Anamat in Marathi Drama by Likhasa books and stories PDF | अनामत - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

अनामत - भाग 4

भाग ४

सकाळची कोवळी किरणं बाल्कनीतून हॉलमध्ये पसरली होती.

बाळाची नुकतीच छान झोप झाली होती. त्याला मऊ गादीच्या पाळण्यात उन्हाची झळ थेट लागणार नाही अशा जागी ठेवलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर सकाळच्या प्रकाशाची सोनेरी छटा पडली होती.

पाळण्यात पडून पडून आता त्याचे छोटे छोटे पाय मात्र सायकल चालवल्यासारखे सुरू झाले होते. कधी पाय वर उचलायचे, कधी हातांची बोटं उघडझाप करायची, तर कधी स्वतःच्याच हालचालींनी तो दचकून थांबायचा.

त्याच्या शेजारी देवर्षय खाली बसला होता.


शिवांश ड्युटीसाठी तयार होऊन हॉलमध्ये आला, तेव्हा घरात सगळ्यांची सकाळची लगबग सुरू होती. खिडकीतून येणारा कोवळा प्रकाश हॉलमध्ये पसरला होता. पाळण्यात पहुडलेलं बाळ मात्र स्वतःच्याच विश्वात रमलं होतं. कधी पाय वर उचलत होतं, तर कधी छोटीशी मूठ उघडबंद करत होतं.

देवर्षय त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे लक्ष ठेवून होता.

शिवांशने घड्याळात वेळ पाहिली आणि मग पाळण्यातल्या बाळाकडे नजर वळवली.

तो पाळण्याजवळ गेला.

"ह्या साहेबांचं बरंय..."

त्याने कमरेवर दोन्ही हात ठेवत बाळाकडे पाहिलं.

"मस्त झोपायचं आणि भूक लागली की घर डोक्यावर घ्यायचं!"

त्याच्या बोलण्यावर शैलजा आणि सुषमा हसायला लागल्या. 

"तू पण असाच होतास शिव. सगळी लहान बाळं असंच करतात."

आईचं बोलणं ऐकून शिवांशला हसू आलं. त्याने वाकून बाळाला अलगद उचलून घेतलं. एका हाताने त्याच्या डोक्याला आधार दिला आणि दुसऱ्या हाताने त्याला छातीशी धरलं. बाळ त्याच्या कुशीत शांत झालं. शिवांशने त्याच्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहिलं. मग कपाळाजवळ ओठ टेकवून तो गंभीर आवाजात म्हणाला,

"पिल्लू, मी ड्युटीवर जाऊन येतो. मी आलो की आपण मस्ती करूयात."

बाळ त्याच्याकडे असं बघत होतं जसं त्याला बोललेलं सगळं कळतंय. त्याने बाळाच्या नाकाला स्वतःच्या नाकाने हलका स्पर्श केला.

"काका आणि आत्याबाईंना हरवायचं आपण."

"दादा!"

गार्गी लगेच फुगून म्हणाली.

"आत्याबाई काय? थांब पिल्लू, तू जरा मोठा होऊ दे. तुला दादाला काय म्हणायचं ते मी शिकवते."

"अप्पा, तात्या, अण्णा, नाना... किती छान छान नावं आहेत! त्यातलंच एक शिकवते मी त्याला."

शिवांशने बाळाला थोडं वर धरत त्याच्याकडे पाहिलं.

"ऐकलंस ना, पिल्लू? मोठं झाल्यावर स्वतःच ठरवायचं. कुणाचं ऐकायचं नाही."

त्यांचं बोलणं ऐकून श्रीजा हसत होती.

शिवांशने तिच्याकडे पाहिलं. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर त्याची नजर थोडा वेळ थांबली; त्याने बाळाला पुन्हा छातीशी घेतलं. मग बाळाला श्रीजाच्या हातात दिलं. तिच्याकडे पाहून नेहमीच्या शांत स्वरात म्हणाला,

"काळजी घे."

"हो. शिव फोन करा मध्ये नक्की."

त्याने मान हलवली आणि घराबाहेर पडला.


रात्री खोलीत शांतता होती.

दिवसभराच्या धावपळीनंतर घरातले सगळे आपापल्या खोलीत गेले होते. खोलीतल्या मंद दिव्याचा प्रकाश बेडवर पडला होता. शिवांश आणि श्रीजाच्या मध्ये बाळ पहुडलं होतं. शिवांश एका कोपरावर टेकून त्याच्याकडे बघत होता. बाळाच्या छोट्याशा हाताची बोटं त्याने अलगद आपल्या बोटांत घेतली. त्याची मूठ बंद झाली की तो थांबायचा; पुन्हा बोटं उघडली की त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं.

कधी तो बाळाच्या नाकाच्या टोकाला बोट लावायचा, तर कधी त्याच्या गालावरून हात फिरवायचा.

बाळही मधूनच त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहत होतं.

"काय बघतोयस एवढं?"

शिवांशने अगदी गंभीर आवाजात बाळाकडे पाहून विचारलं.

"माझी चौकशी चालू आहे का?"

शेजारी पडलेल्या श्रीजाला हसू आवरलं नाही.

श्रीजाने बाळाच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला. मग त्याच्या छोट्याशा पोटावरून अलगद हात फिरवत ती त्याच्याकडे पाहत राहिली.

"आज दिवसभर खूप मस्ती केलीय याने देव आणि गार्गीबरोबर. शिव मस्त हुंकार द्यायला लागलाय." ती म्हणाली.

"काकांना आणि आत्याबाईंना हरवायची तयारी करत असेल."

"तुम्ही गार्गीला खूप चिडवता."

"ती स्वतःच चिडते."

श्रीजा हसली. बाळाने तोंड उघडून मोठीशी जांभई दिली. त्याचे डोळे हळूहळू मिटू लागले. दोघांचंही लक्ष त्याच्याकडे गेलं.

"झोप येतेय बहुतेक," श्रीजा कुजबुजली.

ती सावकाश उठली. तिने बाळाला दोन्ही हातांनी अलगद उचलून छातीशी धरलं आणि पाळण्यात नेऊन ठेवलं. त्याच्या अंगावरची चादर नीट केली. डोक्यावरून हात फिरवत ती काही क्षण तिथेच उभी राहिली. बाळ शांत झाल्यावर तिने पाळण्याला अगदी हलकासा झोका दिला आणि मग मागे वळली.

शिवांश तिच्याकडेच पाहत होता.

"काय?"

तिने त्याची नजर पकडत विचारलं.

"काही नाही."

"मग असं काय बघताय?"

"बघू नये?"

त्याच्या शांत प्रश्नावर श्रीजाच्या गालांवर हलकी लाली उमटली. ती नजर चुकवत बेडवर येऊन पडली. तसं शिवांश तिच्याजवळ सरकला. त्याने तिचा हात हातात घेतला.

"श्री बाळ थोडं मोठं झाल्यावर काही महिन्यांनी तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस?"

श्रीजाच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला.

"म्हणजे?"

"म्हणजे जॉब करायचा आहे? की स्वतःचं काही स्टार्ट अप सुरू करायचं आहे?"

ती एका कुशीवर वळली.

"शिव मी आधी जॉब केला असता. अनुभव मिळाला असता. हॉटेल मॅनेजमेंट शिकताना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं हेच स्वप्न होतं."

"हं."

शिवांश लक्ष देऊन ऐकत होता.

"पण आता..." ती थोडी थांबली. "बाळ आहे. घर आहे. सगळं सांभाळून जमेल का, माहीत नाही."

"स्वप्न होतं का....  आता नाही का?"

त्याने अगदी सहज विचारलं.

श्रीजाने त्याच्याकडे पाहिलं.

"काय?"

"स्वतःचं स्टार्ट अप सुरू करायचं स्वप्न. ते अजून आहे ना?"

तिने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग मान हलवली.

"आहे."

"मग झालं तर."

शिवांशचा स्वर ठाम होता.

"आपण तुझा बिझिनेस सुरू करू."

श्रीजाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.

"आपण?"

"हो. तू एकटीने सगळं करायचं असं कुठे म्हटलंय?"

"पण त्यासाठी पैसे लागतील, जागा लागेल, माणसं लागतील. आणि मला अजून अनुभवही नाही."

"एकेक गोष्ट बघू."

तो तिच्याकडे थोडा वळला.

"आधी तुला नेमकं काय करायचं आहे ते ठरव. हॉटेल, कॅफे, केटरिंग, बेकरी... जे काही असेल ते. मग त्याचा खर्च, जागा, परवानग्या, सगळं बसून काढू. नोकरीचा अनुभव घ्यायचा असेल तर तोही घेता येईल. पण फक्त परिस्थितीमुळे तुझं स्वप्न बाजूला ठेवायचं नाही."

त्याच्या बोलण्याने श्रीजाच्या डोळ्यांत हळवेपणा नकळतच आला.

"तुम्ही इतक्या सहज बोलताय..."

"कारण मला त्यात काही अवघड वाटत नाही."

"तुम्हाला नाही वाटणार. पण माझ्यासाठी ते खूप मोठं आहे."

"मग मोठं काम समजून करू. अशक्य समजून नाही."

तो तिच्याकडे पाहत म्हणाला,

"आणि श्री, बाळाची जबाबदारी फक्त तुझी नाही."

शिवांशने आपली बोटं तिच्या बोटात गुंफली.

"तू आई झाली आहेस म्हणून तुझी बाकीची ओळख संपत नाही. तू श्रीजा आहेस. तुझी स्वप्नं आहेत, तुला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. ते सगळं तसंच राहणार."

तिच्या ओठांवर हसू आलं. ती त्याच्याकडे बघत राहिली.

"तुम्ही कधी कधी इतकं छान बोलता की..."

ती वाक्य पूर्ण न करता थांबली.

"की काय श्री?"

शिवांशने तिच्या बोटांवरची पकड किंचित घट्ट केली.

"की मला तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं."

त्याची नजर तिच्या नजरेत अडकली.

"मग ऐकत राहा."

"सगळा वेळ?"

"माझ्याकडे वेळ कमी असला तरीही तुझ्यासाठी काढता येईल."

शिवांशने तिला स्वतःजवळ ओढलं. अचानक जवळ आलेल्या त्याच्या स्पर्शाने श्रीजाचा श्वास क्षणभर अडखळला. ती त्याच्या छातीशी येऊन थांबली. त्याचा हात तिच्या पाठीवर स्थिरावला.

तो तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला. 

"तुझ्याशी सगळं बोलतो मी मनातलं श्री."

दोघांनाही एकमेकांच्या जवळ असण्याची सवय होती; पण काही क्षण असे असायचे, जेव्हा त्या सवयीच्या आत दडलेली ओढ अचानक अधिक तीव्र होऊन समोर यायची.

श्रीजाने त्याच्या टी-शर्टची घडी नकळत बोटांत धरली.

"काय झालं?" त्याने विचारलं.

"काही नाही."

"मग माझा टी-शर्ट का पकडलाय?"

तिने पटकन हात मागे घ्यायचा प्रयत्न केला; पण त्याने तिचा हात पकडून तिथेच थांबवला. त्याने हळूच तिच्या कपाळावर आलेली बट बाजूला केली. त्याची बोटं तिच्या गालाला स्पर्शून गेली, तेव्हा ती क्षणभर स्तब्ध झाली. श्रीजा स्वतःहून त्याच्या आणखी जवळ सरकली. तिच्या त्या छोट्याशा हालचालीने त्याच्या कंठाची झालेली हालचाल आणि नजरेतली ओढ तिच्या श्वासाची लय मात्र विसकळीत करून गेली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या गालाजवळ थांबून तो कुजबुजला,

"श्री..."

"हं?"

"तू अशी जवळ आलीस की मला बोलायचं काय होतं तेच विसरायला होतं."

तिच्या ओठांवर हसू उमटलं.

"पण आत्ताच तर तुम्ही खूप काही बोलत होतात."

"ते कामाचं होतं."

"आणि आता?"

तो तिच्या डोळ्यांत पाहत जड आवाजात म्हणाला,

"आता तू समोर आहेस."

श्रीजाने नजर खाली केली. शिवांशने तिची हनुवटी अलगद वर केली. त्यांच्यातलं अंतर कमी होत गेलं. तिने डोळे मिटण्याआधी त्याच्या शर्टला धरलेली मूठ थोडी घट्ट केली.

शिवांशने तिच्या केसांतून हात फिरवला. तिने चेहरा वर करून त्याच्याकडे बघितलं.

"काय झालं?" तिने विचारलं.

"काही नाही."

"मग असे का बघताय?"

"तुला बघतोय."

त्याच्या उत्तरावर ती हसली आणि त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे सरकवण्याचा प्रयत्न केला.

"श्री तू मुद्दाम माझ्यापासून दूर जायचा प्रयत्न करतेस."

"मी कुठे दूर जातेय?"

"आत्ताच तर मला दूर ढकलत होतीस."

"कारण तुम्ही....."

तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शिवांशने तिचा हात हातात घेतला आणि तिला अलगद मागे सरकवलं. तिची पाठ बेडला टेकली. तो तिच्या जवळ झुकला, एका हाताचा आधार तिच्या बाजूला घेत दुसरा हात तिच्या गालाजवळ थांबवला. श्रीजा त्याच्याकडे पाहत राहिली.

त्यांच्यातलं अंतर अचानक खूप कमी झालं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू संकोचात बदललं, पण त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवायची तिची इच्छा होत नव्हती.

"आता कुठे जाणार आहेस?" त्याने हळू आवाजात विचारलं.

"तुम्ही स्वतःच इतक्या जवळ आलात आणि वर मलाच विचारताय."

शिवांशच्या ओठांवर हसू उमटलं. तो आणखी किंचित झुकला; पण तिच्या डोळ्यांत पाहत थांबला. श्रीजाने त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले, तसं त्याने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं.

"श्री..." त्याचा आवाज आता आणखीन जड झाला होता.

"हं..."

"तुला कल्पना आहे का, तू अशी जवळ आलीस की मी माझा राहत नाही."

तिच्या गालांवर लाली पसरली. तरीही तिने त्याच्या डोळ्यांत पाहत हळूच विचारलं,

"मग मी दूर जाऊ?"

"अजिबात नाही."

त्याचं उत्तर इतकं तत्पर होतं की ती हसू आवरू शकली नाही.

तिच्या खोडकर हसण्यावर तोही हसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पुढच्याच क्षणी तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर त्याने आपले ओठ टेकवले.  तिच्या प्रश्नाचं उत्तर शब्दांपेक्षा स्पर्शातून देणंच त्याला जास्त सोपं होतं.


To be continued......

                          ********************