Nishad Parva - Part 6 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | निषाद पर्व - भाग 6

Featured Books
Categories
Share

निषाद पर्व - भाग 6

             निषाद पर्व -भाग ६

"अर्जुना, पूर्व स्मृतिंनी मीआजही इतके व्यथित व्हावे याचे आश्चर्य तुझ्या मुखावर दिसत आहे. अरे, क्रीडेखातर केवळ करमणूक वा मनोरंजनाच्या हेतूने मृगयेच्या नावाखाली निष्पाप पशुपक्षांची निघृणहत्या...कत्तल करून धर्म कृत्याच्या साफल्य प्राप्तीचा आनंद मानणारे तुम्ही शासक... गुरू द्रोणांचे शिष्यत्व पत्करण्याची इच्छा वनचर निषादाने बाळगावी हेच मुळी तुमच्या लेखी औध्दत्यठरते.अर्जुना... अगुंष्ठ छेदामुळेही झाले नाही एवढे दारुण दुःख द्रोणांनी मला नाकारल्यामुळे झाले. त्यावेळी तुम्हीराजपुत्रांनी परस्परांना नेत्रपल्लव्या करीत केलेली कुत्सित स्मिते आणि उपहासपूर्ण भाषणे...त्यांनी माझ्या काळजावर झालेल्या व्रणांची खपली काढताच आजही मी व्यथित झालो कारण अर्जुना... निषाद, वनचर असलो तरी त्यावेळी मी सुद्धा निषाद राज हिरण्यधनूचा पुत्र... तुम्हा सारखाच... राजपुत्रच नव्हतो का?"

"तुम्हा नगरजनांमध्ये नसेल एवढा मान-सन्मान माझ्या पित्याला केवळ तो राजा आहे म्हणून, निषाद प्रजाजन द्यायचे.आमच्या जमातीत एकदा का एखाद्याला राजा म्हणून निवडले की मग तो करील तसा आचार आणि तो इतरांना सांगेल ती संहिता असा मुळी रिवाजच असतो. दुष्काळाच्या परखडकाळात सुद्धा अन्न-अन्न करीत भटकणारे निषाद त्यांना महत्प्रयासाने मिळणारे एखादे रानफळ असीम राजनिष्ठेपायी स्वतःच्या मुखात टाकणाचा मोह त्यागून उरी फुटेतो धावतहयेऊन राजा असलेल्या माझ्या पित्याला द्यायचे; अन् केवळ एकच फळआणले म्हणून माझा पिता त्यांना निर्दयपणे झोडायचा. असे राजवैभव संचितात असलेला मी राजपुत्र अपमानाचे शल्य उरी खुपत असतानाही कसा काय जिवंत राहिलोयाचे कोडे मला अद्याप उलगडलेले नाही. अर्जुना, शब्दब्रह्माची घमेंड मिरविणारे तुम्ही नागर.. वाटेल ते शब्द वाटेल त्या अर्थानेवापरून तुमची पवित्र देववाणी किती विटाळता याची थोडी तरी कल्पना तुला असावी होती..."

"म्हणे धनुर्विद्या मला प्राणांहूनही प्रिय आहे...! किती व्यभिचारी शब्द योजना आहे रे तुझी! ऐन मोक्याच्या क्षणी धनुष्याला प्रत्यंचा चढविताना उडालेली तुझी त्रेधातिरपिट अजूनही माझ्याअंतःचक्षूसमोर स्पष्ट दिसत आहे. अर्जुना तुझ्या शब्दांमध्ये तिळमात्रजरी सत्याचा अंश असता तरी सारे बळ एकटवून शरसंधान केल्यामुळे शक्तिपात होऊन तू मुत्यू पत्कारला असतास; पण तुझा एक तरी 'तीर' शत्रूचे काळीज विंधूनच गेला असता. तुझ्या श्रद्धा आणि तुझ्या निष्ठा किती पोकळ अन् ढोंगी असतातहे मला आजच उमगले. अन् माझी क्षमा याचना करण्यासाठी तू उच्चारलेले शब्दही किती निरर्थक अन् कावेबाज आहेत रे!... म्हणे अजाणतेपणी घडलेला अपराध!! वा रे वा... धन्य रे तू अर्जुना!!! आधी समोरच्या व्यक्तीचा योजनापूर्ण उपहास करावयाचा अन् मागाहून माझे हे कृत्य अजाणतेने घडले म्हणत क्षमा याचनेचे सोंग करायचे, अर्जुना हा दांभिकपणा तुम्हा शासकांनाच खुलून दिसतो."

"माझ्या शरसंधानाचे वरपांगी कौतुक करून त्यातले मर्म माझ्याकडून ज्ञात करून घेण्यामागचा तुझा धूर्तहेतू...पार्था! मी पुरता ओळखला आहे रे! ते मर्म, इंगित जाणून घेऊन त्याचा उपयोग तुला झाला नाही.... म्हणजे तो होणारच नाही म्हणा...तरी तुझे उत्तराधिकार घेणारा तुझा वारसदार इतरांपेक्षा बलसंपन्न आणि वरचढ होण्यासाठीतरी खचितच व्हावा! हा तुझा सुप्त हेतू न ओळखण्या एवढा हा निषाद अज्ञ नाही. अर्जुना तुझ्या लेखी जरी मी शूद्र असलो तरी मी स्वतः तसे मानीत नाही. कदाचित माझा वर्णइतर वर्णियांच्या मालिकेत अंतिम स्थानावरही असेल, पण माझ्या मते चातुवर्णियांपेक्षा भिन्न असा माझा 'पाचवा' स्वतंत्र वर्णअसावा.तुला ज्ञात असणाऱ्या धर्मग्रंथामध्ये तसा उल्लेख नसावा, म्हणजे नसेलही, इतर कोणत्याआधारामध्ये तसा उल्लेख असला तरी त्याचे तुला कितपत ज्ञान असेल हा प्रश्नच आहे! पण आम्हा निषादांच्या दंतकथांमध्ये .... पारंपारिक गीतांमध्ये मात्र असे काही उल्लेख मी ऐकले आहेत. माझी अल्प विकसित बुद्धी आणि मर्यादित विश्व यांच्या आधारेअलीकडेच मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे."

"अर्जुना, तुझा धूर्त हेतू मला आकळला आहे.तरीही माझ्या शरसंधानामागचे रहस्य मी तुला खचितच कथन करीन. तुझ्या कुतूहल शमनासाठी नव्हे तर तुझा भ्रमनिरास करण्यासाठी! मी पूर्वी कथन केल्याप्रमाणे आम्हा निषादांचे जीवन मुळी तीर कामठ्याशी बद्ध असते. इतके की, तिरकामठ्याविना दिसेल तो खात्रीने निषाद नव्हे हे तू पक्के समज! आम्ही निषादांनी शतकानुशतके निष्ठेने सांभाळलेली ही परंपराच धनुर्विद्येतील अवघड रहस्ये आम्हापुढे उलगडीत जाते.धनुर्विद्याही श्रवण,पठणवा कथनाने अवगत होणारी शब्दविद्या नव्हे. ती शिकायची नसते की शिकवायचीही नसते. असीम अंतःप्रेरणेनेती प्रस्फुट झाल्यावर अगदी सहजपणे ज्ञानेंद्रियांमध्ये मुरते आणि मगच तिच्यावर प्रभुत्व मिळवायचे अन् टिकवायचेही असते. म्हणून धनुर्विद्येमध्ये आम्हानिषादांचा ना कुणी गुरु असतो की अंधानुकरण करणारे धनुर्विद्या पिपासू शिष्यगणही निषादांच्या वस्तीत जन्म घेत नसतात."

"अर्जुना, पंखात बळ आल्यावरमाता पित्यांपासून अलग होऊन स्वतंत्र राहणारे पाखरू सुगीच्या वेळी आपोआप गोड आलाप घेत सुंदर घरटे विणते. तद्वत हिंडू फिरु लागलेले निषादाचे पोर तिरकामठा घेऊन रानावनात हिंडू लागले की ते सहज प्रेरणेने त्याचा वापरही अवगत करते. अर्जुना! द्रोणांचे शिष्यत्व पत्करायला मी हस्तिनापुरी आलो तेव्हा माझ्या खांद्याला लटकावलेला ओबड-धोबड 'कामठा' अन् पाठीला वेलींच्या भात्यात अडकवलेले तीर...(क्रमश:)