Ek Premkatha Ashihi in Marathi Love Stories by Adv Nikhil Deore books and stories PDF | एक प्रेमकथा अशीही.... - भाग 10

Featured Books
Categories
Share

एक प्रेमकथा अशीही.... - भाग 10

भाग 9 वरून पुढे 

' डुबा डुबा रहता हू आँखो मे तेरी दिवाना बन गया हू मै चाहत मे तेरी अब दिन गुजरते नही राते कटती नही ..' हॉस्टेलमध्ये सुरु असलेल्या कर्णकर्कश्य स्वरांनी अभिमन्यूची निद्रा भंग पावली. रूममध्ये मुलांचा एकच गोंधळ सुरु होता. सकाळी सकाळीच मुलांनी रूममध्ये दंगामस्ती करायला सुरवात केली होती. एकजण ओढणी अंगावर घेतल्यासारखी मुलींची नक्कल करीत होता. मुलांच्या दंगामस्तीचा जोरही भयंकर वाढत होता .खरंतर अभिमन्यूला अंथरुणातून उठायची जराही इच्छा होत नव्हती; परंतु त्याच्या निरागस  श्रुतीला आज तो  बघणार या कल्पनेने तो चांगलाच सुखावला होता आणी तेच नाव त्याला अंथरुणातून उठवण्यास पुरेसे होते.
💕💕 प्रेम ही भावनाच मुळी जरा वेगळी आहे .एक अमूर्त अशी संकल्पना.. ज्या संकल्पनेच्या विश्वात एकदा जर कुणी वाहवत गेल तर तो त्या संकल्पनेच्या विश्वात  किती ओतप्रोत होईल हे कुणीही सांगू शकत नाही. 💕💕
मनाच्या रम्य पहाटेत भावनेच्या टवटवीत पर्णरंधावर साचलेलं हलकंस दव म्हणजे प्रेम..
मनातील तुटलेल्या वीणाच्या तारा म्हणजे प्रेम...
कुणालातरी एक क्षण पाहण्यासाठी सदैव प्रतिक्षीत  असणारे नेत्र म्हणजे प्रेम..
एका होकारासाठी दुःखाच्या वाळवंटात प्रदीर्घ प्रवास करणार अधीर मन म्हणजेही प्रेम....

अभिमन्यूने अगदी पहाटेच उठून सर्वकाही आवरायला सुरवात केली. पहाटेच्या गार गार वायुलहरी त्याच्या शरीराला बोचरा स्पर्श करीत होत्या. सोबत त्याच्या केसालाही हिंदोळत होत्या. जणू त्या ही त्याला खट्याळपणे विचारत असाव्या 
" आज भेटणार आहेस वाटते तिला". अभिमन्यूच्या मनात आठवणींचा महावटवृक्ष बहरला होता...ज्या आठवणींच्या झुपक्यात श्रुतीच अस्तित्वच सर्वोतपरी होत. अभिमन्यूच्या मनावर आनंदाची अमृतवर्षा होत होती. पहाटेच अगदी सर्वकाही आवरून तो ज्ञानभारती विद्यालयात आपलं भूतकाळात हरवलेलं पहिलं प्रेम श्रुती हिला  पाहायला निघाला. मनात अगणित आशेचे किरण निर्माण झाले होते पण त्या किरणातही आशेपेक्षा अनुत्तरित प्रश्नच अधिक लपले  होते.  पांढरा शर्ट त्यावर काळा पॅन्ट , जेल लावून उभे केलेले केस, कपड्यावर मारलेला हलकासा  mild perfume असा त्याचा पेहराव होता. 
" एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालास रे ? आपलं   कॉलेज सुरु व्हायला  तर फार उशीर आहे अजून ?" अनिकेतच्या प्रश्नाने अभिमन्यूचे डोळे मोठे झाले. 
" कुठे नाही रे... जरा काम होत मला माझ्या मित्राकडे " जरासा गोंधळून अभिमन्यू म्हणाला.आपली चोरी नक्कीच पकडली आहे हे त्याच्याही लक्षात यायला फार  वेळ लागला नाही.    
" एवढं नटून थटून पण " खट्याळपणे मजा घेत वरुण म्हणाला. 
सध्यातरी वरुणसोबत बोलण्यात काहीच अर्थ नाही आपण फक्त आपल्या मार्गाकडे लक्ष्य केंद्रित कराव म्हणून अभिमन्यू तेथून जायला निघाला. 
' मला माहित आहे मित्रा तू कुठे जात आहेस...भूतकाळाच्या आठवणींच्या गळद काळ्या ढगाआड लपलेल्या चंद्राला तू शोधत आहेस. ज्याचं खरंच अस्तित्व आहे का नाही हे ही तुला माहित नाही .ज्या प्रेमाला तू शोधत आहेस ते प्रेम तुझ्या समोरच आहे फक्त तू डोळे उघडे करून बघ रे .शेवटी एवढंच म्हणेल  देव तुला सद्बुद्धी देवो ' अनिकेत स्वतःशीच म्हणाला.

ज्ञानभारती महाविद्यालय त्यांच्या  कॉलेज समोरच असल्यामुळे अभिमन्यू बेधुंद होऊन आपल्या कॉलेज मधून मार्गक्रमण करीत ज्ञानभारती महाविद्यालयाकडे सपासप पाऊले टाकत चालला होता. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे रस्ता ओलाचिंब झाला होता. काहीसे धुकेही पडले होते ज्यामुळे समोरचा रस्ता पाहायला जरा जास्तच त्रास होत होता. कॉलेजमधील मोकळ्या जागेवर रानझुडपे फोफावून उगवले होते आणी त्या रानझुडपावर जांभळ्या रंगाची मनोहर  फुले उमलली होती. त्या पुष्पांच सुंदर रूप पाहून आधार घेत वाढलेल्या जास्वंदाच्या  वेलीने  गाल फुगवून सर्वत्र लालगुंजार जास्वंदाची  पुष्पे उधळली  असावी असंच काहीस  मनोवेधक दृश्य ते भासत होत. 
' किती वेगळे असतात ना हे धुके एकदा जर त्यांनी कुठली जागा व्यापून घेतली तर मनुष्याची कितीही तीक्ष्ण ,स्पष्ट दृष्टी असली तरीही समोरच पाहण्यास तो  असमर्थ ठरतो. 

क्रमश....