Nishad Parva - Part 9 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | निषाद पर्व - भाग 9

Featured Books
Categories
Share

निषाद पर्व - भाग 9

             निषाद पर्व भाग ९

 

           साक्षात योगेश्वराच्या मुखी शोभावी अशी शब्दकळा आणि त्याने दाखविलेल्या विश्वरूप दर्शनाची उपमा सार्थ ठरावी असे शरसंधान कौशल्य यामुळे पार्थ भारावून गेला. त्याचे मस्तक आदराने झुकले.आवाजात अतीव मार्दव आणीत तो म्हणाला,"निषादराज, हा इंद्रप्रस्थाचा सत्ताधारी, नरपुंगव, वीरशिरोमणी, श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्णाचा परमभक्त पार्थ तुमच्यापुढे नतमस्तक झाला आहे. आपण उदारमनस्क असून पूर्णप्रतापी सूर्यासमान स्वयंप्रकाशी असून वेद वाणीच्या तोडीचे माधुर्य अन् आशय तुमच्या वाणीमध्ये आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचे हे नव्याने दर्शन झाल्यामुळे माझे अष्ट सात्विक भाव जागृत झालेआहेत. मी आपणावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे यास्तव आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.मात्र तत्पूर्वी या दासाची एक नम्र विनंती आहे. मलाआयुष्यभर कर्तव्याभिमुख करुन माझा शौर्य स्फुल्लिंग सतत जागृत ठेवणाऱ्या कृष्णाचामी ऋणी आहे. म्हणूनच अंत्यसमयी त्यांनी माझ्यावर विश्वासाने सोपविलेले एक अवघड कार्य पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य ठरते."

            आपल्या कथनाचा इष्ट परिणाम निषादावर होतो आहे अथवा नाही याचाअंदाज घेण्यासाठी अर्जुन किंचित विराम घेऊन एकलव्याच्या मुखावरील भाव अवलोकन करू लागला. त्याच्या निर्विकार मुद्रेवरून अर्जुनाला काहीच अंदाज घेता येईना. "निषादराज,साक्षात श्रीकृष्णांनी निर्धारित केलेले कार्य पूर्ण करण्यास मीअसमर्थ ठरलो असलो तरी काही विधिसंकेतानुसार आपण माझ्या सहाय्यार्थ आला आहात.काही घटिकांपूर्वी भरत वर्षामध्ये स्वतःच्या पराक्रमाने सुवर्णपान म्हणून जपावे असा इतिहास निर्माण केलेल्या पार्थावर कर्तव्यच्युतझाल्याचा जणू ठपकाच येऊ घातला होता. माझ्या समक्ष,माझ्या दौर्बल्याचा फायदा घेऊन यदूवंशियांची संपत्ती आणि नारीवर्गाचे अपहरण दस्यू लुटारू करू पाहत होते. त्यांना साधा प्रतिकारही मी करू शकलो नाही, हे लांच्छन माझ्या चरित्राला कायमचे चिकटले असते. परंतु तुम्ही मला या दारुण जनापवादापासून वाचविले आहे."

            "निषादराज, महाभारतयुद्ध पर्वाला आपल्या सहाय्याचा नवासर्ग,इतिहासकार, चरित्रकार यांना आता जोडावा लागेल.कृष्ण निर्वाणानंतरही कृष्ण कृपेचा साक्षात्कारच मला तुमच्यारूपाने झाला आहे. हे मी प्रांजळपणे कबूल करतो. आता क्षणाचाही विलंब न लावता दस्यूलुटारुंच्या ताब्यातील यादवांची संपत्ती आणि नारीजनांचे विमोचन करून,त्यांना शरचक्रा बाहेर काढून मजकडे सुपूर्द करून,हस्तिनापुरापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी,आपण आशीर्वाद द्यावेत यास्तव मी आपणांस वंदन करीत आहे."अर्जुनाचे हे कथन ऐकल्यावर एकलव्य नेत्रातून पाणी येइपर्यंत खदाखदा हसला. "अर्जुना, आपलाहेतू मोठ्या संभावितपणे दुसऱ्यांच्या गळी उतरून ईप्सित साध्य करण्यासाठीचे तुझे शब्द लाघव, धुरंधर मुत्सद्यालाही लाजविणारे आहे.माझ्या सामर्थ्यावर स्वतःचा हेतू साध्य करताना माझ्या इच्छाअनिच्छेची फिकिर तरी तू कां करावीस? तुझी उक्ती तुझ्या राजनीतीला शोभणारीच आहे."

          "मजसारख्या यःकश्चित निषादाला हस्तिनापुराच्या कुरू कुलभूषण सम्राटाने विनंतीपूर्वक सहाय्य करण्याची संधी द्यावी हे माझे जणू परमभाग्यच म्हणायला हवे! या पामराला अशी लोकोत्तर संधी देऊन त्याचे आयुष्य उजळून निघावे असा सन्मान जणू करीत आहोत असे भासवीत भ्रामक शब्दांचे बुडबुडे काढून माझ्या अंगी नसलेले गुणही मलाचिकटवून माझ्या सामर्थ्याच्या ढाली आड स्वतःचे अकर्तृत्व लपविणारी तुझी निर्लज्ज नीती, तुझी राजकारण पटुता सिद्ध करणारीच आहे.तुझ्या देदिप्यमान इतिहासातील एक काळेकुट्ट पर्व पुसून टाकून संभाव्य जनापवाद टाळण्यासाठी चाललेली तुझी धडपड आणि तुझा कावेबाज स्वार्थी हेतू,पार्था, माझ्या पूर्णपणे लक्षात आला आहे. एकदा का या दस्यु लुटारुंच्या कचाट्यातून सुटून तू सुरक्षितपणे राजप्रासादात जाऊन पोहोचलास की, कर्तव्यपालनाचे साफल्य आणि श्रेय तुला खचितच गवसणार आहे."

         "अर्जुना...! तुझेचरित्रकार उपमा उत्प्रेक्षांची उदार हस्ते उधळण करीत तुझ्या देदिप्यमान इतिहासालाकर्तव्य पालन पर्वाच्या सुवर्ण पानांची पुष्टी देतील. कदाचितया पर्वाला कृष्ण लीलेचे परिमाण देऊन तुझे दौर्बल्य आणि अकर्तृत्व हे कृष्णविरहाचे फलित असल्याचे सामान्य बुद्धीला पटणारे तर्कट रचून सत्य कथनाच्या आभासाने त्या पर्वाला एक वेगळीच झळाळी येईल. निषादाचे सहाय्य हेतर निमित्त मात्रच आहे! कुणी सांगावे? साक्षात कृष्ण परमात्म्यानेही तुझ्या सहाय्यार्थ निषादरूप धारण केले असेल, हे सत्य कुणीही स्वाकारील.अर्जुना! मला शब्दभ्रमाच्या जाळ्यात अडकवून विचार करण्याचा अवधीही न देता आपला हेतू साध्यकरण्याच्या गडबडीत अनवधानाने तुझी वृत्ती उघड व्हावी अशी एक चूक तू करून बसला आहेस."

            "अर्जुना,माझेशरसंधान आणि सामर्थ्य या बळावर स्वतःचे प्राक्तन बदलू पहात असतानाही केवळ स्वतःच्या श्रेयाचाच विचार करण्याचा मोह तुला टाळता आला नाही.यादव नारींची सुटका हे तुझे इप्सित नसून स्वतःचे दौर्बल्य,पराक्रम शून्यताहे न्यून झाकायचे, हेच तुझे इप्सित तू सरळ सरळ उघड करीत आहेस. तुझे कथन किती दुटप्पी आहे पहा बरे...! एकीकडे आपल्या अन्यायाची शिक्षा भोगण्याचे औदार्य दाखवित असता कर्तव्य पालनासाठी यादव समूहासह अगोदर हस्तिनापूर गाठणे किती गरजेचे आहे, हेतू पटवित आहेस. अन् त्यासाठी केवळ शाब्दिक क्षमायाचना हीच जणू तुझ्या हातून घडलेल्या अन्यायाची शिक्षा आहे अन् तेवढीच पुरेशी आहे असे मानूनतुला यदुवंशीय आणि त्यांची संपत्ती यासह सुरक्षित पोहचविण्याची हमी मी द्यावी,असे अत्यंत सावध शब्द योजना करीत तू सूचित केले आहेस."

          "अर्जुना, त्याहीपुढे जाऊन तुझ्यासारख्या परम कृष्ण भक्ताच्या मुखातून उमटलेले शब्द म्हणजे मजसारख्या निषादाला सांगितलेली दुसरी भगवद्गीताच आहे,असा आव आणून  कसलाही विचार करण्यात वेळ नदवडता मी तत्क्षणी तुझ्या सांगण्याप्रमाणे वर्तावे असेही तू गृहित धरीत आहेस. (क्रमश:)