Stamp Paper Part 8 Final in Marathi Crime Stories by Dilip Bhide books and stories PDF | स्टॅम्प पेपर भाग 8 अंतिम

Featured Books
Categories
Share

स्टॅम्प पेपर भाग 8 अंतिम

स्टॅम्प पेपर 

पात्र परिचय

प्रशांत.               वाड्याचा मालक

विशाखा               प्रशांतची बायको.

विजय राघव           प्रशांतचा  मित्र आणि बिल्डर

जयसिंग              भाडेकरू.

मल्हार               भाडेकरू.

अप्पासाहेब            भाडेकरू.

विश्राम               आप्पासाहेबांचा मुलगा.

गणेश                भाडेकरू

सुधाकर               भाडेकरू 

 

भाग  ८ (अंतिम)

भाग ७  वरुन पुढे वाचा........

“तुमच्या माहिती साठी सांगतो, खोटी साक्ष दिलीत तर ७ वर्षांची जेल होऊ शकते. त्यामुळे जे सत्य आहे तेच सांगा. कोणाच्या दबावाखाली खोटं बोलू नका. त्रास तुम्हालाच होईल.” – निंबाळकर.

 आता रतनकुमार पुरता ढेपाळला. तो कोर्टाकडे वळून म्हणाला,

“साहेब मी प्रशांत साहेबांना कधीच भेटलो नाही. त्यांना पैसे पण दिले नाही मी फक्त ऑफिस मधे गेलो आणि कोणालाही न भेटता आलो. माझ्यावर दया करा. मी काहीही गुन्हा केला नाही.” – रतन कुमार.

“ठीक आहे. तुम्हाला अजून काही सांगायचं आहे?” – निंबाळकर.

“साहेब नोकरी आहे माझी. साहेब जसं सांगतील तसं करणं हे माझं काम आहे. मी हे सगळं साहेबांच्या सांगण्यावरून केलं आहे. मी आपणहून काहीच गुन्हा केला नाही साहेब माझ्यावर दया करा. मी निर्दोष आहे.” – रतनकुमार.

घोलप आणि अमृतलाल ने कपाळाला हात लावला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती.

“युअर ऑनर, रतनकुमारच्या कबुली वरून हे स्पष्ट होतं आहे की प्रशांत आणि अमृतलाल या दोघांमध्ये कुठलाही करार झाला नव्हता आणि पैशांची पण देवाण घेवाण झाली नव्हती. हा सगळं ठरवून केलेला फसवणुकीचा मामला आहे.” - निंबाळकर.

“युअर ऑनर, आमचा साक्षीदार घाबरला आहे वरतून प्रतिपक्षांच्या वकिलांनी बरेच लीडिंग प्रश्न विचारले. रतन कुमार सारखा साधा  माणूस गोंधळला आणि घाबरला. फिर्यादीच्या वकिलांनी त्याला शिक्षेची भीती दाखवली. कोणीही सज्जन माणूस शिक्षेच्या भीतीने विपरीत कबुली देऊ शकतो. म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे की ही साक्ष ग्राह्य धरण्यात येऊ नये.” – घोलप.

“युअर ऑनर, खोटं बोलायला तयारी आणि प्रॅक्टिस करावी लागते. सत्य उस्फूर्त असत. आधी तयारी केल्यामुळे रतन कुमार पोपटपंची करत होता, पण जेंव्हा सत्य सांगितल्या शिवाय सुटका नाही हे लक्षात आल्यावर, एकही क्षण न दवडता तो सत्य सांगून मोकळा झाला. याची माननीय जज साहेबांनी नोंद घ्यावी.” – निंबाळकर.  

“या संदर्भात काही गोष्टींवर अजून प्रकाश पाडण्या साठी श्री अमृतलाल यांना प्रश्न विचारण्याची मला अनुमति द्यावी अशी कोर्टाला विनंती आहे.” – निंबाळकर.

“ठीक आहे बोलवा त्यांना.” – जज.

“अमृतलाल साहेब कमीतकमी शब्दांत उत्तर द्या. नाही तर निंबाळकर शब्दांत पकडतील. सावध रहा. हवं तर उत्तर द्यायला थोडा वेळ घ्या.” – घोलप हलक्या स्वरात म्हणाले.

अमृतलाल साहेब, चाळकरी आणि प्रशांत यांच्या बरोबर सर्व करार हे २००२ मधे झालेत. बरोबर?” – निंबाळकर.

“”हो” – अमृतलाल.  

“हे सगळे पेपर तुमचे वकील म्हणतात की नोटरी  कडून प्रमाणित करून घेतले आहेत. बरोबर?” – निंबाळकर.

“हो.” -अमृतलाल.

“युअर ऑनर यांची नोंद घेण्यात यावी. मालमत्तेचं  हस्तांतरण होण्यासाठी रजिस्ट्रार कडे नोंदणी आवश्यक असते. ती झालेली नाहीये, म्हणजेच हा करार झाला असलाच, तरी वैध ठरत नाही.” – निंबाळकर.

“बरं अमृतलाल साहेब, तुमच्या ऑफिस मधे बरेच कोरे स्टॅम्प पेपर आधीच घेऊन ठेवतात का?” – निंबाळकर.

“नाही. जेंव्हा जरूर असेल तेंव्हाच आणतो.” - अमृतलाल.

“माझ्या जवळ २००२ मधे स्टॅम्प पेपर वर केलेल्या, या केसशी संबंध नसलेल्या  एका वेगळ्याच कराराचे डॉक्युमेंट आहेत. तुम्ही केलेल्या कराराचे पेपर हे आहेत. तुम्ही सुद्धा प्रशांत साहेबां सोबत आणि चाळकरीं सोबत २००२ सालीच करार केलात, मग दोन्हीचं डिझाईन आणि रंग वेगळे कसे?- निंबाळकर.

“ऑब्जेक्शन युअर ऑनर. स्टॅम्प पेपर सरकार बनवते. माझ्या आशिलाला ते कसं माहीत असणार?” – घोलप.

“निंबाळकर काय प्रकार आहे हा?” – जज.

“युअर ऑनर, स्टॅम्प पेपर सरकार बनवते हे सत्य आहे पण एक सत्य अजून आहे की २००३ मधे हे डिझाईन आणि रंग सरकारने बदलले आणि ते वितरित केल्या गेले. यांचा अर्थ २००५ मधे खरेदी केलेल्या पेपर वर अमृतलाल ने २००२ या वर्षांची तारीख टाकून हे खोटे पेपर बनवले. आता अमृतलालच सांगतील की खरं काय आहे ते. खोटी साक्ष देण्याची काय सजा आहे ते मी माघाशीच सांगितलं आहे.” – निंबाळकर.

अमृतलाल चा  चेहरा घामाने डबडबला तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने मान खाली घातली. त्यांचे हात थरथरत होते. हताश नजरेने तो जज साहेबांकडे बघत राहिला.

“युअर ऑनर, प्रतिपक्षाने जे डॉक्युमेंट कोर्टात हजर केले आहेत, ते स्टॅम्प पेपर २००५ साली घेतलेले आहेत. तारीख मात्र २००२ ची आहे. हे स्टॅम्प पेपरच्या डिझाईन आणि कलर च्या शेड वरून  लक्षात येईल. म्हणजे हा सरळ सरळ फसवणुकीचाच मामला आहे ज्याची तयारी अमृतलाल आणि मंडळी पद्धतशीर पणे गेली चार वर्ष करत आहेत. म्हणून माझी कोर्टाला अशी विनंती आहे की प्रतिपक्षाने कोर्टात सबमिट केलेले पेपर ची फॉरेन्सिक परीक्षा व्हावी.” – निंबाळकर.

“हे कोर्ट आदेश देत आहे की अमृतलाल ने दिलेल्या डॉक्युमेंट ची फॉरेन्सिक टेस्ट व्हावी. आणि रीपोर्ट या कोर्टाला आठ दिवसांत सादर करावा.” – जज.

आठ दिवसांनी कोर्टात सर्व जमले. या वेळेस प्रशांतची बायको, विशाखा पण आली होती.

जज साहेब आले, ते आले म्हंटल्यांवर कोर्टातली कुजबूज थांबली. काही क्षण शांतता पसरली. त्यांनी फाइल उघडून वाचायला घेतली. रीपोर्ट वाचल्यावर जज साहेबांनी फाईल बंद केली… चष्मा काढून टेबलावर ठेवला… आणि बोलायला सुरुवात केली.

“फॉरेन्सिक अहवाल कोर्टासमोर सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार प्रतिपक्षाने सादर केलेले स्टॅम्प पेपर २००५ सालचे आहेत, तर त्यावर नमूद केलेली तारीख २००२ ची आहे. त्याच प्रमाणे, स्टॅम्प पेपर चे डिझाईन आणि रंग  हे २००३ या वर्षी बदल केल्या प्रमाणे आहेत. यावरून हे कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होते.” – जज

कोर्टात हलकी कुजबुज पसरली…

अमृतलालचा चेहरा उतरला. त्याने घोलप वकिलांकडे पाहिले. काहीच प्रतिक्रिया नाही.

“त्या अनुषंगाने, आणि तसंच करार सरकार कडून प्रमाणित केला नसल्याने प्रतिपक्ष आणि फिर्यादी यांच्यामधील कथित करार हा अवैध ठरवण्यात येतो आहे.” – जज.

प्रशांतने डोळे मिटून एक खोल श्वास घेतला. विशाखाच्या डोळ्यात पाणी आलं.

जज साहेब पुढे म्हणाले –
“फिर्यादीचा दावा मान्य करण्यात येतो आहे. संबंधित जागेचा ताबा फिर्यादीस देण्यात यावा. प्रतिपक्षाने ३० दिवसांच्या आत जागा रिकामी करावी. असा आदेश हे कोर्ट देत आहे.”

क्षणभर थांबून त्यांनी कागदावर नजर टाकली…

“तसेच, रेकॉर्डवरील पुरावे आणि सादर झालेल्या साक्षीवरून असे प्रथमदर्शनी दिसून येते की प्रतिपक्ष अमृतलाल यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्र तयार करून ते वापरले आहेत.”

अमृतलालने घोलपांकडे पाहिलं… पण त्यांची नजर खाली होती.

“त्यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये अमृतलाल वर गुन्हा नोंदवून कायद्यानुसार पुढील कार्यवाही करावी.” – जज.

कोर्टात एकच खळबळ उडाली.

जज साहेब पुढे म्हणाले,
“तसेच, साक्षी व नोंदी पाहता जयसिंग यांच्या सहभागाबाबतही शंका निर्माण होते. त्यामुळे त्याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.”

हे ऐकताच जयसिंग दचकला.
त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसत होती.

त्याने घोलपांकडे पाहिलं… पण त्यांनी नजर चुकवली.

कोर्टाच्या बाहेर आल्यावर विशाखाला रडू कोसळलं. अर्थात ते आनंदाश्रू होते.

प्रशांतच्या घरी एक ग्रँड रीसेप्शन आयोजित करण्यात आलं सर्व चाळकरी परिवारासह उपस्थित होते. आनंदाला उधाण आलं होतं. आता कोणालाच काळजी नव्हती. विजय राघवने सर्वांना त्याने जे प्रॉमिस केलं होतं त्याच प्रमाणे सर्वांना लाभ मिळेल असं घोषित केलं.

सर्वांनी प्रशांतचे  आभार मानले.

 

****समाप्त.***                      

दिलीप भिडे