झालं पाहिजे. प्रशांत काही आपला शत्रू नाहीये.

“पण आपला जर आर्थिक फायदा होत असेल, तर जायसिंगचं म्हणण ऐकून घ्यायला काय हरकत आहे? तो जर म्हणतो आहे की त्यांच्या बिल्डर कडून आपल्याला 3 BHK फ्लॅट आणि वर किमान 20 लाख मिळणार आहेत, तर एकदा ऐकून तर घ्या.” -गणेश

“गणेश बरोबर बोलतो आहे. एकदा आपण ऐकून घेऊ. जयसिंग तू बोल. पण डीटेल मध्ये सर्वांना समजेल असं सांग.” – सुधाकर.

“बोलायचं काय त्यात? गणेश बोललाच की. मी काल तेच सांगितलं होतं.” – जयसिंग

“3 BHK चा एरिया काय असणार आहे?” – अप्पासाहेब.

“900 SQ फुट” – जयसिंग

“आपले 20 फ्लॅट्स, म्हणजे पूर्ण 20000 SQ फुट संपले. वरतून तो प्रत्येकाला 20 लाख देणार. म्हणजे 4 कोटी. यात त्याचा काय फायदा आहे? तो चॅरिटी करतो आहे का?” – विश्राम

“तो बिल्डर काय करतो याच्याशी आपल्याला काय करायचं आहे? त्याचं तो बघून घेईल. आपल्याला आपलं घर आणि पैसे मिळाल्याशी मतलब. आम खाओ पेड मत गिनो.” – जयसिंग

“अरे पण हे गणित बसत नाही. आपण फसवले जात नाही हे बघणं जरुरीचं नाही का? घाई करण्यात काहीच अर्थ नाही.” – विश्राम

“तू त्यांना एकदा घेऊन ये. आम्हा सगळ्यांना भेटव. मगच पुढे जाता येईल.” – मल्हार.

“पण तुम्ही एवढा आग्रह का धरता आहात? मी आहे न, मी सगळं व्यवस्थित करेन. सर्वांना 3 BHK आणि 20 लाख मिळाल्याशी मतलब ठेवा.” – जयसिंग

“तू म्हणतो आहेस तर ठीक आहे. तू जबाबदारी घेतो आहेस म्हंटल्यांवर प्रश्नच मिटला. काय सुधाकर बरोबर आहे न?” – गणेश.

“तरी सुद्धा आम्ही सगळे बिल्डर ला भेटलो तर काय प्रॉब्लेम आहे ते सांग.” – मल्हार.

“काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तो खूप बिझी माणूस आहे मी बघतो त्याला केंव्हा वेळ आहे, आणि तुम्हाला सांगतो. पण त्यावेळेस  सर्व हजर रहा म्हणजे झालं.” – जयसिंग

मग एक दिवस संध्याकाळी उशिरा जयसिंग अमृतलाल बिल्डरला घेऊन आला. मीटिंग भरली. अमृतलाल ने जयसिंग जे जे म्हणाला होता, तेच सर्वांना सांगितलं. जवळ जवळ सर्वांचाच समाधान झालं. आपल्याला 20 लाख एक्स्ट्रा मिळणार यांचा सर्वांनाच आनंद झाला होता. पण आप्पासाहेबांच्या मनातलं संशय काही जात नव्हता. ते म्हणाले,

“साहेब, तुम्ही प्रत्येकाला 900 sq फूटाचा  फ्लॅट देणार म्हणता, मग इथेच तर 18000 sq फुटाचं बांध काम झालं. मग तुम्ही इतरांना  फ्लॅट कशाच्या आधारावर देणार आहात? इथे FSI 1 आहे मग ही गणित कसं बसवणार? वरतून तुम्ही प्रत्येकाला 20 लाख देणार म्हणता, इथेच 4 कोटी झाले. हा खेळ आहे तरी काय? हे जरा सांगाल का?” – अप्पासाहेब.

अप्पासाहेब असं म्हणाले आणि जयसिंगच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने अमृतलाल कडे पाहिलं पण त्यांचा चेहरा शांत होता,

“बरोबर अप्पासाहेब, तुम्ही अगदी कळीचा प्रश्न विचारला. पण काय आहे न अप्पासाहेब, तुम्हाला प्रश्न माहीत आहे पण याचं उत्तर माहीत नाही. कारण तुम्ही व्यावसायिक नाही. मी सांगतो अगदी सविस्तर तुम्हाला सर्वांना समजेल असं. मग तर झालं? यात काहीही बेकायदेशीर नाहीये. तुम्ही निश्चिंत रहा.” – अमृतलाल.

अमृतलाल असं म्हणाल्यावर सर्वांनाच हायसं झालं. उगाच आपण अमृतलाल आणि जयसिंग वर संशय घेतला असं वाटायला लागलं.

“माझ्याकडे भरपूर TDR आहे,” अमृतलालने पुढे बोलायला सुरवात केली. “TDR म्हणजे Transferable Development Rights. म्हणजे हस्तांतरित बांधकाम हक्क.
सरळ भाषेत सांगायचं तर — एका जमिनीवर वापरता न आलेला बांधकाम हक्क दुसऱ्या जमिनीवर वापरण्याची परवानगी. म्हणजे आमच्या इतर प्रोजेक्ट वर जास्तीची जमीन आम्ही कार्पोरेशनला दिली, म्हणजे बाग करायला, रस्ता रुंद करायला, किंवा एखाद्या शाळेला ग्राउंड नसेल तर त्या शाळेला जर आम्ही जमीन दिली, तर तेवढा एक्स्ट्रा FSI आम्हाला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये वापरता येतो. तर असा TDR मुळे  आलेला FSI आमच्या कडे आहे. त्यामुळे आम्ही दोन टॉवर उभारणार आहोत. एक तुमचं आणि दूसरा विकण्या साठी. आता हे गणित तुमच्या लक्षात आलं असेल असं मी धरून चालतो. अजून काही शंका असतील तर आत्ताच विचारा. सुरवात कशी स्वच्छ मनाने झाली पाहिजे.” – अमृतलाल.

अमृतलाल च्या या स्पष्टि‍करणानंतर, कोणाच्याच मनात काही शंका उरली नाही आणि सर्वांनी तसा निर्वाळा पण दिला.

“आता दूसरा टप्पा म्हणजे तुम्हा सर्वांची संमती पत्र. मी तसे पेपर करून या जयसिंग कडे देतो, त्यावर आपापल्या नावासमोर सह्या करून माझ्याकडे पाठवा.” – अमृतलाल.

सर्वांनी होकार भरला पण पुन्हा अप्पासाहेब बोलले,

“आम्ही जरी सह्या दिल्या तरी प्रशांतची सही आवश्यक आहे, त्याकरता तुम्हाला प्रशांतशी बोललवं लागेल.” – अप्पासाहेब.

“अप्पासाहेब, अप्पासाहेब, तुम्ही कशाला काळजी करता? तो आमच्या व्यवसायाचाच भाग आहे. रोजच आम्ही या सगळ्यातून जात असतो. तुम्ही निश्चिंत रहा. प्रशांतची सही घेतल्याशिवाय कामाला सुरवात होऊच शकत नाही. पण जर तुम्ही सर्वांनी सह्या केल्या तर प्रशांतला होकार द्यावाच लागेल. तसा कायदाच आहे. तसंही त्यांना काही ऑफर हवी असेल, तर ती द्यायला सुद्धा मी तयार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका.” – अमृतलाल.

सर्वांचं समाधान झालं. अमृतलालने पाठवलेल्या संमती पत्रा वर सर्वांनी सह्या केल्या. मग अमृतलाल ने एक मसुदा पाठवला. त्यात ज्यांनी सह्या केल्या, ते अधिकृत भाडेकरू आहेत असं शपथ पत्र सही करून द्यायचं होतं. सर्वांनी ते ही करून पाठवलं. आता सर्व जण काम केंव्हा सुरू होतं यांची वाट पहात बसले. ही गोष्ट आहे जून २००२ ची.

क्रमश:......

दिलीप भिडे