स्टॅम्प पेपर
पात्र परिचय
प्रशांत. वाड्याचा मालक
विशाखा प्रशांतची बायको.
विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर
जयसिंग भाडेकरू.
मल्हार भाडेकरू.
अप्पासाहेब भाडेकरू.
विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा.
गणेश भाडेकरू
सुधाकर भाडेकरू
भाग 4
भाग 3 वरुन पुढे वाचा........
सर्वांचं समाधान झालं. अमृतलालने पाठवलेल्या संमती पत्रा वर सर्वांनी सह्या केल्या. मग अमृतलाल ने एक मसुदा पाठवला. त्यात ज्यांनी सह्या केल्या, ते अधिकृत भाडेकरू आहेत असं शपथ पत्र सही करून द्यायचं होतं. सर्वांनी ते ही करून पाठवलं. आता सर्व जण काम केंव्हा सुरू होतं यांची वाट पहात बसले. ही घटना होती २००२ च्या जुलै महिन्यातली.
मग एका मीटिंग मधे अमृतलालने बॉम्ब टाकला. तो म्हणाला,
“आता आमची मंडळी येतील आणि चाळ पाडायला सुरवात करतील. तुम्हाला सर्वांना आपापली सोय करायची आहे. साधारण तुमच्या हातात घर यायला अडीच ते तीन वर्ष लागतील. बिल्डिंग पुरी होई पर्यन्त, तुम्हाला सर्वांना आपापली सोय करायची आहे. तेंव्हा जितक्या लवकर तुम्ही जमीन खाली कराल तेवढ्या लवकर तुम्ही नवीन घरात जाऊ शकाल.” – अमृतलाल.
“या दोन अडीच वर्षांचं घरभाडं तुम्ही देणार न? म्हणजे तशीच पद्धत असते. म्हणून विचारलं.” – मल्हार.
“तशी पद्धत असते हे खरं आहे पण वरतून 20 लाख देण्याची पद्धत नसते. पण मी ते देणार आहे. तेंव्हा मी जर तुम्हाला इतके पैसे देणार आहे तर तुम्ही पण थोडी तडजोड करायला हवी. तसंही तुमच्यापैकी 16 लोकांकडे स्वत:चे फ्लॅट आहेत, तेंव्हा तुम्हाला भाडं द्यावं लागणार नाहीये.” – अमृतलाल.
थोडी शांतता आणि थोडी कुजबूज झाली पण सर्वांनी ही सत्य स्वीकारलं. डोळ्या समोर समोर चकाचक फ्लॅट आणि 20 लाख दिसत होते.
चाळकारींपैकी बऱ्याच लोकांचे स्वत:चे फ्लॅट होते. कोणाचे अंधेरी, वर्सोवा तर कोणाचे दहिसर मिरारोड येथे फ्लॅट्स होते. बाकीचे भाड्याच्या घरात राहायला गेले. संपूर्ण चाळ रिकामी होई पर्यन्त ५-६ महीने गेले. मग 2002 च्या दिवाळी नंतर कामाला सुरवात झाली. अमृतलालने सर्वात प्रथम बुलडोजर आणून चाळ पाडायला सुरवात केली. चाल जुनी होती, त्यामुळे लाकडाचा भरपूर वापर होता. जिना, गॅलरी चे कठडे आणि दरवाजे खिडक्या सर्व सागवानी लाकडाचे होते, ते बाजूला करून वेगळे ठेवले आणि एक दिवस फर्निचर वाले आणि सुतार यांना बोलावून विकून टाकले. चाळ पाडून सर्व मलबा ठिकठिकाणी पूर्ण जागेवर छोटे छोटे ढिगारे करून ठेवले.
चाळकरी अधून मधून येऊन बघत होते. आपलं घर पाडताना बघून वाईट वाटत होतं पण तेवढ्यापुरतच. हे सगळं होता होता 2003 वर्ष संपलं. चाळकऱ्यांना आता चुटपुट लागली होती. अमृतलालने दोन ते अडीच वर्ष लागतील म्हणाला होता, पण आता 2 वर्ष उलटून गेली होती आणि अजून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात पण झाली नव्हती. त्यांनी अमृतलालला भेटायचं ठरवलं. पण दोन ते तीन महीने अमृतलाल ला अजिबात फुरसत नव्हती. आणि काम पूर्ण पणे ठप्प पडलं होतं. आता चाळकरी गॅस वर आले. त्यांनी आपसात मीटिंग करायचं ठरवलं. पण आता सर्व पांगले होते आणि त्यामुळे सर्वांच्या वेळा जमून यायला दीड महिना लागला. 2004 च्या जून मध्ये सर्व एकदाचे आप्पासाहेबांच्या घरी जमले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता होती.
बरीच भवति न भवति झाल्यावर, अमृतलालच्या ऑफिस मध्ये त्याला न सांगता जायचं ठरवलं. अमृतलाल ऑफिस मध्येच होता आणि भेटला पण. त्यांच्या समोर सर्वांनी बांधकामाला अजून सुरवात झाली नसल्याबद्दल विचारणा केली.
“घराचे नकाशे बनवावे लागतात. ते बनवण्याचं काम सुरू आहे. ते झालं की मी स्वत: ते महापालिकेच्या टोवण प्लॅनिंग विभागात जाईन. नकाशे अप्रूव झाल्यावर लगेच कामाला सुरवात. चिंता करू नका.” – अमृतलाल.
“कधी पर्यन्त नकाशे बनून तयार होतील?” – मल्हार.
“अजून दोन एक महीने तरी लागतील.” – अमृतलाल.
“साध्या तीन खोल्यांचा नकाशा, त्याला इतका वेळ का लागावा.?” – मल्हार.
“असं नसतं ते. प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येकाला भरपूर उजेड आणि हवा मिळायला पाहिजे. वास्तु शास्त्रा प्रमाणे पुढचं दार दक्षिणेला नको. बेडरूम कुठे, किचन कुठे, बाथरूम कुठे यांच्या जागा निश्चित कराव्या लागतात. या सगळ्याला वेळ लागतो. पुन्हा ही 10 मजली टॉवर होणार आहेत, तर त्याचा पाया, कॉलम बिम चे काय माप असेल, त्यात किती लोखंडाच्या सळ्या लागतील यांचा सर्वांचा विचार करावा लागतो. शिवाय कॉँक्रीट कसं असणार आहे यांचा पण विचार करावा लागतो. हे सगळं करायला वेळ लागतो.” – अमृतलाल.
लोकांना त्याचं हे म्हणण पटलं. 2004 च्या नोवेंबर मधे सर्वांना पत्र मिळाली की त्यांनी 20 तारखेला दुपारी चार पर्यन्त अमृतलालच्या ऑफिस मध्ये जमावे. सर्वजण त्याप्रमाणे हजर झाले. अमृतलाल होताच. तो म्हणाला,
“महापालिकेच्या टाऊन प्लॅनिंग च्या कार्यालयाने एक सूचना दिली आहे. तुम्ही सर्वांनी एकाच संमती पत्रावर सह्या केल्या होत्या, त्या ऐवजी प्रत्येकाचे संमती पत्र कार्यालयाला हवे आहेत. मी सर्व पेपर तयार करून आणले आहेत, तुम्ही वाचून सह्या करा. ते मी उद्या जमा करेन. साधारण आठ एक दिवसांत अप्रूव्हल मिळेल आणि मग लगेच कामाला सुरवात करू.” – अमृतलाल.
सर्वांनी 50 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर सह्या केल्या.
एक महिन्यांनंतर मल्हारने एका रविवारी चक्कर टाकली, सर्व जैसे थे होतं. काहीच प्रगती नव्हती. जयसंगच घर काही पाडलं नव्हतं त्यामुळे तो तिथेच होता. त्याने मल्हारला सांगितलं की कार्यालयाकडून उशीर होतो आहे. नकाशा मधे काही न काही दुरुस्त्या सुचवतात आणि त्यामुळे उशीर होतो आहे.
“तुझं घर कसं पाडलं नाही?” – मल्हार.
“कोणी गुंड माणसं येऊन प्लॉट वर अतिक्रमण करू नये म्हणून अमृतलालने मला इथेच राहायला सांगितलं. तो मला 2000 रुपये पगार पण देतो आहे केअर टेकर म्हणून. आपल्याला काय? छानच झालं.” – जयसिंग
मल्हार परतला, पण त्यांच्या मनात पाल चुकचुकत होती. त्याने सर्वांना ऑफिस मधे फोन करून ही परिस्थिती सांगितली, आणि एकदा सर्व जमू आणि काय तो निर्णय घेऊ असं म्हणाला.
पुढच्याच रविवारी सर्व माल्हारच्या घरी जमले. जयसिंग, गणेश आणि सुधाकरला बोलावलं नव्हतं. आप्पासाहेबांनी त्याबद्दल विचारलं तर मल्हार म्हणाला,
“मला आता त्यांचा संशय यायला लागला आहे, तिघंही फारसे गंबहर दिसत नाहीत, त्यामुळे असं वाटतं की ते अमृतलाल ला सामील असावेत.” – मल्हार.
तसा त्यांच्या बद्दल शंका प्रत्येकालाच आली होती, पण कोणी बोलून दाखवलं नाही इतकंच. मग बैठकीत एकमताने असं ठरलं की प्रशांतला जाऊन भेटायचं आणि सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या. त्याने संमती दिली हॉट, तर आता काय राजकारण चाललं आहे ते विचारू.
“प्रशांत असं काही करेल असं वाटलं नव्हतं. पण शेवटी सर्व मालक सारखेच दिसताहेत. त्यांचेही पाय मातीचेच निघाले.” – विश्राम.
“नाही विश्राम मला नाही वाटत असं. पण काही तरी गोम आहे हे नक्की. प्रत्यक्ष जाऊन विचारल्या शिवाय आपल्याला खरं काय ते कळणार नाही. एकदम आरोप करू नकोस.” – अप्पासाहेब.
पुढच्या रविवारी म्हणजे २००५ च्या फेब्रुवारी महिन्यात सकाळी सर्व प्रशांत च्या घरी.
“अरे, या या आज सकाळी सकाळीच? सर्व ठीक आहे न? विशाखा आपले चाळकरी आले आहेत जरा चहा नाश्ता करायचं बघ.” – प्रशांत.
“अप्पासाहेब सांगून टाका इथे जीव टांगणीला लागला आहे.” – एक भाडेकरू.
“अरे बापरे! काय झालं तरी काय? अप्पासाहेब, जरा नीट सांगायला का?” – प्रशांत
“प्रशांत, तुझा तो बिल्डर, चार वर्षा पूर्वी त्याने आमची चाळ पुनर्विकासा साठी पाडली पण अजूनही कामाला सुरवात झालेली नाही. नुसती टोलवाटोलवीच चालली आहे. तू नीट चौकशी केली नव्हती का?” – अप्पासाहेब.
“माझा बिल्डर? विजय राघव? तुम्हीच त्याला नकार दिला होता. त्याने चाळ पाडली? आणि ते ही तुमच्या माझ्या संमती शिवाय? शक्यच नाही. तुमचं काही गैरसमज तर होत नाहीये न?” – प्रशांत.
“नाही विजय राघव नाही. अमृतलाल बिल्डर. तुझं संमती पत्र आणि त्यांच्याशी केलेला करार त्याने आम्हाला दाखवला.” – अप्पासाहेब.
“एक मिनिट, काही तरी चुकतंय. मी या अमृतलालला ओळखत सुद्धा नाही मग त्याच्या बरोबर करार करण्याचा प्रश्न येतोच कुठे. हा कोण अमृतलाल आहे?” – प्रशांत
“म्हणजे तू त्याला संमती दिली नाहीस?” - अप्पासाहेब.
“अप्पासाहेब, हा माणूस काला की गोरा ते ही मला माहीत नाही. आणि मी संमती दिली असं तुम्हाला कोणी सांगितल?” – प्रशांत.
“त्याने आम्हाला तुझं स्टॅम्प पेपर वर केलेलं संमती पत्र आणि करार पत्र दाखवलं. त्यावर तुझी सही पण आहे.” – अप्पासाहेब.
“आणि तुम्ही विश्वास ठेवला. एकदा मला विचारायचं सुद्धा तुमच्या मनात आलं नाही? किमान फोन तरी करायचा होता. त्या फ्रॉड माणसाने चाळ पाडली म्हणजे तुम्ही आता दुसरीकडे राहायला गेला असाल न? कमाल करता तुम्ही. इतके सगळे लोकं आणि थोडी थोडकी नव्हे तब्बल चार वर्षं मला कळवलं सुद्धा नाही. कोणी आणला कोणी हा बिल्डर? ” – प्रशांत.
प्रशांत असं म्हणाला आणि सर्वांना एकदमच हुडहुडी भरली. साफ नागवले गेल्याचं आता त्यांच्या लक्षात आलं.
“जयसिंग ने आणला. तो म्हणाला की तुझ्या बरोबर गोष्टी झाल्या आहेत आणि समाधान झाल्यावरच तू सही केली म्हणून.” – अप्पासाहेब.
“शेवटी त्याने डाव साधलाच. मला आधी पासूनच त्या संशय येत होता. आणि म्हणूनच त्याने मी, तुम्ही आणि बिल्डर अशी मीटिंग होऊ दिली नाही. मग आता?” – प्रशांत.
आता तूच कर काही तरी आणि आमची घरं आम्हाला परत मिळवून दे.” – सर्व एकसुरात
क्रमश:......
दिलीप भिडे