Rudra: The Dark Redemption... ? in Marathi Love Stories by trupti mohite books and stories PDF | रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 3

Featured Books
Categories
Share

रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 3



त्या अंधाऱ्या खोलीत वेळ जणू गोठून गेला होता... खिडकीच्या लोखंडी गजांमधून बाहेर पडणाऱ्या पावसाचा एकसारखा येणारा आवाज आणि अधूनमधून होणारा विजेचा कडकडाट , एवढंच काय ते त्या शांततेचा भंग करत होतं...

काव्या जमिनीवर तशीच गुंडाळी करून बसून होती.. थंडीने तिचं शरीर गारठलं होतं , पण त्याहून अधिक तिच्या मनातील भीती तिला पोखरत होती.. ती सतत तिच्या काकांचा—इन्स्पेक्टर सावंत यांचा विचार करत होती...रुद्रने दिलेल्या धमकीने तिचे अवसान गळाले होते...

हा माणूस जे बोलतो , ते करू शकतो , याची तिला पूर्ण खात्री पटली होती...


तिने अंधारातच चाचपडत स्वतःला सावरले आणि ती उभी राहिली... एक फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तिला संकटात डोकं शांत ठेवण्याची सवय होती.. तिने खोलीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली...खोली खूप मोठी होती.. जुनाट लाकडी फर्निचर , एक मोठा पलंग आणि भिंतीवर लागलेले काही जुने , धूळ खात पडलेले फोटो...

ती हळूच खिडकीजवळ गेली.. खाली पाहिले तर थेट खोल दरी आणि खाली वाहणारा पाण्याचा प्रवाह दिसत होता...

हा महाल मुंबईच्या वेशीवर असलेल्या एखाद्या दुर्गम टेकडीवर असावा , असा तिने अंदाज लावला... तिथून उडी मारून पळणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे होते...


अचानक , खोलीच्या दरवाजाचा मुख्य लॉक उघडल्याचा मोठा आवाज झाला.. काव्या दचकून मागे सरकली आणि पलंगाच्या कोपऱ्यात उभी राहिली..


दरवाजा उघडला आणि खोलीत बाहेरचा पिवळा प्रकाश पडला.. दोन धिप्पाड शरीरयष्टीचे रक्षक आत आले...त्यांच्या हातात जेवणाचे ताट होते...त्यांनी ते ताट तिथल्या टेबलवर ठेवले...

त्यांच्या मागे अंगावर नाइट पॅन्ट आणि सैल टीशर्ट घातलेला रुद्र चालत आत आला...

त्याच्या डाव्या हातावर काव्याने बांधलेली पट्टी स्पष्ट दिसत होती.. त्याच्या एका हातात सिगारेट होती , ज्याचा धूर तो शांतपणे हवेत सोडत होता..


त्याच्या उपस्थितीने खोलीतील हवेचा दाब अचानक वाढल्यासारखा काव्याला जाणवला..


जेवून घे.. रुद्रने सिगारेटचा धूर सोडत टेबलकडे न पाहता अत्यंत शांत आवाजात हुकूम सोडला..


काव्याने त्या जेवणाच्या ताटाकडे पाहिले आणि नंतर रुद्रच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली

मला तुमच्या घरचं अन्न नकोय.. मला आत्ताच्या आत्ता सोडणार आहात की नाही..?


रुद्रच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटले नाहीत... त्याने सिगारेटचा एक मोठा झुरका घेतला आणि तो हळूहळू काव्याच्या दिशेने चालत आला...

त्याचे प्रत्येक पाऊल काव्याच्या हृदयाची धडधड वाढवत होतं...तो तिच्या अगदी जवळ येऊन थांबला.. त्याची उंची आणि त्याचा रुबाब काव्याला भीतीची जाणीव करून देत होता...


मी तुला विचारलं नाहीये , काव्या... मी तुला आदेश दिला आहे.. रुद्रचा आवाज खोल आणि कंप पावणारा होता...

माझ्या घरात माझ्या नियमांच्या बाहेर काहीही होत नाही... आणि पहिला नियम हा आहे की , मी जे सांगतो ते मुकाट्याने करायचं...


मी तुमच्या टोळीतली गुंड नाहीये ज्याच्यावर तुम्ही असा ओरडणार..! काव्याने हिंमत करून तिचा आवाज चढवला...

मी कायद्याची माणसू आहे...तुम्ही मला इथे डांबून ठेवून खूप मोठी चूक करताय... माझे काका आणि पूर्ण मुंबई पोलीस दल माझा शोध घेत असेल...
काव्याचे हे बोलणे ऐकून रुद्रच्या ओठांवर एक अत्यंत क्रूर आणि थंड हसू उमटले...

तो तिच्या आणखी एक पाऊल जवळ आला , इतका जवळ की काव्याला त्याच्या शर्टावरून येणारा महागड्या अत्तराचा तीव्र वास आला...

रुद्रने त्याचा उजवा हात पुढे केला आणि काव्याची हनुवटी आपल्या बोटांच्या घट्ट पक्कडीत पकडली.. त्याची पकड इतकी जोरात होती की काव्याच्या डोळ्यात वेदनेमुळे पाणी आले..


कायद्याची माणसू..? रुद्रने तिच्या जखम झालेल्या हनुवटीला थोडे वर उचलत म्हटले..
ज्या कायद्याचा तू अभिमान बाळगतेस ना , तो कायदा माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर संपतो.. या चार भिंतींच्या आत कायदा फक्त एकच आहे... आणि तो म्हणजे मी..
तुझे काका तुझा शोध घेतायत..? त्यांना सांग , आधी त्यांनी स्वतःचा जीव वाचवावा.. कारण राघव शेट्टीचे गुंड त्यांच्या पाळतीवर आहेत... जर मला वाटलं की तुझ्या काकांमुळे माझ्या धंद्याला धोका निर्माण होतोय , तर त्यांचा गेम वाजवायला मला एक सेकंदही लागणार नाही...

काव्याने त्याच्या पकडीतून स्वतःची हनुवटी सोडवण्याचा प्रयत्न केला , पण रुद्रची पकड लोखंडासारखी घट्ट होती...

तुम्ही एक नराधम आहात...राक्षस आहात तुम्ही...ती रागाने फत्कालली...

राक्षस...? रुद्रने तिची हनुवटी सोडली आणि तिचा चेहरा बाजूला फेकला...अजून तू माझा राक्षसी अवतार पाहिलेलाच नाहीस ,
डॉक्टरीण बाई... हा तर फक्त माझा संयम आहे..
जेवण गुपचूप संपव , नाहीतर तुला उपाशी मारण्याची मला अजिबात हौस नाही , पण जबरदस्तीने कसं भरवायचं हे मला चांगलं ठाऊक आहे...
रुद्र मागे वळला आणि खोलीबाहेर निघून गेला..


तो जाताच दरवाजा पुन्हा एकदा बाहेरून बंद झाला.. काव्या तिथेच हताश होऊन बसली.. तिच्या मनात प्रचंड राग आणि असहाय्यता दाटून आली होती.. तिने टेबलवरचे ताट पाहिले... जरी तिला जेवणाची इच्छा नव्हती , तरी तिला समजले होते की जर तिला इथून पळायचे असेल किंवा स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर शरीरात ताकद असणे गरजेचे आहे.. तिने रडत रडत जेवणाचे दोन घास पोटात ढकलले...


***************************************

रात्रीचे जवळजवळ चार वाजले असावेत... महालात पूर्णपणे शांतता होती... काव्या पलंगावर पडून जागीच होती... तिचे डोळे छताकडे लागले होते..

अचानक तिला महालाच्या खालच्या मजल्यावरून कोणाचातरी मोठा ओरडण्याचा आणि मारहाण करण्याचा आवाज आला...

कोणाच्यातरी विव्हळण्याचा आणि दया मागण्याचा तो आवाज होता..


काव्याचे कान टवकारले... तिने हळूच पलंगावरून उठून दरवाजाजवळ धाव घेतली...दरवाजा बाहेरून लॉक होता , पण खालून येणारे आवाज दरवाजाच्या फटीतून स्पष्ट ऐकू येत होते...


भाई..! मला माफ करा..! माझ्याकडून चूक झाली भाई..! मला सोडून द्या..! एक माणूस रडत , गयावया करत ओरडत होता...


त्यानंतर रुद्रचा अत्यंत थंड , पण तितकाच भयानक आवाज आला...

तुला मी माझ्या भावासारखं ठेवलं होतं , जगदाळे.. माझ्या प्रत्येक धंद्याची माहिती तुझ्याकडे होती... आणि तू... तू चंदनासारख्या पैशांसाठी राघव शेट्टीला माझी माहिती विकलीस..? माझ्या जखमेची खबर त्याला दिलीस..?


भाई , माझ्या कुटुंबाला त्यांनी ओलीस ठेवलं होतं..! माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता भाई...! तो माणूस रडत सांगत होता...

पर्याय नेहमी असतो... तू फितुरीचा पर्याय निवडलास.. रुद्रचा आवाज निर्विकार होता...
माझ्या जगात चुकांना माफी असते... फितुरीला नाही..
त्यानंतर एक मोठा गोळीबाराचा आवाज झाला

धाडक...!

त्या आवाजाने संपूर्ण महाल हादरला...काव्याने दचकून स्वतःच्या तोंडावर हात ठेवला... तिचे डोळे भीतीने मोठे झाले... रुद्रने आत्ताच एका माणसाचा खून केला  होता तेही अत्यंत थंड डोक्याने...

तिच्या अंगावर काटा आला... तिला समजले की या माणसाच्या मनात कोणासाठीही , अगदी त्याच्या जुन्या सहकाऱ्यासाठीही दया नव्हती...


काही मिनिटांनंतर , महालात पुन्हा शांतता पसरली... पण काव्याच्या हृदयाचे ठोके थांबत नव्हते... ती तशीच दरवाजाला पाठ लावून जमिनीवर सरकली...


तितक्यात , तिच्या खोलीच्या दरवाजाची कडी पुन्हा फिरली.. तशी काव्या पटकन उभी राहिली आणि मागे सरकली... तसा दरवाजा उघडला..


समोर रुद्र उभा होता... त्याच्या पांढऱ्या शर्टावर आता रक्ताचे काही ताजे शिंतोडे उडाले होते... त्याच्या उजव्या हातात एक काळी पिस्तूल होती , ज्याच्या नळीतून अजूनही बारीक धूर निघत होता.. त्याचे डोळे पूर्णपणे रक्ताळलेले आणि हिंसक दिसत होते.. तो आत्ताच एकाचा जीव घेऊन आला होता , पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा एकही लवलेश नव्हता...


तो खोलीत आला आणि त्याने पिस्तूल तिथल्या टेबलवर ठेवली.. तो काव्याकडे न पाहता खोलीतल्या सोफ्यावर जाऊन बसला आणि त्याने त्याचे डोळे मिटले...


काव्या भिंतीला खिळून उभी होती... तिची नजर टेबलवर ठेवलेल्या पिस्तूलकडे गेली... पिस्तूल तिच्यापासून अवघ्या पाच पावलांवर होती... रुद्रने डोळे मिटले होते , कदाचित तो थकलेला होता...


काव्याच्या मनात विचार आला—हीच ती वेळ आहे... जर मी ही पिस्तूल घेतली , तर मी या राक्षसाचा अंत करू शकते आणि इथून पळू शकते...


तिने अत्यंत हळूवारपणे , आपले पाऊल न वाजवता टेबलच्या दिशेने सरकण्यास सुरुवात केली... तिचे डोळे रुद्रवर खिळले होते , जो शांत बसला होता... तिने हात पुढे केला आणि पिस्तूलच्या हँडलला स्पर्श केला.. तिच्या बोटांना धातूचा थंड स्पर्श जाणवला.. तिने पिस्तूल उचलली आणि थेट रुद्रच्या दिशेने रोखली..
तिचे हात थरथरत होते , पण तिच्या डोळ्यात तिच्या काकांच्या सुरक्षेची आणि स्वतःच्या स्वातंत्र्याची धग होती...


उठ जागचा...! डोळे उघड..! काव्या मोठ्याने ओरडली तिचा आवाज भीतीने आणि रागाने कापत होता...


तसे रुद्रने हळूच आपले डोळे उघडले...समोर स्वतःवर रोखलेली पिस्तूल पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर ना भीती दिसली , ना आश्‍चर्य...

तो अत्यंत शांतपणे सोफ्यावरून उठला... आणि काव्याच्या दिशेने सरळ चालत येऊ लागला...


तिथेच थांब..! पुढे आलास तर मी गोळी झाडेन..! मी खरंच गोळी झाडेन..! काव्या ओरडली , तिने पिस्तूल लोड करण्याचा प्रयत्न केला...


पण रुद्र काही थांबला नाही... तो तिच्या अगदी जवळ आला , इतका जवळ की पिस्तूलची नळी थेट त्याच्या छातीवर त्याच्या हृदयाच्या अगदी वर टेकली...

त्याने काव्याच्या डोळ्यात पाहिले.. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच , गडद खेळ सुरू होता...


गोळी झाडणं एवढं सोपं नसतं..., काव्या..,रुद्र अत्यंत शांत , पण थरकाप उडवणाऱ्या आवाजात म्हणाला..


क्राश सीनवर रक्ताचे ठसे तपासणं वेगळं असतं... आणि स्वतःच्या हाताने कोणाच्या तरी छातीचा थरकाप उडवून रक्ताच्या नद्या वाहणं वेगळं असतं... तुझ्यात ती हिंमत नाही...


माझी परीक्षा घेऊ नका...तुम्ही एक गुन्हेगार आहात , तुम्हाला मारून मी कायद्याचंच काम करेन...काव्याने तिचे दात ओठ खाऊन म्हटले , तिच्या बोटाने ट्रिगरवर दाब वाढवला...


रुद्रने अचानक त्याचा मोठा हात पुढे केला आणि काव्याचा पिस्तूल धरलेला हात अत्यंत क्रूरपणे पिरगळला...

काव्याच्या तोंडातून एक किंचाळी निघाली आणि पिस्तूल तिच्या हातातून सुटून जमिनीवर पडली.. रुद्रने एका झटक्यात तिला भिंतीवर दाबले... त्याचे दोन्ही हात तिच्या डोक्याच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर होते , ज्यामुळे ती पूर्णपणे त्याच्या विळख्यात अडकली होती..


त्यांचे चेहरे एकमेकांपासून अवघ्या काही इंचांवर होते.. रुद्रच्या डोळ्यात काव्याबद्दल कोणतेही प्रेम किंवा आकर्षण नव्हते..तिथे फक्त एक भयंकर , हिंसक ताबा घेण्याची नशा आणि राग होता...


पुन्हा कधीही... माझ्याच घरात माझ्यावर हत्यार उगारण्याची चूक करू नकोस.. रुद्र तिच्या कानाजवळ येऊन अत्यंत खालच्या पट्टीत , पण जड आवाजात म्हणाला...


मी तुला इथे जिवंत ठेवलंय , याचा अर्थ असा नाही की मी तुझा आदर करतोय... तू फक्त माझी एक कैदी आहेस.. आणि कैद्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावं...
त्याने तिला तिथेच सोडले , जमिनीवर पडलेली पिस्तूल उचलली आणि तो खोलीबाहेर निघून गेला...


दरवाजा पुन्हा एकदा जोरात बंद झाला... तशी काव्या भिंतीला टेकून खाली कोसळली..तिच्या हाताला रुद्रने पिरगळल्यामुळे तीव्र वेदना होत होत्या , पण त्याहून अधिक वेदना तिच्या स्वाभिमानाला झाल्या होत्या...

ती समजून चुकली होती की , रुद्रच्या या काळोख्या जगात जगण्यासाठी तिला तिच्या कायद्याच्या पुस्तकांपेक्षा काहीतरी वेगळे आणि अधिक धोकादायक बनावे लागणार होते...!!


To be continue... 😊

पुढील भागासाठी मला फॉलो करा 👍